तृप्ती राणे

एखादं आर्थिक नियोजन करताना सगळ्यात पहिलं काम केलं जातं ते त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाचा जोखीम व्यवस्थापनेचं. त्यात मागील काही वर्षांत मुदत विम्याचा बऱ्यापैकी जागर झाला असल्याने कमी का होईना पण मुदत विमा लोकांनी घ्यायला सुरुवात केली आहे. बऱ्याचदा या मुदत विम्याबरोबर अपघाती मृत्यू फायदा व अपघाती अपंगत्व फायदा हे ‘रायडर’ म्हणून विकले जातात (अर्थात त्यासाठी जास्तं प्रीमियम भरावं लागतं!). या शिवाय वेगळा असा अपघात विमासुद्धा घेता येतो.

तर मग अपघात विमा घ्यावा का? नुसता मुदत विमा पुरेसा आहे का? की मुदत विम्याबरोबर ‘रायडर’ घ्यावे हे प्रश्न सामान्य गुंतवणूकदाराला पडणं स्वाभाविक आहे. तर आजच्या या लेखातून हे तीनही प्रकार आपण समजून घेऊया.

आधी सांगितल्याप्रमाणे, मुदत विमा सर्वाना ठाऊक आहे. शिवाय योग्य विमाछत्र आणि विमामुदत हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. आपण हयातीत नसल्यावर आपल्यावर आर्थिकरित्या अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांची गरज व्यवस्थित जाणून घेऊन आपल्याकडे असलेल्या संपत्ती व कर्जाचा विचार करून आणि त्यावर महागाईचा अंदाज बांधून मग मुदत विमा घ्यावा. मुदत विमा किती वयापर्यंत असावा हे आपल्या आर्थिक जबाबदारी अवलंबून आहे. उदाहरण घ्यायचं तर, वयाच्या उशिराच्या टप्प्यात मुलं झाली की त्यांचे शिक्षणाचे मोठे खर्च हे निवृत्तीपश्चात होतात आणि म्हणून विम्याची मुदत ही वयाच्या ६० वर्षांनंतरदेखील चालू ठेवावी लागते. तोपर्यंत व्यवस्थित संपत्तीसंचय झाला असेल तर गोष्ट वेगळी. मुदत विमा तेव्हा मदत करतो जेव्हा ‘पॉलिसी’ ज्याच्या नावाने घेतली आहे त्या व्यक्तीचा ‘पॉलिसी’ चालू असताना मृत्यू होतो. अशावेळी विम्याचे पैसे ‘पॉलिसी’मध्ये असलेल्या नामनिर्देशानानुसार विमा कंपनी देते. आर्थिक जबाबदारी असणाऱ्या प्रत्येकाकडे मुदत विमा हवाच. तेव्हा हे लक्षात असू द्यावं की, मृत्यू झाला तर पैसे मिळतात अन्यथा मुदत संपली की विमा छत्र संपतं. मुदत विम्याच्या प्रीमियमसाठी कर सवलत उपलब्ध आहे.

आता पाहूया – अपघात विम्यामध्ये  काय आहे ते. अपघात विमा हा दोन प्रकारची जोखीम सांभाळतो. जसे – अपघातामुळे होणारा मृत्यू व अपंगत्व. मुदत विम्यामध्ये आपण फक्त मृत्यू छत्र घेतो; परंतु अपंगत्व (कायमच Total Permanent Disablement & Partial Permanent Disablement, काही काळासाठी Temporary Total Disablement)  हे मुदत विम्यामध्ये येत नाही. अपंगत्वामुळे दोन प्रकारे आर्थिक विवंचना होवू शकते. एक, उपचाराचा खर्च आणि दुसरं, मिळकतीमध्ये होणारं नुकसान. उपचाराचा खर्च कदाचित आरोग्य विम्यामधून निभावता येईल. परंतु मिळकतीवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांचं काय? कदाचित कायमस्वरुपात मिळकत कमी होईल किंवा काहीच न करण्याजोगी स्थिती झाली तर? अशावेळी अपघाती विमा उपयोगी येतो. परंतु एक लक्षात घ्या की, अपघात विम्याच्या प्रीमियमसाठी कोणतीही कर सवलत नाही. शिवाय अतिशय कमी प्रीमियममध्ये एक चांगलं अपघाती छत्र घेता येतं.

आता प्रश्न पडतो की वेगळा अपघाती विमा घ्यावा की मुदत विम्याबरोबर ‘रायडर’ स्वरुपात घ्यावा. अपघाती विम्यातून मिळणारं संपूर्ण संरक्षण हे मुदत विम्यात नसतं. उदाहरण म्हणजे काही काळासाठी किंवा कायमचं येणारं अपंगत्व (Temporary Total Disablement आणिTotal/Partial Permanent Disablement)हे मुदत विमा कवर करत नाही. शिवाय अपघाताशी निगडीत असलेले काही खर्च अपघाती विम्यामधून मिळू शकतात आणि मुदत विम्यातून नाही -मोडलेल्या हाडांच्या उपचारासाठी खर्च, रुग्णवाहिकेचा किंवा अस्थी पोहोचवण्याचा खर्च.

पोर्टफोलियोची कामगिरी

कालावधी : १ जाने. २०१८ ते ७ जून २०१९

सूचना :

– जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

– या सदरात गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.

– सर्व नमूद म्युच्युअल फंड रेग्युलर ग्रोथ प्लानचे असून, यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील; परंतु त्यांचा या सदरातील पोर्टफोलिओंच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.

– म्युच्युअल फंडांचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर यांचा विचार या सदरात केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

trupti_vrane@yahoo.com