केंद्रामध्ये पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआचे सरकार येईल या एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी एका दिवसात झालेल्या शेअर्सच्या प्रचंड खरेदीमुळे मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवली मूल्य ५.३३ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.

सोमवारी शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवली मूल्य १,५१,८६,३१२.०५ कोटी रुपये होते. शुक्रवारी बाजार बंद होताना सदर भांडवली मूल्य १,४६,५८,७०९.६८ कोटी रुपये होते. गेल्या तीन सलग सत्रांमध्ये शेअर बाजारामध्ये वाढीचे सत्र कायम राहिले असून या कालावधीत मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य ७.४८ लाख कोटी रुपयांनी वधारले आहे.

सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक १,४२२ अंकांनी वाढत ३९,३५२.६७ वर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक ४२१.१० अंकांनी वधारत ११,८२८.२५ वर स्थिरावला. बजाज ऑटो व इन्फोसिस वगळता सेन्सेक्समध्ये असलेल्या सगळ्या शेअर्सच्या भावांनी आज वाढ नोंदवली आहे.

मोदीसरकार पुन्हा सत्तेत येईल हा अपेक्षित अंदाज सार्थ ठरल्यामुळे उत्साहाचे वातावरण असल्याचे तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर जेव्हा एक्झिट पोल्सवर शिक्कामोर्तब होईल तेव्हाही थोडीफार वाढ होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. बहुतेक सर्व क्षेत्रांमधल्या शेअर्सच्या भावांमध्ये वाढ झाली असली तरी विशेषत: खासगी बँकांच्या शेअर्सचे भाव सहा टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. जर एका दिवसातल्या वाढीचा विचार केला तर सेन्सेक्स व निफ्टीने सर्वाधिक वाढीचा गेल्या दहा वर्षातला उच्चांक सोमवारी गाठल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.