तेलाच्या किमती नरमल्या; बाजारही सावरला

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती नरमल्याने येथील भांडवली बाजारात बुधवारी पुन्हा तेजी नोंदली गेली. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या अपेक्षित व्याजदर कपातीच्या निर्णयावर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी केलेल्या माफक समभाग खरेदीमुळे सेन्सेक्स व निफ्टी पाव टक्क्यापर्यंत वाढले.

सलग दोन व्यवहारांतील एकूण ७००हून अंश अधिक अंशांच्या घसरणीनंतर मुंबई निर्देशांक – सेन्सेक्समध्ये बुधवारी ८२.७९ अंशांची भर पडली. परिणामी सेन्सेक्स ३६,५६३.८८ वर पोहोचला, तर २३.०५ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १०,८४०.६५ पातळीवर स्थिरावला.

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदविताना सेन्सेक्सने त्याचा ३६,५००चा तर निफ्टीने ११ हजारांचा स्तर सोडला होता. तथापि आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप आता ६५ डॉलरच्या खाली आल्या आहेत.

सौदीतील दोन प्रकल्पांवरील हल्ल्यानंतर तेथून खनिज तेलाचा पुरवठा चालू महिनाअखेपर्यंत पूर्ववत होण्याबाबतच्या आशेनेही बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले. त्याचबरोबर अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत होणाऱ्या व्याजदर कपातीचा कल गुरुवापर्यंत स्पष्ट होण्याची आशाही बाजारात व्यवहारादरम्यान दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातील ५० पैशापर्यंतची मजबूत वाढही तेजीसाठी निमित्त ठरली.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, वेदांता, स्टेट बँक, टेक महिंद्र, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, एनटीपीसी, पॉवरग्रिड आदी जवळपास ४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर ओएनजीसी, येस बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, सन फार्मा, मारुती सुझुकीचे मूल्य २ टक्क्यांपर्यंत उतरते राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, पोलाद, तेल व वायू, ऊर्जा आदी १.५४ टक्क्यापर्यंत वाढले. तर दूरसंचार व वाहन निर्देशांक अर्ध्या टक्क्यापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप ०.३९ टक्क्यापर्यंत वाढले.

तेल कंपन्या, सिगारेट कंपन्यांचा भाव वधारला

खनिज तेलाच्या किमती स्थिरावत असल्याने गुंतवणूकदारांकडून तेल व वायू विक्री व विपणन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांकरिता मागणी नोंदली गेली. विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे समभागमूल्य ४ टक्क्यांपर्यंत वाढले. ई-सिगारेटवरील निर्मिती, निर्यात तसेच वितरण व विक्रीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या गुरुवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मूळ सिगारेटनिर्मिती कंपन्यांचे समभाग ५.५ टक्क्यापर्यंत उंचावले.