|| आशीष ठाकूर

प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या ‘गोदाकाठचे कैलासलेणे’ या गौरव ग्रंथाच्या अनावरण सोहळ्यात पु.लं.नी ‘निरुत्तर नि:प्रश्न! ’ हा शब्दप्रयोग केलेला. ‘कुरुंदकरयांची ज्ञानोपासना मग त्यात ब्रह्मसूत्र, वेद, उपनिषद असा आध्यात्मिक, राज्यशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, ऐतिहासिक लिखाण, संगीतातील सौंदर्यरचना अशा डझनावारी परस्परविरोधी विषयांवर प्रभुत्व, विद्वत्ता, व्यासंग हे एका माणसाच्या ठायी कसे काय असू शकते, या प्रश्नावर आपण निरुत्तर होतो व हे सर्व साहित्य बहरण्याच्या वयातच दुर्दैवाने अवघ्या पन्नासाव्या वर्षीच या ज्ञानोपासकाचे अकाली निधन होते हे ऐकून जीवन-मरणाच्या खेळातील नियमांबद्दलच आपण नि:प्रश्न होतो,’ असे पु. लं. म्हणाले होते.

पु.लं.च्या या शब्दांची आठवण होण्यामागचे कारण भांडवली बाजाराच्या बाबतीत आज हेच घडत आहे. जगभरात पुन्हा करोनाची दुसरी लाट सुरू होऊन पुन्हा इतर देशांत र्निबध लादले जात आहेत, अर्थव्यवस्थेची प्रकृती तोळामासा असताना निर्देशांक नवनवीन शिखर पादाक्रांत करत असल्याने तर्कसंगत विचारसरणीचे गुंतवणूकदार निरुत्तर आहेत, तर या उच्चांकी स्तरावर भारत हा गुंतवणूकयोग्य देश आहे याचा साक्षात्कार होऊन, परदेशी गुंतवणूकदार संस्था अक्षरश: पाण्यासारखा पैसा म्हणजे थोडेथोडके नव्हे, तर महिनाभरात तब्बल पंचावन्न हजार कोटींची गुंतवणूक या उच्चांकी स्तरावर करत आहेत हे पाहून आपण नि:प्रश्न होतो.

या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ४४,१४९.७२
निफ्टी : १२,९६८.९५

आता चालू असलेल्या तेजीच्या वादळवाऱ्यात आपली जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली काळाच्या कसोटीवर उतरली का? याची आज आपण चिकित्सा करू या.

संभाव्य उच्चांकासाठी आपण निफ्टी निर्देशांकावर ४०० अंशांचा विशाल आणि २०० अंशांचा संक्षिप्त सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) वाचकांना अवगत करून दिला. यासाठी निफ्टीवर १२,७५०चा नीचांक व १२,९५०चा उच्चांक हे दोन केंद्रबिंदू घेऊन वरच्या आणि खालच्या लक्ष्यांची मांडणी केलेली. जेव्हा निफ्टी निर्देशांक १२,९५०च्या पल्याड झेपावेल तेव्हा संभाव्य उच्चांकासाठी १२,९५० मध्ये २०० अंश मिळवल्यावर १३,१५० हे उत्तर मिळाले व सरलेल्या सप्ताहातील बुधवारचा निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक बरोबर १३,१४५ होता. हे लक्ष्य साध्य झाल्यावर मंदीचे आवर्तन सुरू होऊन निफ्टी निर्देशांक १२,७९० वर स्थिरावला हा स्तर बरोबर १२,७५०च्या खालच्या केंद्रबिंदूच्या लक्ष्यासमीप आहे.

येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने सातत्याने १२,७५०चा स्तर राखला, तर निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे अनुक्रमे १३,३५० ते १३,५५० असेल. या स्तरावर गुंतवणूकदारांनी अतिशय सावध होण्याची गरज आहे. कालमापन पद्धतीप्रमाणे डिसेंबरच्या उत्तरार्धात बाजारात घातक उतार संभवतात आणि त्या घसरणीत निफ्टीचे खालचे लक्ष्य हे १२,५०० ते १२,००० असेल. तेव्हा अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी मृगजळामागे न धावता समभागांची नफारूपी विक्री करून आपले मुद्दल व नफा सुरक्षित करणे श्रेयस्कर.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल व त्यांचे विश्लेषण..जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल व त्यांचे विश्लेषण..या स्तंभातील १२ ऑक्टोबरच्या लेखात सामावलेल्या, एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड या समभागाचा निकालोत्तर विश्लेषण करू या. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख २२ ऑक्टोबर होती. ९ ऑक्टोबरचा बंद भाव ६३ रुपये होता व निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ६० रुपये होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर ६० रुपयांचा स्तर राखत ७५ रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरच विश्लेषण होते. निकालापश्चात ६० रुपयांचा स्तर राखत, १९ नोव्हेंबरला समभागाने ७७ रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या वाचकांकडे एल अ‍ॅण्ड टी फायनान्स दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकधारणेंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले व अत्यल्प मुदतीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत १९ टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही एल अ‍ॅण्ड टी फायनान्स ६० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि २७ नोव्हेंबरचा त्याचा बंद भाव हा ८६ रुपये आहे. (क्रमश:)

ashishthakur1966 @gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक