प्रवासी कारऐवजी केवळ नव्याच नव्हे तर जुन्या वाहनांमध्येही युटिलिटी वाहन प्रकाराला वाढती मागणी आहे, हे गुगलच्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शोध संकेतस्थळात आघाडीवर असलेल्या गुगलने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ‘यूज्ड युटिलिटी’ वाहनांसाठीची ऑनलाइन विचारणा ही २० पट वाढली आहे.
‘गुगल सर्च’वर ‘यूज्ड कार’साठी झालेल्या शोधापैकी सर्वाधिक खरेदी प्रकार हा ‘युटिलिटी’ प्रकारच्या वाहनांसाठी झाला आहे. गेल्या सहा वर्षांत या प्रकारच्या वाहनांसाठीची विचारणा ही तब्बल २० पट वाढली आहे. तर २०१४ मध्ये ती ३० टक्के वृद्धिंगत झाली आहे.
प्रत्यक्ष रस्त्यावर नवे वाहन उतरविण्यासाठीही ग्राहकांकडून याच प्रकारच्या वाहनांना अधिक पसंती दिली जाते, हे गेल्या अनेक महिन्यांतील वाहन विक्रीच्या संख्येवरून स्पष्ट होते आहे. आता ऑनलाइनही आणि जुन्या गाडय़ांसाठीही याच गटातील पसंती दिली जात असल्याचे ताज्या सर्वेक्षणावरून सिद्ध झाले आहे.
यूज्ड कार विक्री क्षेत्रातील ‘महिंद्र फर्स्ट चॉइस व्हील्स’च्या सहकार्याने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात, खरेदीची आर्थिक क्षमता, अमुक नाममुद्रा, इंधन प्रकार यासाठी वाहन शोध घेणाऱ्या १० पैकी ८ जण लक्ष केंद्रित करतात; तर १६ टक्के शोध हा नेमक्या कंपनीच्या व मॉडेलसाठी होतो, हे निदर्शनास आले आहे.
डिझेलवरील युटिलिटी वाहन प्रकारासाठी ४७ टक्के शोधकर्त्यांनी उत्सुकता दर्शविली आहे. तर हॅचबॅक, सेदान व लक्झरी गटातील वाहनांसाठीचा क्रम हा त्यानंतर उतरता राहिला आहे. नाममुद्रा म्हणून होंडाच्या सिटी या सेदान श्रेणीतील वाहनाला अधिक पसंती दिली गेली आहे. क्षेत्रनिहाय महाराष्ट्र हा जुन्या गाडय़ांच्या शोधासाठी मोठय़ा प्रमाणात शोधाचे स्थळ ठरला आहे.
जुन्या गाडय़ा खरेदी करणाऱ्या नव्या ग्राहकांऐवजी ज्यांच्याकडे यापूर्वीच एक वा त्यापेक्षा अधिक वाहने आहेत त्यांची संख्या अधिक असल्याचे निराळे निरीक्षण या सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे.