नफा वाढ नोंदवूनही महसूल, व्यवसाय वाढीच्या कामगिरीत निराशा

मुंबई : बाजारमूल्याबाबत भांडवली बाजारात अव्वल स्थानावर असलेल्या दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांची निराशा करतानाच विश्लेषकांच्या अपेक्षांवरही पाणी फेरले आहे. शुक्रवारी सायंकाळी भांडवली बाजारातील व्यवहार आटोपल्यानंतर जाहीर झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस) या कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांत नफ्यात वाढ नोंद असली तरी अपेक्षेपेक्षा कमी महसूल व आगामी व्यवसायाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रिज व टाटा समूहातील टीसीएस या मुंबई शेअर बाजारातील दोन सर्वश्रेष्ठ सूचिबद्ध कंपन्या बाजार भांडवलाबाबत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ तिमाहीत रिलायन्सने विक्रमी नफ्याची नोंद केली असली तरी महसूलात मात्र १.४ टक्के घसरण नोंदविली आहे. रिलायन्सने वर्षभरापूर्वीच्या याच तिमाहीत ८३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला होता,  त्या तुलनेत तो यंदा १,३५० कोटी रुपये नोंदविला गेला आहे. हे प्रमाण १,५०० कोटी रुपयांवर जाण्याचा विश्लेषकांचा अंदाज होता. कंपनीच्या महसूलात १.४ टक्के घसरण झाली आहे.

तर टीसीएसच्या निव्वळ नफ्यात गेल्या तिमाहीत अवघी ०.२ टक्के वाढ होऊन तो ८,११८ कोटी रुपये झाला आहे. तोही ८,२२५ कोटी रुपये होईल, अशी अपेक्षा होती. प्रति समभाग ५ रुपये असा तिसरा लाभांश देऊ करणाऱ्या टीसीएसच्या महसुलात अवघी ६.७ टक्के वाढ झाली आहे.

तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर होण्यापूर्वी झालेल्या सप्ताहअखेरच्या  मुंबई शेअर बाजार व्यवहारात रिलायन्सचे बाजार भांडवल १०.०२ लाख कोटी रुपये झाले. तर टीसीएसचे ८.३२ लाख कोटी झाले. दोन्ही कंपन्यांच्या समभाग मूल्यात मात्र गुरुवारच्या तुलनेत अनुक्रमे वाढ आणि घसरण झाली.

कमजोर कामगिरीची नोंद असलेल्या या निकालावर भांडवली बाजाराची खरी प्रतिक्रिया ही सोमवारीच स्पष्ट होऊ शकेल.