वसंत माधव कुळकर्णी

बीओआय अ‍ॅक्सा टॅक्स सेव्हर फंड

कर बचतीसाठी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणाऱ्या ईएलएसएस फंड गटात ज्या योजनांनी १४ टक्के (कारण मुद्दल पाच वर्षांत दुप्पट होते) किंवा त्याहून अधिक परतावा देणारे जे फंड आहेत त्या फंडात बीओआय अ‍ॅक्सा टॅक्स सेव्हरचा समावेश होतो. सरलेल्या वर्षांतील ध्रुवीकरण आणि अस्थिरतेचा अचूक फायदा उठवत निधी व्यवस्थापकांनी अलीकडील काळात गुंतवणुकीत केलेल्या फेरबदलामुळे फंडाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसून येते. ‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई २०० टीआरआय’ हा निर्देशांक फंडाचा मानदंड आहे. मागील २० तिमाहींपैकी (म्हणजे पाच वर्षांत) फंडाने १७ तिमाहीत मानदंडापेक्षा सरस कामगिरी केली आहे. मागील एका वर्षांत या फंड गटातील आघाडीचा फंड असलेल्या अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटीच्या तोडीस तोड फंडाची कामगिरी झाली आहे.

बीओआय अ‍ॅक्सा फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी अलोक सिंग असून या फंडाचे निधी व्यवस्थापक आकाश मेंधानी आहेत. आकाश मेंधानी यांनी जुलै २०१९ मध्ये या फंडाची सूत्रे हाती घेतली. ते या फंडाचे चौथे निधी व्यवस्थापक आहेत. याआधी तीन निधी व्यवस्थापकांनी या फंडाची धुरा सांभाळली आहे. मागील वर्षी फेब्रुवारीत बाजाराने नीचांक गाठला आणि पुढे निवडणुकांनंतर उद्योगस्नेही सरकार येईल या आशेने मुख्यत: मेमध्ये निकाल आल्यानंतर बाजाराने निर्देशांकांनी नवीन उच्चांक प्रस्थापित केले. परंतु अर्थसंकल्पात उद्योगस्नेह दिसून न आल्याने निर्देशांकात घसरण झाली. मात्र सरकारने अर्थसंकल्पपश्चात केलेल्या उपाययोजनांमुळे बाजार निर्देशांकांनी पुन्हा उभारी घेतली. या अस्थिरतेच्या काळात निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीत केलेल्या सक्रिय व्यवस्थापनामुळे ‘ईएलएसएस’ गटात हा फंड गुंतवणूकदारांना परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे. या फंडाचे ‘कॅश कॉल’ न घेण्याचे धोरण निर्देशांक शिखरासमीप असताना परताव्यातील सुधारणेमुळे यशस्वी झाल्याचे दिसत आहे.

बाजाराला अस्थिरतेने ग्रासले असताना त्या अस्थिरतेचा उपयोग गुंतवणुकीतील फेरबदल करण्यासाठी वापर करण्याच्या धोरणाने फंडाला परताव्याच्या कोष्टकात अव्वल स्थानी नेऊन ठेवले. अन्य फंड संरक्षणात्मक व्यूहरचना करत असताना येथे निधी व्यवस्थापकांची आक्रमक रणनीती कमालीची यशस्वी ठरली आहे. फंडाची पोर्टफोलिओ रणनीती या फंडाला इतर कर-बचत फंडांपेक्षा वेगळी करते. मालमत्तेने लहान (अबोल) परंतु परताव्याचा अविरत सडा पाडणारा पारिजात अशा या फंडाचा गुंतवणूकदारांनी करबचतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीसाठी अग्रक्रमाने विचार करावा अशी शिफारस.

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

shreeyachebaba@gmail.com

एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक परतावा*

गुंतवणुकीची तारीख      %

१ जानेवारी २०१५    ८.६२

१ जानेवारी २०१६    १०.२३

१ जानेवारी २०१७    १४.४९

१ जानेवारी २०१८    -२.१६

१ जानेवारी २०१९    १४.४९

‘एसआयपी’ गुंतवणुकीवरील परतावा %*

१ वर्ष    १४.२३

२ वर्षे    -२.१८

३ वर्षे    १४.१५

५ वर्षे    ८.६२

प्रारंभापासून    १७.५२

* १० जाने. २०२०च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार