वॉशिंग्टन : अर्थव्यवस्थेत दमदार फेरउभारी अनुभवास येत असली तरी भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रातील असंतुलित वाढीचा कल पाहता पतधोरणाचा ‘परिस्थितीजन्य उदार’तेचा पवित्रा कायम राखण्याचा निर्णय घेतला आणि पुढेही हीच भूमिका कायम ठेवली जाईल, असे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलताना केले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त वार्षिक सभेपुढे गव्हर्नर दास यांचे ध्वनिचित्रमुद्रित भाषण गुरुवारी सायंकाळी प्रस्तुत करण्यात आले. त्यांच्या भाषणाची काही ठळक क्षणचित्रे आयएमएफकडून प्रसिद्धीस देण्यात आली. अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या अंगातील असमान वाढीच्या सध्याच्या काळात भूमिकेत लवचीकता ठेवताना, उदार समावेशकतेची (अकॉमोडिटिव्ह) भूमिका पतधोरणात राखणे क्रमप्राप्तच आहे. चलनवाढीच्या परिस्थितीत कसे बदल होतात त्यावर मध्यवर्ती बँकेचा बारीक नजर असेल, असे दास यांनी भाषणात प्रतिपादन केले.