नवी दिल्ली : हिरे व्यापारी नीरव मोदी कर्ज फसवणुकीचे संकट ओढवलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने तीन तिमाहीनंतर अखेर नफा नोंदवला आहे. बँकेने डिसेंबर २०१८ अखेरच्या तिमाहीत २४७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

वार्षिक तुलनेत कंपनीच्या नफ्यात यंदा एकअंकी वृद्धी झाली असली तरी वर्षभरापूर्वीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या २३०.१ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा अधिक नफा मिळाला आहे. बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण विक्रमी १८ टक्क्यांवरून यंदा १६.३३ टक्क्यांपर्यंत स्थिरावले आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत बँकेला अनुक्रमे ९४० कोटी व ४,५३२.३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तर २०१७-१८ या मागील आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत १३,४१६.९१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

युनायटेड बँक ऑफ इंडियाचा तोटाविस्तार

यूनायटेड बँक ऑफ इंडियाचा तोटा डिसेंबर २०१८ अखेरच्या तिमाहीत वाढत १,१३९.२५ कोटी रुपये झाला आहे. वाढत्या थकीत कर्जामुळे बँकेचा तोटा वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ६३७.५३ कोटी रुपयांवरून यंदा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. बँकेचे ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण २१.२७ टक्क्यांवर गेले आहे.