आशीष ठाकूर

निफ्टी निर्देशांकाने तेजीचा ताल पकडत आता जी वाटचाल केली आहे त्यात मध्येच निफ्टीचा तोल – तेजीतून एकदम मंदीत तर येणार नाही ना? अशी चिंता गुंतवणूकदारांच्या मनात साहजिकच डोकावत असणार. आजच्या लेखात आपण विस्तृतपणे या चिंतेचे निराकरण करणार आहोत. विषयाच्या खोलात शिरण्यापूर्वी सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ४५,०७९.५५

निफ्टी: १३,२५८.५०

नवनवीन उच्चांकावरील निफ्टीची वाटचाल म्हणजे आजवर अपरिचित असलेल्या नवख्या प्रदेशातील वाटचाल आहे. ही वाटचाल गुंतवणूकदारांना सुकर व्हावी म्हणून दिशादर्शक ‘जीपीएस’ प्रणाली विकसित केली गेली आहे.

तेजी व मंदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू, पण आपलं भांडवल सुरक्षित राखणं ही काळाची गरज. आता जो निफ्टीने तेजीचा ताल धरला आहे त्याचे वरचे लक्ष्य हे १३,३५० ते १३,५५० असेल, तर निफ्टी निर्देशांकावर १२,७३० च्या खाली घातक मंदी असेल.

तसं पाहता ‘ताल व तोल’ हे दोन्ही शब्द सारखेच आहेत, फक्त एका मात्रेचा फरक. ताल व तोल यांचे वास्तव्य हे काचेच्या भांडय़ातलं. एकदा का तोल गेला की समाज मनाच्या नजरेतील तडा सांधता येत नाही, मग कितीही सौजन्याचा, सुधारणेचा फेविकॉल / फेविक्विक लावा, काचेच्या भांडय़ाला पडलेला तडा दिसायचा तो दिसतोच. हे विस्तृतपणे सांगण्याचा उद्देश एकच – अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी समभागांची नफारूपी विक्री करून भांडवल आणि नफा सुरक्षित करावा. अन्यथा मंदीत पोर्टफोलियोतील भांडवलाला जो तडा जातो तो पुन्हा सांधता येत नाही. यात जो काही आर्थिक, मानसिक धक्का बसतो त्यावर कुठल्याही औषधांच्या मात्रेचा गुण येत नाही.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल आणि त्यांचे विश्लेषण..

या स्तंभातील १९ ऑक्टोबरच्या लेखातील येस बँक लिमिटेड या समभागाचा निकालोत्तर विश्लेषण करू या.

राणा कपूरांसारख्या कर्तबगार व्यक्तीमुळे समभागाचा ताल, तोल, लय सर्वच बिघडलेले. त्यात गुंतवणूकदारांची दुखरी नस.. स्वस्तात मिळतो, अर्ध्या किमतीत मिळतो म्हणून खरेदी केला आणि खरेदी केल्यावर पुन्हा खरेदीच्या अर्ध्या किमतीवर आलेला. अशा दुष्टचक्रात सापडलेल्या सर्व गुंतवणूकदारांच्या गळ्यात अडकलेला असा हा येस बँकेचा समभाग. परत समभागाची प्रकृती तोळामासा. १६ ऑक्टोबरचा बंद भाव १२.६८ रुपये. निकालापश्चात तेजीचे वरचे अथवा मंदीचे खालचे सर्किट मारण्याची प्रथा, अशा वेळेला निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा १२.६८ रुपयांच्या जवळ असावा म्हणून १२.५० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर दिला.

२३ ऑक्टोबरच्या वित्तीय निकालानंतर १२.५० रुपयांचा स्तर टिकला तरच पंधरा रुपयांचे पहिले वरचे लक्ष्य सूचित केलेले. प्रत्यक्षात १ डिसेंबरला १५.४० रुपयांचा उच्चांक मारत हे लक्ष्य साध्य झाले. अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत १८ टक्क्य़ांचा परतावा मिळविला. आजही येस बँकेने १२.५० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखला असून, तिचा ४ डिसेंबरचा बंद भाव हा १५.३३ रुपये आहे, जो अगोदर नमूद केलेल्या १५ रुपयांच्या लक्ष्यासमीप आहे.

या लेखातील दुसरा समभाग होता टाटा मोटर्स लिमिटेड. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही २७ ऑक्टोबर होती. १६ ऑक्टोबरचा बंद भाव १२८ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर १२५ रुपये होता. जर निकाल उत्कृष्ट असेल तर १२५ रुपयांचा स्तर राखत १५० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरच विश्लेषण होते. टाटा मोटर्सने निकालापश्चात १२५ रुपयांचा स्तर राखत १२ नोव्हेंबरला १५३ रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या वाचकांकडे टाटा मोटर्स दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले व अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत १७ टक्कय़ांचा परतावा मिळविला. आजही टाटा मोटर्स १२५ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि ४ डिसेंबरचा त्याचा बंद भाव हा १८४ रुपये आहे. (क्रमश:)

ashishthakur1966 @gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.