चेन्नईत मुख्यालय असलेल्या ९४ वर्षे जुन्या लक्ष्मी विलास बँकेच्या गुंतवणूकदारांनी डीबीएस बँकेतील विलीनीकरणाला विरोध दर्शविला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने पुढे आणलेल्या विलीनीकरण मसुद्याप्रमाणे, सिंगापूरस्थित डीबीएसची भारतातील उपकंपनी डीबीएस बँक इंडिया आणि लक्ष्मी विलास बँकेचे एकत्रीकरण केले जाणार आहे.

योजनेच्या मसुद्याप्रमाणे, बँकेचे संपूर्ण भरणा झालेले भागभांडवल हे निर्लेखित केले जाईल आणि लक्ष्मी विलास बँकेच्या समभागांची भांडवली बाजारातील नोंदणीही काढून टाकली जाईल.

बँकेच्या भागधारक आणि गुंतवणूकदारांसाठी ही धक्कादायकच गोष्ट ठरली असून, रिझव्‍‌र्ह बँकेचा हा मसुदा हा अन्याय्य वागणूक देणाराच असल्याची ओरड त्यांनी सुरू केली आहे.

या बँकेत किरकोळ भागधारकांचा एकूण हिस्सेदारी २३.९८ टक्के इतकी असून, त्यांना त्यांच्या हाती असलेल्या समभागांच्या बदल्यात एक रुपयाही मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी प्रस्तावित विलीनीकरणालाच आव्हान देण्याचा पवित्रा घेतला आहे.