भांडवली बाजारात सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांक वाढ नोंदली गेली. मंगळवारच्या तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीतील वाढ अधिक राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी ६२२.४४ अंश वाढीसह ३०,८१८.६१ वर पोहोचला. तर राष्टीय शेअर बाजाराच्या निफ्टीत आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रात १८७.४५ अंश वाढ नोंदली गेल्याने मुख्य निर्देशांक ९ हजारांपर्यंत, ९,०६६.५५ वर स्थिरावला.

सलग तीन व्यवहारांतील घसरणीनंतर भांडवली बाजाराने मंगळवारी वाढ नोंदविली होती. मुंबई शेअर बाजाराची सप्ताह सुरुवात तब्बल १,००० हून अधिक अंशआपटीने झाली होती.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांनी तेजीला हातभार लावला. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांमुळे बाजारात तेजी नोंदली गेल्याचे मानले जाते. देशात करोनाबाधित तसेच मृत्युमुखींची संख्या वाढत असताना कें द्र सरकारतर्फे  आणखी अर्थसाहाय्य जाहीर करण्याच्या संकेताने गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याचे सांगितले जाते.

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्र, एचडीएफसी लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, सन फार्मा यांचे समभाग ६ टक्यांपर्यंत वाढले. तर इंडसइंड बँक, हीरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स हे मुंबई निर्देशांकातील घसरणीच्या यादीत राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा, भांडवली वस्तू, वित्त, ग्राहकपयोगी वस्तू, तेल व वायू निर्देशांक ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दूरसंचार निर्देशांकाला घसरणीचा फटका बसला.

लघू उद्योगांसाठीच्या नोंदणी शुल्कात कपात

करोना विषाणूच्या उद्रेकापश्चात लघू आणि मध्यम उद्योगाला (एसएमई) सावरण्यास हातभार म्हणून राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर नोंदणीसाठी द्याव्या लागणाऱ्या वार्षिक नोंदणी शुल्कात २५ टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे जगभरात एक अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली आहे. लघू आणि मध्यम उद्योग या कोंडीचा सर्वाधिक परिणाम माध्यमांनी लघू उद्योगांवर झालेला असल्याने या उद्योगांना नोंदणी शुल्कात सवलत दिली आहे.