अमेरिकी डॉलरच्या बळकटीने  विदेशवारी महागली असली तरी आखातातील दुबईबाबत भारतीयांचे आकर्षण ढळल्याचे दिसत नसून, तेथील सध्याचा उन्हाळी हंगामही याला अपवाद नसेल. दुबईत सुट्टी, मौजमजेसाठी दाखल होणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये भारतीय अतिथींचे अव्वल स्थान चालू वर्षांतही कायम राहण्याबाबत तेथील सरकारी पर्यटन विभागाचा कयास आहे.
अरबस्तानातील उन्हाळ्यात पर्यटकांना विविध सवलती आणि बक्षिसांची खैरात असलेल्या ‘समर इज दुबई’ अशा खास हंगामाचा गारवा घेऊन दुबई सज्ज झाली आहे, असे मुंबईत दोन दिवसांच्या प्रसार मोहिमेसाठी आलेल्या दुबई फेस्टिव्हल्स अ‍ॅण्ड रिटेल एस्टॅब्लिशमेंटचे (डीएफआरई) प्रमुख सईद अल् फलासी यांनी सांगितले. ‘डीएफआरई’ ही दुबई सरकारचा पर्यटन विभाग ‘डीटीसीएम’चे एक अंग असून, जून ते सप्टेंबर हा दुबईतील उन्हाळी हंगाम उत्सवीरीतीने साजरा करणारा ‘समर इज दुबई’चे तिने आयोजन केले आहे. व्यापार-उदीम व नोकरीपेशाव्यतिरिक्त केवळ ऐषारामासाठी दुबईत २०१२ सालात ७.६५ लाख भारतीय पर्यटक दाखल झाले. आधीच्या वर्षांच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांची वाढ दिसून आली. तर २०१३ सालाच्या पहिल्या तिमाहीतच भारतीय पर्यटकांनी २.४० लाखांचा आकडा गाठला असून, यंदाच्या वर्षांत १६.५ टक्क्यांचा वृद्धीदर गाठला जाईल, असा विश्वास डीटीसीएमचे भारतातील प्रमुख कार्ल वाझ यांनी व्यक्त केला. अर्थात यात जानेवारी २०१३ मध्ये दुबई शॉपिंग फेस्टिव्हलसाठी गेलेल्या ८१,००० भारतीय पाहुण्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळा असला तरी ७ सप्टेंबपर्यंत सुरू असलेल्या रंगतदार उत्सवासाठी इतक्याच संख्येने भारतीय जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २०२० पर्यंत दरसाल दाखल होणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या २ कोटींचा आकडा ओलांडण्याचा त्यांचा अंदाज आहे.
‘समर इज दुबई’ हा तेथील अनेक तारांकित हॉटेल्स, विक्री दालने यांनी भागीदारी करीत पाहुण्यांना अनेकानेक सवलती आणि प्रत्येक खरेदीवर रोख तसेच सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपातील बक्षिसे देणाऱ्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत सुरू राहणारा उत्सव आहे. विविध १० शहरांतून साप्ताहिक १८५ उड्डाणे ‘एमिरेट्स एअरलाइन्स’ या तेथील सरकारी हवाई कंपनीने भारतीय पाहुण्यांच्या स्वागताची सज्जता केली आहे.