ऐतिहासिक उच्चांकी टप्प्यावर पोहोचलेल्या भांडवली बाजारानेच गेल्या चार महिन्यांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. तुलनेत २०१४ मध्ये सोने आणि चांदीद्वारे गुंतवणूकदारांना फारशी कमाई झालेली नाही. चालू वर्षांत आतापर्यंत सेन्सेक्स ८ टक्क्यांनी उंचावला आहे, तर सोन्याच्या दरांमध्ये अवघी २.१४ टक्के वाढ झाली आहे. चांदीच्या दरात उलट एक टक्क्याची घट झालीआहे.
२०१३ अखेरीस सेन्सेक्स २१,१७०.६८ वर होता, तर बुधवारीच त्याने २२,८७६.५४ हे सर्वोच्च स्थान पटकाविले. निफ्टीही या वेळी ६,८००च्या पुढे नव्या टप्प्यावर जाऊन पोहोचला आहे. तुलनेत जानेवारी ते एप्रिल (२३ पर्यंत) सोने दरात तोळ्यामागे ६४० रुपयांची वाढ झाली आहे. या दरम्यान चांदीचे किलोसाठीचे दर ४५५ रुपयांनी कमी झाले आहेत. सोने-चांदीच्या हे दर नवी दिल्लीतील आहेत.
गेल्या वर्षी सेन्सेक्सने ९ टक्के परतावा दिला होता, तर सोन्याचे दर ३ टक्क्यांनी घसरले होते आणि चांदीचा भाव तब्बल २४ टक्क्यांनी कमी झाला होता. २०१३ मध्ये सोने १० ग्रॅमसाठी ३२ हजार रुपयांपुढे विक्रमी टप्प्यावर पोहोचले होते, तर किलोसाठी ७० हजार रुपयांच्या पुढे गेलेल्या चांदीच्या दरातील उतार तेव्हापासूनच पाहायला मिळाला. चांदी गेल्या अनेक महिन्यांपासून ५० हजार रुपयांच्या आसपासच आहे.
२०१२मध्ये सेन्सेक्स २५ टक्क्यांनी उंचावला होता, तर सोन्याच्या दरांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ नोंदली गेली होती. चांदीतही जवळपास हा कल नोंदला गेला. यंदाच्या लग्नादी मोसमातही मौल्यवान धातूमध्ये फारशी वाढ पाहायला मिळाली नाही. या दरम्यान सोने १० ग्रॅमसाठी ३० हजारांच्या फार पुढे गेलेले नाही, तर चांदीचा प्रवासही ४५ हजार रुपयांच्या आसपासच आहे.