नवी दिल्ली : खरेदीदारांना देऊ केलेल्या घसघशीत सूट-सवलती पथ्यावर पडून वाहन कंपन्यांसाठी  वर्षसांगता गोड ठरली. मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्रसारख्या कंपन्यांनी सरलेल्या डिसेंबर २०१९ मध्ये वाहन विक्रीत वाढ नोंदविली आहे.

वाहन विक्रीत देशातील अव्वल मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात १,२४,३७५ वाहन विक्री नोंदविताना वर्षभराच्या तुलनेत २.४० टक्क्यांची का असेना वाढ नोंदविली आहे. कंपनीची वर्षभरापूर्वीची, याच महिन्यातील वाहन विक्री १,२१,४७९ होती. कंपनीच्या नव्या व्हॅगन आर, स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, बलेनो, डिझायर आदींना २७.९ टक्के अधिक प्रतिसाद मिळाला आहे. तर जिप्सी, एर्टिगा, एक्सएल६, एस-क्रॉस, व्हिटारा ब्रेझासारखी वाहने १७.७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. छोटेखानी अल्टो, नवागत एस-प्रेसो, पूर्वाश्रमीची व्हॅगनआर यांची विक्री मात्र १३.६ टक्क्यांनी घसरली आहे.

महिंद्र अँड महिंद्रची वाहन विक्री गेल्या महिन्यात अवघ्या एक टक्क्याने वाढून वर्षभरापूर्वीच्या ३६,६९० वरून यंदाच्या डिसेंबरमध्ये ३७,०८१ झाली आहे. समूहातील ट्रॅक्टरची विक्री ३ टक्क्यांनी वाढून १७,९९० झाली आहे.

खरेदीदारांसाठी अनेक आकर्षक सवलत देऊनही ह्य़ुंदाई मोटर इंडिया, टोयोटा किलरेस्करला मात्र गेल्या महिन्यात विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले आहे.

निर्यातीत अव्वल असलेल्या ह्य़ुंदाई मोटर इंडियाला गेल्या महिन्यात निर्यातीसह देशांतर्गत विक्रीबाबतही घसरणीला सामोरे जावे लागले आहे. कंपनीची देशांतर्गत वाहन विक्री ९.८० टक्क्यांनी कमी होत ३७,९५३ झाली आहे. त्याचबरोबर कंपनीची निर्यातही यंदा काही प्रमाणात घसरली आहे. कंपनीने एकूण २०१९ मध्ये ७.२ टक्के वाहन विक्रीतील घसरण नोंदविली आहे.

टोयोटो किलरेस्कर मोटरची देशांतर्गत वाहन विक्री डिसेंबर २०१९ मध्ये तब्बल ४५ टक्क्यांनी आपटून ६,५४४ वर आली आहे. कंपनीने गेल्या एकूण वर्षांत १६.३६ टक्के वाहन विक्रीतील घसरण नोंदविली आहे.

एमजी मोटर इंडियाची गेल्या महिन्यातील वाहन विक्री ३,०२१ झाली आहे. जुलै २०१९ मध्ये भारतीय वाहन बाजारपेठेत शिरकाव करणाऱ्या कंपनीने सहा महिन्यांत एकूण १५,९३० वाहने विकली आहेत. कंपनीच्या विजेवरील कार चालू जानेवारीतच बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

तर होंडा कार्स इंडियाने ३६ टक्के घसरणीसह डिसेंबर २०१९ मध्ये ८,४१२ वाहनांची विक्री केली आहे. व्हीई कर्मशिअल व्हेकल्सची विक्री १९ टक्क्यांनी घसरून ५,०४२ झाली आहे.