निर्मित वस्तूंच्या किमती वाढल्याचा फटका देशातील एकूण घाऊक महागाईला बसला आहे. नोव्हेंबरमध्ये याबाबतचा महागाई दर १.५५ टक्के असा गेल्या नऊ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर महिन्याभरापूर्वी (ऑक्टोबर २०२०) १.४८ टक्के, वर्षभरापूर्वी (नोव्हेंबर २०१९) ०.५८ टक्के होता. फेब्रुवारी २०२० मधील २.२६ टक्क्यांनंतर यंदा तो प्रथमच झेपावला आहे. यंदा अन्नधान्याच्या किमती स्थिरावूनदेखील एकूण महागाई दर वाढला आहे. गेल्या महिन्यात या गटातील वस्तूंचा निर्देशांक ३.९४ टक्के नोंदला गेला आहे. आधीच्या महिन्यात तो अधिक, ६.३७ टक्के होता. भाज्यांच्या किमती मात्र यंदाही चढय़ाच राहिल्या आहेत. बिगरअन्नधान्याच्या वस्तू ८.४३ टक्क्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तर इंधनाच्या किमती उणे स्थितीत नोंदल्या गेल्या आहेत. महिन्याभरात घाऊक किंमत निर्देशांक ०.८ टक्क्याने वाढला असून येत्या कालावधीत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. वाढत्या महागाईपोटी रिझव्‍‌र्ह बँकेने यंदाही व्याजदर कपात टाळली होती.

किरकोळ महागाई दरात घसरण

अन्नधान्याच्या किंमती रोडावल्याने किरकोळ किंमत आधारित महागाई दर नोव्हेंबरमध्ये कमी होत ६.९३ टक्के नोंदला गेला. मात्र अद्यापही तो रिझव्‍‌र्ह बँकेच्या समाधानकारक पातळीपेक्षा अधिक आहे.

खनिज तेलाच्या किंमती ५० डॉलरपुढे

लंडन : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींचा प्रवास प्रति पिंप ५० डॉलरपुढे कायम आहे. नव्या सप्ताहारंभीच त्यात एक टक्क्य़ाहून अधिक उसळी नोंदली गेली. काही प्रमाणात का होईना सलग दुसऱ्या दिवशीही त्यातील वाढ कायम राहिली. इंधनाचे दर मार्च २०२० नंतर प्रथमच सद्यपातळीपर्यंत उंचावले आहेत.