अर्थार्जनासाठी असो अथवा सेवानिवृत्तीनंतर विरंगुळ्याचे एक साधन असो, अनेक जण शेअर ट्रेडिंग करताना आढळतात. अर्थव्यवस्था विकसित होत असताना अर्थार्जनाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होत असतात. बदललेल्या परिस्थितीत शेअर ट्रेडिंग ही एक अर्थार्जनाची संधी उपलब्ध आहे. या गोष्टीकडे एक करिअर म्हणून गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता असल्याचे देशात पहिल्यांदा ‘डिस्काऊंट ब्रोकिंग’ ही संकल्पना रुजविणाऱ्या ‘अपस्टॉक’ या पहिल्या दलाली पेढीचे संस्थापक राघुकुमार यांनी ‘लोकसत्ता’शी साधलेल्या संवादादरम्यान याबाबतच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला झ्र्

तुम्हाला डिस्काऊंट ब्रोकिंगही संकल्पना भारतात आणावीशी का वाटली?

अमेरिकेत शेअर ट्रेडिंग करणाऱ्यांच्यात ‘डिस्काऊंट ब्रोकिंग’ ही संकल्पना अतिशय लोकप्रिय आहे. अन्य दलालांच्या तुलनेत ‘डिस्काऊंट ब्रोकिंग’ अतिशय कमी दलाली आकारतात. भारतातदेखील वैयक्तिक गुंतवणूकदारांचे मोठे प्रमाण असल्याने विदेशात लोकप्रिय असलेली ही संकल्पना भारतातदेखील लोकप्रिय होईल हा विश्वास असल्याने मी व माझ्या अन्य सहकाऱ्यांनी ही संकल्पना भारतात रुजविण्यासाठी २००८ मध्ये पहिली ‘डिस्काऊंट ब्रोकिंग’सेवा देणारी दलाली पेढीची स्थापना केली. आमच्या नावातील आद्याक्षरे निवडून ‘आरकेएसव्ही’ या नावाने सुरू केलेल्या आमच्या पेढीचे नाव बदलून आम्ही ‘अपस्टॉक’ केले आहे. मागच्या महिन्यात आमची सरासरी उलाढाल दोन्ही प्रमुख शेअर बाजाराच्या एकूण उलाढालीच्या ५% आहे.

डिस्काऊंट ब्रोकिंगही संकल्पना भारतात कमालीची लोकप्रिय होण्यामागचे काय कारण आहे?

पारंपरिक दलालीपेढय़ा या उलाढालीच्या रकमेवर दलाली आकारतात. ‘डिस्काऊंट ब्रोकिंग’ या संकल्पनेत दलाली ही उलाढालीवर न आकारता दलाली ही स्थिर असते. आम्ही मागील वर्षी १९४७ ही योजना राबविली. १९४७ रुपये भरून महिनाभर हवी तेवढी उलाढाल करण्याची मुभा आम्ही ग्राहकाला दिली होती. त्यामुळे आमच्या मंचावरून केलेल्या उलाढालीसाठी अन्य दलालांच्या तुलनेत कितीतरी अल्प दलाली द्यावी लागली. आम्ही देत असलेली सेवा लोकप्रिय होण्यामागे अन्य दलालांच्या तुलनेत असलेली स्वस्त सेवा हे कारण सांगता येईल.

तुम्ही कोणत्या सेवा नव्याने उपलब्ध करून दिल्या आहेत?

आम्ही ‘ई केवायसी’ ही सेवा नव्याने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुमच्याकडे आधारशी संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. आमच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला खाते उघडण्यासाठी एक लिंक आहे. या लिंकला क्लिक केल्यावर आवश्यक तो तपशील भरावा लागेल. हा तपशील भरल्यावर ही लिंक तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावरून आवश्यक तो तपशील गोळा करेल. तो तपशील वापरून अगदी अल्पावधीत तुम्ही आमच्या कडे  तुमचे ट्रेडिंग खाते उघडू शकाल.

दुसरी गोष्ट आम्ही सामान्य ग्राहकांना अल्गो ट्रेडिंग ही सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहोत. सध्या बाजारातील मोजक्या उलाढालकर्त्यांना उपलब्ध असलेली ही सेवा सामान्य गुंतवणूकदारांना उपलब्ध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याचा एक भाग म्हणून आम्ही आयआयटीच्या पदवीधारकांना आमचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नियुक्त केले असून लवकरच ही सेवा आमच्या सर्व ग्राहकांना उपलब्ध होईल.

भारतातील शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते; ती कमी करण्यासाठी तुमचे नेमके काय प्रयत्न आहेत?

भारतात मानवी हस्तक्षेपामुळे व्यवहार करण्यासाठी मोजावी लागणारी किंमत अधिक आहे. आमच्या प्रणालीवर जवळजवळ सर्व व्यवहार मानवी हस्तक्षेपाशिवाय होतात. ग्राहकाच्या खात्यातून आमच्या खात्यात पैसे हस्तांतरित करणे, सौदा करण्यापूर्वी आपली ओळख पटविणे, व्यवहार करायचा नसल्यास पैशाची आमच्या खात्यातून ग्राहकाच्या खात्यात हस्तांतरासाठी मागणी करणे इत्यादी कामे स्वयंचलित पद्धतीने होत असतात. आमच्याकडे कुठेही अतिरिक्त कर्मचारी नाहीत. आमच्या ५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही रोजच सरासरी ५००० कोटींचे सौदे करीत असतो. आमच्या इतके सौदे करण्यासाठी पारंपरिक दलालाला किमान ५०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल.

तुमच्या कंपनीत रतन टाटा यांनी गुंतवणूक केल्याची चर्चा मध्यंतरी माध्यमात होती. त्याबद्दल काय सांगाल?

सर्वच व्यवसाय विस्तार करण्यासाठी निधीची आवश्यकता भासते तशी आम्हालासुद्धा भासली. आमचा प्रस्ताव रतन टाटा यांच्याकडे गेल्यावर त्यांना या व्यवसायात गुंतवणूक करावी असे वाटू लागले. आम्ही त्यांना आमच्या व्यवसायाचे सादरीकरण केल्यानंतर आम्ही अर्थसाक्षरतेसाठी करीत असलेल्या प्रयत्नांना दाद देत रतन टाटा यांनी आमचे समभाग विकत घेऊन आमच्या अर्थसाक्षरतेच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला असेच म्हणावे लागेल.

तुम्ही अर्थसाक्षरतेसाठी नेमके काय प्रयत्न करीत आहात?

ट्रेडिंगमध्ये पैसे कमविता येत नाहीत असा बाजाराशी संबंधित अनेक व्यक्तींचा समज आहे. बाजारात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही शनिवार, रविवार वेगवेगळ्या ठिकाणी मोफत कार्यशाळा आयोजित करीत असतो. या कार्यशाळांना अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असतो. आमच्या कार्यशाळांसाठी दोन आठवडय़ांची प्रतीक्षा यादी असते. या कार्यशाळांचा लाभ घेत बाजाराशी संबंधित अनेकांनी कौशल्य विकसित केले आहे.