स्टँडर्ड अँड पुअर्स अर्थात ‘एस अँड पी’पाठोपाठ जागतिक महत्त्वाची पतमानांक संस्था मूडीज्ने भारताच्या अर्थव्यवस्था नाजूक वळणावर असताना सुरू झालेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाचे गंभीर अर्थपरिणामांचा इशारा दिला आहे. भारताच्या सार्वभौम पतमानांकनात तूर्तास श्रेणी सुधाराची शक्यता तिने फेटाळून लावली आहे. उलटपक्षी पतमानांकनात घसरणीची जोखीम वाढली आहे, असेच मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या टिपणातून मत नोंदविले आहे.

रिझर्व्ह  बँकेने जरी मागील पतधोरण आढाव्यात देशाच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १०.५ टक्के दराने विकास साधण्याचा कयास कायम ठेवला असला, तरी बहुतांश विश्लेषक संस्थांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिणामांची दखल घेत, विकास दराबाबत अंदाज कमी करीत ते दोन अंकी पातळीखाली म्हणजे ८.२ टक्क्यांच्या आसपास आणले आहेत. नोमुराने १०.८ टक्क्यांच्या जीडीपी वाढीचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. मूडीज्नेही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या आधी व्यक्त केलेल्या अंदाजात तब्बल ४.४० टक्क्यांनी कपात करून ते २०२१-२२ साठी ९.३ टक्क्यांवर आणले आहे. यापूर्वी भारत १३.७ टक्क्यांनी अर्थवृद्धी साधेल, असा तिचा अंदाज होता.

मात्र दीर्घावधीसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयक दृष्टिकोन सकारात्मक आणि स्थिर असल्याचे मूडीज्नेही मत व्यक्त केले आहे. किंबहुना आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी तिच्या जीडीपी वाढीच्या अंदाजात तिने १.७ टक्क्यांनी वाढ केली आहे. सुधारित अंदाजाप्रमाणे त्या वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.२ टक्के नव्हे तर ७.९ टक्के दराने वाढ साधू शकेल.