भारतीय उद्योगक्षेत्राचा नव्या अध्यक्षांबाबत आशावाद

टाटा सन्सची अध्यक्षपदी ५४ वर्षीय नटराजन चंद्रशेखरन यांच्या निवडीचे भारताच्या उद्योगक्षेत्रातून सहर्ष स्वागताचा सूर शुक्रवारी उमटला. विशेषत: टाटा समूहाच्या मूल्यसंस्कृती आणि आदर्श परंपरांना देशाच्या उद्योगक्षेत्रात अजोड महत्त्व असून, त्यांच्या जतन होण्याच्या दृष्टीने सुयोग्य व्यक्तीची निवड झाल्याबद्दल समाधानाचा सूरही अनेकांनी व्यक्त केला.

टाटांच्या प्रतिष्ठेला मध्यंतरी आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीतून लागलेला बट्टा, गुंतवणूकदारांचा ढळलेला आत्मविश्वास या पाश्र्वभूमीवर अधिक विलंब न करता चंद्रशेखर यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही देशातील एक विश्वासपात्र उद्योगसमूह म्हणून टाटांच्या नाममुद्रेला पुन:प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावेल, असा विश्वास गुंतवणूकदार समूहातही म्हणूनच व्यक्त होत आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक पाश्र्वभूमी असलेल्या चंद्रशेखरन यांच्याकडे अध्यक्षपद आल्याने टाटा समूहाला आवश्यक असलेला आधुनिक डिजिटल तोंडावळा त्यांच्याकडून दिला जाईल, अशीही अपेक्षा केली जात आहे.

निवडक प्रतिक्रिया..

  • एन. चंद्रशेखर यांच्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्तीने देशाच्या उद्योगक्षेत्राच्या मानबिंदूमध्ये टाटा समूहाचे स्थान पुन्हा एकदा भक्कमपणे उंचावेल, असा विश्वास वाटतो. – अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्षा, स्टेट बँक
  • मूल्यनिर्मिती आणि दूरदृष्टी या नेतृत्व गुणांमुळे टीसीएस ही टाटा समूहाच्या मुकुटातील कोहिनूर ठरली आहे. कामाची प्रचंड ऊर्जा आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण क्षमतेने पूर्ण करणे, ही त्यांची वैशिष्टय़े आहेत. – अनिल अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स-एडीएजी
  • टीसीएसला एन. चंद्रा यांनी एक आघाडीची जागतिक माहिती तंत्रज्ञान कंपनी म्हणून पुढे आणले. जागतिक स्तरावरील त्यांचा अनुभव, व्यवसायातील दूरदृष्टी आणि टाटा समूहाबरोबरचा दीर्घकालीन घरोबा हे सारे त्यांची नवी भूमिका सिद्ध करतील. – चंदा कोचर, मुख्य कार्यकारी, आयसीआयसीआय बँक
  • चंद्रा, अभिनंदन. टाटा समूह या भारतीय ‘बोधचिन्हा’चे तुम्ही आता रक्षक आहात. टाटा समूहाने दिलेली जबाबदारी पेलण्यासाठी तुमची नेतृत्वक्षमता वादातीत आहे. – आनंद महिंद्रा, अध्यक्ष, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र समूह

 

मिस्त्री ते चंद्रा खळबळीचा प्रवास..

  • २४ ऑक्टो. २०१६ : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी. रतन टाटा यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद. नव्या अध्यक्षासाठी पाच सदस्यांच्या निवड समितीची स्थापना.
  • २५ ऑक्टो. : टीसीएसचे एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नियुक्ती.
  • २६ ऑक्टो. : मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळ सदस्यांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमातून उघड, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
  • २१ नोव्हें. : मिस्त्री समर्थक नसली वाडिया यांचा टाटांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा.
  • १२ डिसें. : मिस्त्रींना संचालक मंडळातून हटविण्यासाठी आवश्यक समूहातील कंपन्यांच्या विशेष सर्वसाधारण सभा सुरू.
  • १९ डिसें. : टाटा सन्सच्या संचालकपदाचा सायरस मिस्त्री यांचा राजीनामा. अन्य कंपन्यांचे संचालकपदही सोडले.
  • २० डिसें.: टाटांविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे मिस्त्री यांनी धाव घेऊन, प्रकरणाला दीर्घकालीन न्यायालयीन कज्जांचा पैलू जोडला.
  • २१ डिसें. : दोन महिन्यांत शेअर बाजारात टाटा समूहातील कंपन्यांनी एकंदर ८०,००० कोटी रुपयांचे (९.३ टक्के) बाजार भांडवल गमावले.
  • २७ डिसें. : गोपनीय माहिती जाहीर केल्याप्रकरणी टाटा सन्सकडून मिस्त्रींना कायदेशीर नोटीस.
  • ९ जाने. : टाटांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादापुढे बाजू मांडली
  • १२ जाने. २०१७ : टाटा सन्सच्या संचालक मंडळ बैठकीत चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी निवड.