News Flash

फंडाचा ‘फंडा’.. : ‘ती’ची कामगिरी फ्रँकलिन इंडिया ब्लूचीप फंड

‘निफ्टी १०० टीआरआय’ हा फंडाचा मानदंड असून ९०.६३ टक्के गुंतवणूक मानदंडसापेक्ष आहे

(संग्रहित छायाचित्र)

अतुल कोतकर

जागतिक स्तरावर मोजक्याच महिला निधी व्यवस्थापिका आढळतात. भारतातही हेच चित्र दिसते. महिला दिनाच्या निमित्ताने काहीसा धांडोळा घेतला असता, मागील दहा वर्षांत भारतातील निधी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात महिलांची टक्केवारी हळूहळू वाढत आहे. या अभ्यासात असे आढळले की, २०१८ मध्ये महिला निधी व्यवस्थापिकांची संख्या १८ होती, ती २८ फेब्रुवारी २०२१ रोजी २६ वर गेली आहे. पुरुष निधी व्यवस्थापकांच्या तुलनेत महिला निधी व्यवस्थापिका या संख्येने ८ टक्केच असल्या तरी त्यांची कामगिरी पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत उजवी असल्याचे दिसते. त्या व्यवस्थापित करीत असलेल्या मालमत्तेची टक्केवारीही १५ टक्के इतकी भरते.

मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्र खासगी क्षेत्राला खुले केल्यानंतर फ्रँकलिन इंडिया ब्लूचीप फंड हा गुंतवणूकदारांना खासगी क्षेत्रातून उपलब्ध झालेला पहिला फंड आहे. उल्लेखनीय म्हणजे लार्ज कॅप फंड गटाच्या क्रमवारीत अव्वल पाच क्रमांकावर असणाऱ्या फंडांपैकी तीन फंडाचे व्यवस्थापन हे महिला निधी व्यवस्थापिकांकडून होत आहे. या फंडांपैकी पहिल्या क्रमांकावर फ्रँकलिन इंडिया ब्लूचीप फंड असून, रोशी जैन या त्याच्या निधी व्यवस्थापिका आहेत.

‘निफ्टी १०० टीआरआय’ हा फंडाचा मानदंड असून ९०.६३ टक्के गुंतवणूक मानदंडसापेक्ष आहे. निधी व्यवस्थापकांनी खासगी मालकीच्या बँका राष्ट्रीयीकृत बँका, तेल आणि नैर्सगिक वायू आणि रोकड सममूल्य गुंतवणुका या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना गुंतवणुकीत प्राधान्य दिले आहे. लार्जकॅप फंड गटात फ्रँकलिन इंडिया ब्लूचीप फंड एक अव्वल जोखीम समयोजित परतावा असलेला फंड आहे. हा फंड अगदी अल्प काळासाठी परताव्याच्या निकषांवर मानदंडापेक्षा मागे राहिल्याचे दिसले. परंतु दीर्घकालीन परताव्यात फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंडाची कामगिरी आपल्या स्पर्धकांपेक्षा निश्चितच उजवी आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला व्यवस्थापित फंडाचा शोध घेतला असता, कामगिरीच्या बहुसंख्य निकषांची हा फंड पूर्तता करत असल्याचे दिसून आले. दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लार्जकॅप फंड गटातील या फंडाची गुंतवणूकदार निश्चितच निवड करू शकतील.

व्यापारचक्राशी निगडित बँकिंग आणि बांधकाम क्षेत्रातील संकोच दीर्घकाळ असेल असे समजले जात होते. परिणामी या कंपन्यांची कामगिरी विस्तृत निर्देशांकापेक्षा कमी होत होती. अर्थव्यवस्थेच्या फेरउभारीची गती वाढल्यामुळे या क्षेत्राचे पुन:मूल्यांकन होत असल्याचा फायदा आमच्या फंडाला झाला आहे. आम्ही गुंतवणूक केलेल्या कंपन्या सुदृढ व्यवसायाच्या पायावर उभ्या असल्याने अर्थउभारीचा या कंपन्यांच्या उत्सर्जनात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे.

– रोशी जैन, निधी व्यवस्थापिका

atul@sampannanivesh.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 12:27 am

Web Title: article on franklin india bluechip fund abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र-कल : तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी!
2 रपेट बाजाराची : महिन्याची आशावादी सुरुवात
3 गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : चलननिर्मितीसाठी सोने प्रमाणित ‘गुणोत्तर प्रणाली’चा स्वीकार
Just Now!
X