डॉलरच्या तुलनेत गेल्या काही सलग सत्रांपासून घसरत असलेल्या भारतीय चलनाचा प्रवास आता थेट ६३ नजीक जाऊ पाहत आहे.
नोव्हेंबरमधील घाऊक महागाईचा दर शू्न्यावर विसावला असला तरी ऑक्टोबरमधील उणे स्थितीत गेलेल्या देशाच्या औद्योगिक उत्पादन दरामुळे चलनावर वाढता दबाव निर्माण होत आहे.
रुपया सोमवारी थेट ६५ पैशांनी घसरत ६२.९४ पर्यंत घसरला. स्थानिक चलनाचा हा गेल्या जवळपास ११ महिन्यांचा तळ होता. व्यवहारात रुपयाने ६२.९५ हा सत्र नीचांक नोंदविला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याने आयातदारांकडून अमेरिकी चलनाची मागणी वाढल्याचा परिणाम रुपयाच्या मोठय़ा घसरणीवर होऊ लागल्याचे दिसत आहे. गुंतवणूकदारांची नजर आता अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या मंगळवारपासून होणाऱ्या बैठकीवरही आहे. गेल्या चार महिन्यांतील एकाच व्यवहारातील चलनातील १.०४ टक्के ही सर्वात मोठी आपटी नोंदविली. यापूर्वी २७ जानेवारी रोजी रुपया ६३.१० पर्यंत होता.