17 February 2019

News Flash

विदेश वारीची आगळी सांगाती

बीएलएस इंटरनॅशनल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड (बीएसई कोड - ५४००७३)

|| अजय वाळिंबे

बीएलएस इंटरनॅशनल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड (बीएसई कोड – ५४००७३)

बीएलएस इंटरनॅशनल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड ही कंपनी परदेशी प्रवास करणाऱ्या बहुतांशी प्रवाशांना माहिती असेल. दशकभरापूर्वी दिल्लीतून केवळ पोर्तुगीज दूतावासासाठी व्हिसा प्रोसेसिंग सेवेला सुरुवात केल्यानंतर आज बीएलएस ३६ राष्ट्रांना ही सेवा पुरवत आहे. अचूक निकष, विशिष्ट कालमर्यादेचे पालन, माहिती तंत्रज्ञानांचे बळ आणि अर्थात गुणवत्तेच्या जोरावर बीएलएस आज जी टू सी म्हणजे सरकार ते ग्राहक सेवा पुरवणारी एकमेव कंपनी आहे. कंपनीच्या सेवांमध्ये व्हिसाच्या पूर्ततेसाठी अर्जदाराच्या अर्जाची छाननी, समुपदेशन, माहितीची पडताळणी, गोपनीयता, पासपोर्ट आणि व्हिसा प्रक्रिया आदींचा समावेश होतो. आज जवळपास ६२ देशांतून आपली सेवा पुरवणाऱ्या बीएलएसने आता भारतात विविध राज्य सरकारांसमवेत करार करून पारदर्शक ई-गव्हर्नन्ससाठी विविध सेवा पुरवत आहे. सुदान, स्पेन, कुवेत आणि रशिया या सारख्या देशातील भारतीय दूतावासांना सेवा पुरवणाऱ्या या कंपनीने आता भारतीय सरकारच्या एकल खिडकी (सिंगल विंडो) योजनेतून सरकारच्या विविध जवळपास २२३ सेवा पुरवण्याची क्षमता निर्माण केली आहे. कंपनीने नुकताच पंजाब सरकारशी विविध सेवा पुरवण्याचा करार केला आहे. या करारानुसार कंपनी पंजाबमधील ११ जिल्हय़ांतून ३५२ केंद्रे चालवणार आहे. या खेरीज कंपनीला इटलीला प्रवास करणाऱ्या सिंगापूरच्या रहिवाशांसाठी व्हिसा प्रोसेसिंगचे कंत्राट मिळाले आहे. स्पेन आणि यूकेनंतर युरोपियन देशांसाठीचे हे कंपनीचे तिसरे कंत्राट आहे. भारतीय शेअर बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अशा प्रकारच्या सेवा पुरवणारी बीएलएस ही एकमेव कंपनी आहे. माहिती तंत्रज्ञानातील आपल्या सेवा विस्तारीकरणासाठी कंपनी प्रयत्नशील असून कंपनीने स्टारफिन इंडिया या बँकिंग क्षेत्राला सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा ७४ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. स्टारफिन हे स्टेट बँकेच्या व्यवसायाशी निगडित असून भारतातील ११ राज्यांतून ती आपल्या सेवा पुरवत आहे. जून २०१८ अखेर समाप्त आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने २०१.३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो १७.१ टक्क्यांनी जास्त आहे. जगभरात २,३२५ कार्यालये असलेली, ९,००० हून अधिक कर्मचारी असलेली आणि आतापर्यंत ३.१ कोटीहून अधिक अर्ज तपासणारी ही एक अनुभवी आगळीवेगळी कंपनी सध्या आकर्षक भावात उपलब्ध आहे. भारतातील तसेच जगभरातील वाढती पर्यटकांची संख्या पाहता तसेच कंपनीची आतापर्यंतची वाटचाल पाहता हा शेअर तुम्हाला दोन वर्षांत उत्तम फायदा मिळवून देऊ  शकेल अशी अपेक्षा आहे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on September 10, 2018 1:55 am

Web Title: bls international services limited