गेल्या सलग तीन वर्षांपासून तोटा नोंदविणाऱ्या व निव्वळ मालमत्ता रोडावलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध आले आहेत. ठेवीदारांना गरजेसाठी महिन्याभराकरिता २५ हजार रुपये काढण्याची मुभा मिळालेल्या बँकेचे डीबीएस या विदेशी बँकेबरोबरचे विलीनीकरण होणार आहे.

लक्ष्मी विलास बँकेवर मंगळवारी सायंकाळपासूनच निर्बंध आणताना रिझव्‍‌र्ह बँकेने बँकेच्या ठेवीदारांना येत्या १६ डिसेंबपर्यंत अत्यावश्यक म्हणून २५ हजार रुपये काढण्याची मुभा दिली. त्याचबरोबर सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या डीबीएस बँकेबरोबरचे तिचे विलीनीकरण महिन्याभरात पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

लक्ष्मी विलास बँकेबाबत मंगळवारी दोन स्वतंत्र निर्णय पत्रकांद्वारे जाहीर करत मध्यवर्ती बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचे माजी बिगर कार्यकारी संचालक टी. एन. मनोहरन यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.