जेट एअरवेज बंद होण्याला कोण कारणीभूत आहे त्यावरुन आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. बँकांकडून जेटच्या प्रवर्तकांना जबाबदार ठरवले जात आहे. त्यावर प्रवर्तकांकडून कर्ज देणाऱ्यांनी जिथे सांगितलं त्याठिकाणी स्वाक्षरी केली. त्यामुळे जेटची विमान उड्डाणे कायम ठेवण्यासाठी तात्काळ निधी मिळायला पाहिजे होता असे प्रवर्तकांचे म्हणणे आहे.

या आरोप-प्रत्यारोपांमध्ये कर्ज देणाऱ्या बँकांनी किंवा प्रवर्तकांनी कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार देण्यासाठी पैसे दिले नाहीत. वेतन न मिळाल्यामुळे कर्मचारी समस्यांचा सामना करत असून हे असेच चालू राहिले तर कर्मचाऱ्यांकडे दुसरी नोकरी बघण्याशिवाय पर्याय उरणार नाही. दुर्देवाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैस देण्यास  बँकांनी असमर्थता दर्शवली आहे. कुठलाही शब्द देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

आमचे काही कर्मचारी या कंपनीसाठी खूप महत्वाचे आहेत पण त्यांच्याकडे दुसरीकडे नोकरी बघण्याशिवाय पर्याय नाही हे आम्ही कर्ज देणाऱ्या बँकांना सांगितले. तेव्हा कंपनीच्या शेअर होल्डर्सनी यावर तोडगा काढावा असे बँकांकडून उत्तर मिळाले. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनसाठी प्रवर्तक आणि शेअर होल्डर्सकडून तात्काळ निधी उपलब्ध व्हावा यावर बरीच चर्चा झाली. पण त्यातून अनुकूल काही घडले नाही असे जेटचे सीईओ विनय दुबे यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. कंपनीकडे पैसाच नसल्यामुळे वेतन कधी मिळणार हे सांगता येणार नाही.