|| अजय वाळिंबे

हिंदुजा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी, अशोक लेलँड ही भारतातील व्यावसायिक वाहन निर्मितीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. जगात वापरात येणाऱ्या बसेसचा चौथा सर्वात मोठा निर्माता आणि ट्रकचा १० वा सर्वात मोठा उत्पादक अशी या कंपनीची माहिती देता येईल. कंपनीचे चेन्नईमध्ये मुख्यालय असून तिचे नऊ उत्पादन प्रकल्प अन्यत्र आहेत. त्यापकी सात प्रकल्प भारतात असून उर्वरित दोन परदेशात म्हणजे एक रास अल खैमाह (संयुक्त अरब अमिरात) तर दुसरा लीड्स, ब्रिटन येथे बस उत्पादनाचा प्रकल्प आहे. अशोक लेलँडला अलीकडेच भारतातील ३८ वे सर्वोत्तम ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले आहे.

अशोक लेलँडमध्ये २.५ टन जीव्हीडब्ल्यू (ग्रॉस व्हेइकल वेट) पासून ४९ टन जीटी (ग्रॉस ट्रेलर वेट), १६ ते ८० आसनी बस, डिफेन्स आणि स्पेशल अ‍ॅप्लिकेशन्ससाठी वाहने, आणि औद्योगिक जनरेटर सेट आणि समुद्री अनुप्रयोगांसाठी डिझेल इंजिने तयार केली जातात. भारतातील पहिली इलेक्ट्रिक बस उत्पादन करणारी ही कंपनी भारतीय सन्यदलात तनात असलेल्या वाहनांची मोठी पुरवठादार कंपनी आहे. सात वर्षांपूर्वी आर्थिक मंदीमुळे नुकसानीत गेल्यानंतर कंपनीने पुनर्बाधणी सुरू केली. नंतर कंपनीने सातत्याने २०१८-१९ पर्यंत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीने २८,६१४.०३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २०२६.७७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ३१ टक्के अधिक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत देखील कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित असून स्थिर सरकार, इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेले महत्त्व आणि वाहन उद्योगाला लवकरच लागू होणारे बीएस-६ मानक या सर्वाचा फायदा कंपनीला होईल. कुठलेही कर्ज नसलेली ही हाय-बीटा कंपनी म्हणूनच आकर्षक खरेदी ठरते.

वर्ष २०१३ मध्ये म्हणजे सहा वर्षांपूर्वी हा शेअर याच स्तंभातून २२.६५ रुपयांना सुचविला होता. त्यानंत र शेअरने १५० रुपयांपुढे जाऊन गुंतवणूकदारांना ३०० टक्क्य़ांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. मात्र सद्य भावातही हा शेअर खरेदी केल्यास नवीन गुंतवणूकदारांना दीड दोन वर्षांत ४० टक्के फायदा होऊ शकतो. ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर अजूनही पोर्टफोलियोमध्ये ठेवला आहे त्यांनी तो राखून ठेवावा.