अजय वाळिंबे

सुमारे ११० वर्षांपूर्वी इम्पेरियल टोबॅको कंपनी या नावाने स्थापन झालेली आयटीसी ही देशातील एक अग्रगण्य एफएमसीजी मार्केटर आहे. सुरुवातीला केवळ तंबाखू आणि सिगारेट उत्पादनात असलेली आयटीसी आज पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग उद्योगासह कृषी, हॉटेल्स, बिस्किट्स, रेडी टू इट, साबण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन तसेच तयार कपडे अशा अनेकविध क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी असून तिची भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून देखील ओळख आहे. आयटीसीची संपूर्ण मालकीची उपकंपनी आयटीसी इन्फोटेक ही एक विशेष जागतिक डिजिटल सोल्यूशन्स प्रदाता आहे. कंपनी लवकरच डेअरी उत्पादनातदेखील पदार्पण करणार आहे. कंपनीकडे सुमारे २६,००० कर्मचारी कार्यरत आहेत.

गेल्या दशकात, आयटीसीच्या नवीन कंझ्युमर गुड्स बिझिनेसजने जागतिक स्तरावरील भारतीय ब्रँडचा एक उत्तम पोर्टफोलिओ स्थापित केला आहे. आशीर्वाद, सनफिस्ट, यिप्पी!, बिंगो!, बी नॅचरल, आयटीसी मास्टर शेफ, फॅबेल, सनबिन, फिआमा, एंगेज, विव्हेल, सॅव्हलॉन, क्लासमेट, पेपरक्राफ्ट, मंगलदीप इ. अनेकविध लोकप्रिय ब्रँड्सनी अल्पावधीतच आयटीसीला मोठय़ा एफएमसीजी कंपनीचे स्थान मिळवून दिले आहे. विल्स, गोल्ड फ्लेक आणि ५५५ हे सिगारेट उत्पादनातील प्रमुख ब्रॅंड आहेत. डिसेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत ५ टक्के वाढ साध्य करून १२,०१३ कोटीवर नेली आहे तर निव्वळ नफ्यात २९ टक्के वाढ होऊन तो ४,१४२ कोटीवर गेला आहे. मंदीच्या वाटवरणात ही कामगिरी सरस असली तरीही करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आर्थिक वर्षांत थोडा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र इतर क्षेत्रांच्या तुलनेत आयटीसीसारखा शेअर तुमच्या पोर्टफोलियोला भक्कम आधार देईल.

संपूर्ण भारत करोनाशी लढत असताना आयटीसीने सामाजिक भान ठेवून १५० कोटी रूपयांचा विशेष फंड स्थापन केला आहे. तसेच सॅव्हलॉन सॅनिटायजर्सची किंमत देखील ७७ रुपयावरुन केवळ २७ रुपयांवर आणली आहे. आयटीसीने आपल्या गुंतवणूकदारांना कायमच भरभरून दिले आहे. आगामी कालावधीतही कंपनी आपल्या भागधारकांना खूष ठेवेल यांत शंका नाही.

सध्याच्या बाजारात अगदी बऱ्याच अनुभवी गुंतवणूकदारांना सुद्धा काय घेऊ आणि काय नको असेहोऊन गेले असेल. सध्या जागतिक परिस्थिती मात्र स्तब्ध आणि एका जागी खिळली आहे. करोनाचे परिणाम हे दूरगामी असल्याने बिघडलेली आर्थिक घडी पुन्हा बसायला नक्की किती काळ जावा लागेल याचा केवळ अंदाजच बांधला जाऊ शकतो. अमेरिकेने जाहीर केलेली मदत किंवा भारतासह इतर देशांनी जाहीर केलेली मदत ही कितपत पुरी पडेल हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळेच एखादा गुंतवणूकदार सध्या शेअर बाजारात किंवा कुठेही गुंतवणूक करीत असेल तर त्याचे कौतुक करायलाच हवे. मात्र ही गुंतवणूक त्याला किती आणि कधी फायद्याची ठरेल हे येणारा काळच ठरवेल.

आजच्या परिस्थतीत ‘माझा पोर्टफोलिओ’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

आयटीसी लिमिटेड

(बीएसई कोड – ५००८७५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १५६/-

लार्ज कॅप

मुख्य उत्पादन : सिगारेट

उद्योग क्षेत्र : एफएमसीजी

बाजार भांडवल : रु. १,९३,२३३ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  ३१०/१३४

भागभांडवल : रु. १,२२९.२२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक   —

परदेशी गुंतवणूकदार    १५.१८

बँक/ म्यु. फंड/ सरकार      ४२.५८

इतर/ जनता ४२.२४

पुस्तकी मूल्य :    रु. ४७.१

दर्शनी मूल्य :     रु.१/-

लाभांश :     ५७५%

प्रति समभाग उत्पन्न : रु. १२.११

पी/ई गुणोत्तर :   १२.८

समग्र पी/ई गुणोत्तर :  १३

डेट इक्विटी गुणोत्तर : ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४१५

रिटर्न ऑन कॅपिटल :   ३४.६

बीटा :   ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.