पिंपरी : वाहनांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांपासून निरंतर घट होत असून त्याचा मोठा फटका वाहन निर्मात्यांसह, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पट्टय़ातील वाहन उद्योगांशी संलग्न लघुउद्योग क्षेत्रालाही बसत आहे.

वाहन उद्योगातील मंदीमुळे या औद्योगिक पट्टय़ातील लघुउद्योगांना मिळणारे काम कमी झाले आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. उद्योगनगरीचा कणा असलेल्या ‘टाटा मोटर्स’मध्येही चिंताजनक परिस्थिती असून एप्रिल, मे आणि जून या पहिल्या तिमाहीतच मोठय़ा प्रमाणात तूट झाल्याचे कंपनीने घोषित केले आहे.

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, होंडा, रेनॉ, निस्सान, फोक्सव्ॉगन, फियाट, टोयाटा-किलरेस्कर आदी कंपन्यांच्या वाहन विक्रीत घट झाली आहे. सहा महिन्यांपासून मंदीशी झगडणाऱ्या वाहन उद्योगाची अवस्था आता आणखी बिकट झाली आहे. वाहन विक्रीतील घसरण कायम राहिल्याने वाहन उत्पादक, वितरक, सुटय़ा भागांचे विक्रेते हे सर्वच घटक चिंतेत आहेत. शोरूम्सची अवस्थाही वाईट आहे. रोजगारनिर्मिती थंडावली आहे. असेच वातावरण कायम राहिल्यास छोटे उद्योग बुडीत निघण्याची चिन्हे आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास साडेपाच हजार छोटे-मोठे उद्योग आहेत. उद्योगनगरीचा कणा आणि ‘ऑटो मोबाइल हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा मोटर्सवर बरेचसे उद्योग अवलंबून आहेत. त्यामुळे कंपनीतील घडामोडींचा परिणाम शहरातील उद्योग क्षेत्रावर लगेच होतो. टाटा मोटर्सची वाहनांची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे नव्या गाडय़ा बाजारात आणणे तूर्त लांबणीवर टाकण्यात आले आहे. हंगामी कामगारांना एक तर कमी केले जात आहे किंवा त्यांना दीर्घ सुट्टीवर पाठवण्यात येत असून आवश्यकतेप्रमाणे कामावर बोलावून घेण्यात येत आहे.

वाहन उद्योगातील मंदीमुळे गेल्या सहा महिन्यांत २० टक्के काम कमी झाले आहे. आता गणेशोत्सव, दसरा, दिवाळी अशा सणासुदीत वाहन खरेदी वाढेल आणि परिस्थितीत सुधारणा होईल, या आशेवर आम्ही लघुउद्योजक आहोत.

– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना