मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सने गुरुवारी २७ हजाराला पुन्हा गाठतानाच गेल्या तीन आठवडय़ांतील नीचांकातूनही उसळी घेतली. तब्बल ३६५.८९ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २७,२७४.७१ वर पोहोचला. तर निफ्टीत १३२.५० अंश वाढीसह निफ्टी ८,२३४.६० पर्यंत गेला.
कच्च्या तेलाच्या सावरत्या किमती, युरोझोनला आर्थिक सहकार्य मिळण्याची आशा या जोरावर बाजार सकाळपासूनच वाढता राहिला. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेतील ६२.५० वरील रुपयांचेही बाजारात गुंतवणूकदारांनी स्वागत केले. आशियाई तसेच युरोपीय बाजारही आता वाढले आहेत.
रिलायन्स वगळता सेन्सेक्समधील इतर सर्व २९ समभागांचे मूल्य वाढले. स्मॉल व मिड कॅपही १.७५ टक्क्याहून अधिक उंचावले. कामगारांचा संप एकच दिवसात संपुष्टात आल्याने सरकारी कोल इंडियाचा समभागही एक टक्क्याने वाढला. तर कोटक महिंद्र बँक व आयएनजी वैश्य बँकेच्या एकत्रीकरणाला भागधारकांची मंजुरी मिळाल्याने दोन्ही बँकांचे समभाग ५ टक्क्यांहून अधिक वाढले. ८,२०० च्या वर पोहोचलेल्या निफ्टीतील ५० पैकी केवळ दोन समभाग घसरणीच्या यादीत राहिले.e07कच्चे तेल ५२ डॉलरवर
*आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही व्यवहारांपासून सतत घसरणारे कच्च्या तेलाचे दरही गुरुवारी सावरताना दिसले.
ब्रेन्ट क्रूडने नुकताच प्रति िपप ५० डॉलरचा तळ गाठला असताना तेल आता ५२ डॉलरच्या वर पोहोचले आहेत. गुरुवारी त्यात पिंपामागे ०.२३ डॉलरची वाढ झाली. तेल उत्पादनात मोठी आघाडी घेणाऱ्या अमेरिकेतील अर्थव्यवस्थेच्या लवकरच जाहीर होणाऱ्या आकडेवारीने तेल दरांमध्ये उभारी आली. त्याचबरोबर ग्रीसवरील संकट निवळण्याची चिन्हे या क्षेत्राच्या दरांवर परिणाम करणारी ठरली. अमेरिकी तेलही आता प्रति पिंप ५० डॉलरच्या वर आल्या आहेत. त्यांनी सलग चार व्यवहारांत ४८ डॉलपर्यंतचा तळ गाठला आहे.

रुपया महिन्याच्या उच्चांकावर
मुंबई: सलग दुसऱ्या सत्रात पैशांमध्ये मोठी वाढ नोंदविणारा रुपया गुरुवारी डॉलरसमोर महिन्याच्या वरच्या टप्प्याला पोहोचला. ५० पैशांनी स्थानिक चलन भक्कम होत ६२.६७ वर आले. दोन सत्रांतील ९० पैशांच्या वाढीने रुपयाची १२ डिसेंबरनंतरची भक्कमता नोंदविली आहे.
बुधवारच्या ४० पैशांच्या वाढीत अधिक भर पडल्याने रुपयाने गेल्या दोन व्यवहारात जवळपास दीड टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. गुरुवारच्या सत्रात ६३.२० या घसरणीच्या स्तरावर सुरुवात केल्यानंतर रुपया ६२.५८ पर्यंत उंचावला. महिन्यापूर्वी, १२ डिसेंबर रोजी रुपया ६२.२९ वर होता. तर यापूर्वी १८ डिसेंबर रोजीदेखील चलनात ५० पैशांची भर पडली होती.
रुपयाने बुधवारी गेल्या तीन आठवडय़ातील उत्कृष्ट कामगिरी बजाविली होती. चलन डॉलरच्या तुलनेत ४० पैशांनी उंचावले होते. भांडवली बाजार अवघ्या ७८ अंशांनी वाढला असताना रुपया या वेळी ६३.१७ पर्यंत पोहोचला होता. यापूर्वीच्या सलग दोन व्यवहारांत रुपयाने घसरण नोंदविली होती.
भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांच्या परतीमुळे स्थानिक चलन- रुपयाची मागणी वाढली आहे.