बिगर सूचिबद्ध कंपन्यांच्या संचालकांना नवीन नमुन्यांतील प्राप्तिकर-विवरणपत्र अर्ज

नवी दिल्ली : काळ्या पैशाची पायवाट बंद करण्यासाठी आणि बनावट कंपन्यांना पाचर म्हणून प्राप्तिकर विभागाने भांडवली बाजारात सूचिबद्ध नसणाऱ्या कंपन्यांच्या संचालक तसेच अशा कंपन्यांत गुंतवणूकदार असणाऱ्या प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासाठी ‘सहज’ आणि ‘सुगम’ या नमुन्यातील अर्ज भरण्याला मनाई केली आहे. कर निर्धारण वर्ष २०१९-२० साठी प्राप्तिकर विवरण पत्र अर्ज शुक्रवारी अधिसूचित करण्यात आले.

नव्याने अधिसूचित नमुना अर्जानुसार, बिगर सूचिबद्ध कंपन्यांच्या संचालकांना ‘आयटीआर-२’ नमुन्यातील अर्जाद्वारे विवरण पत्र भरावे लागेल. या अर्जामध्ये त्यांना ‘संचालक ओळख क्रमांक (डीआयएन)’ आणि पॅन तसेच कंपन्यांच्या नावांसह भागभांडवली मालकी हा तपशील नमूद करावा लागेल. बिगर सूचिबद्ध कंपन्यांतील गुंतवणूकदारांनाही कर विवरण पत्रात त्यांच्या मालकीचे समभाग, ते संपादित करण्यासाठी आलेला खर्च, ते विकले गेले असल्यास मिळालेली किंमत हा तपशील नमूद करावा लागेल. ‘सहज’ अथवा ‘सुगम’ नमुन्यातील अर्ज भरून हा तपशील मिळविणे शक्य झाले नसते.

निवासी व्यक्ती ज्यांचे वेतनातून उत्पन्न हे ५० लाख रुपयांपर्यंत आहे आणि केवळ एक घर मालमत्ता आहे आणि अन्य स्रोत (व्याज) व शेतीतून उत्पन्न ५,००० रुपयांपेक्षा अधिक अशा व्यक्तींना ‘आयटीआर-१’ अथवा ‘सहज’ नमुना अर्ज वापरून प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करता येईल. त्याचप्रमाणे अनुमानित उत्पन्न योजनेंतर्गत, ज्या व्यक्तींचे व्यवसाय- व्यापारातील उत्पन्न हे ५० लाख रुपयांपर्यंत आहे आणि जे कोणत्याही कंपनीवर संचालक तसेच बडे भागधारक गुंतवणूकदार नाहीत अशा व्यक्तींना ‘आयटीआर-४’ अथवा ‘सुगम’ नमुना अर्ज वापरून विवरण पत्र भरता येईल. या मंडळींना जीएसटी ओळख क्रमांकासह वस्तू-सेवा करांसंबंधीचे तपशीलही अर्जात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

* पगारदार आणि निवृत्तीवेतन मिळणाऱ्या करदात्यांना ‘आयटीआर-१’ अथवा ‘आयटीआर-२’ नमुन्यात प्राप्तिकर विवरण पत्र भरावे लागेल.

* व्यक्तिगत करदात्यांना प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१९ अशी आहे.

*  मुदतीच्या आत विवरण पत्र न भरल्यास करदात्यांवर दंड आकारणी होईल, शिवाय परतावा असल्यास तो मिळणार नाही.