विभागासाठीची आर्थिक तरतूद, तज्ज्ञांच्या कार्यक्षमतेवरही बोट

सध्या जगभर वित्तसंस्थावरील सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून भारतही सुटलेला नाही.

मुंबई : ‘कोअर बँकिंग’ प्रणालीशी अवगत होऊन अनेक वर्षे झाल्यानंतरही राज्यातील सहकारी बँकांची माहिती तंत्रज्ञान सुविधेवर कॉसमॉस सहकारी बँक प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकारी बँकांसाठी अवलंब होत असलेल्या तांत्रिक सुविधांसाठी केले जाणाऱ्या आर्थिक तरतुदीबाबतही यानिमित्ताने चर्चा घडू लागली आहे. सहकारी बँकांचे महत्त्वाचे अंग – तंत्रज्ञान सुविधेकरिता तज्ज्ञांच्या फळीच्या कार्यक्षमतेवरही बोट ठेवले जात आहे.

राज्यातील जवळपास सर्वच सहकारी बँका सध्या ‘कोअर बँकिंग’ने सुसज्ज आहेत. यासाठीची तंत्रज्ञान सुविधा सहकारी बँका या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमार्फत घेतात. त्याकरिता बँकांची स्वतंत्र यंत्रणाही असते. ही सुविधा पुरविणारे ‘सॉफ्टवेअर’ तसेच ‘सव्‍‌र्हर’ याकरिता बँकांमध्ये तज्ज्ञ कर्मचारी, अधिकारी असतात. असे असूनही खास करून स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या बँकांची तंत्रज्ञान प्रणाली भारताबाहेरून विस्कळित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

‘सहकार भारती’चे सतिश मराठे यांनी सांगितले की, सार्वजनिक, खासगी बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांमध्ये माहिती तंत्रज्ञान सुविधेवर कमी भर दिला जातो, असे पूर्णपणे म्हणणे योग्य होणार नाही. कॉसमॉस बँकेसारख्या अनेक सहकारी बँकांची याबाबत स्वत:ची यंत्रणा आहे. खुद्द बँकही ही सुविधा अन्य सहकारी बँकांना देण्याइतपत सक्षम आहे. बँकेची स्वत:ची आपत्कालिन यंत्रणा आहे. सायबर हल्ल्यासारख्या घटना या राष्ट्रीयकृत बँकांनाही चुकलेल्या नाहीत. सहकारी बँकांचेही तंत्रज्ञानविषयक विस्तार धोरण असते. सध्या जगभर वित्तसंस्थावरील सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून भारतही सुटलेला नाही.

ठाणे जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल साठे यांच्या म्हणण्यानुसार, सर्वच सहकारी बँका या माहिती तंत्रज्ञानविषयक सुविधांवर अधिक लक्ष देतात. हा त्यांच्या व्यवसायाचा कणा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुरक्षितेविषयक जे काही मापदंड आहेत त्यांचे पालन सहकारी बँकांकडून केले जाते. तंत्रज्ञानविषयक सुविधांसाठी तर अधिक काळजी घेतली जाते. भारताच्या वित्तसंस्थांवर जागतिक स्तरावरून होणारा सायबर हल्ला हा प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांवरचा हल्ला आहे. मात्र यामुळे खचून न जाता सहकार क्षेत्र कायम एकत्रच राहिल.