अजय वाळिंबे

आपल्या पोर्टफोलियोच्या पहिल्या तिमाहीचा आढावा रिवाजाप्रमाणे यंदाही घेतला आहे. सध्याची बाजाराची परिस्थिती पाहता ही कामगिरी अनपेक्षित नव्हती. याच काळात बीएसई सेन्सेक्सचा आयआरआर (८५.२७%) आहे तर आपल्या पोर्टफोलियोचा (६०.४२%). म्हणजे तुलनेत कामगिरी तशी सरसच म्हणावी लागेल.

आतापर्यंत सुचविलेले सगळेच शेअर्स राखून ठेवण्यासारखे किंवा अजूनही खरेदी करण्यासारखेच आहेत. मात्र गेले काही आठवडे ‘माझा पोर्टफोलियो’तून सुचविल्याप्रमाणे खरेदी टप्प्याटप्प्याने चालू ठेवा. मधूनच बाजाराने उसळी घेतली तरीही त्यामुळे विचलित होऊ नका. शेअर बाजारात खरेदीची संधी येतच असते याचे भान ठेवा. संयम हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे लक्षात ठेवा.

नवीन आर्थिक वर्षांची (२०२०-२१) सुरुवात झाली आहे. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आर्थिक वर्षांसाठी जाहिर झालेला फुसका अर्थसंकल्प, बेरोजगारी, अनुत्पादित कर्जे आणि आजारी बँका, वाढत्या वित्तीय तुटीचे आव्हान, भारताची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि आता करोनामुळे ठप्प झालेली स्थिती यामुळे आपली आर्थिक घडी बसायला बराच काळ जावा लागणार आहे तसेच यंदाचे आणि आगामी वर्ष बिकट असणार आहेत. गत वर्षांचे आर्थिक निकाल कदाचित बरे आले तरीही करोनाने बारा वाजवल्याने पुढच्या तिमाहीचे चांगले नसणार हे ध्यानात ठेवावे लागेल. यंदा आपल्या आर्थिक प्रगतीचा दर दोन टक्क्य़ांपर्यंत घसरणे अपेक्षित असून सध्या जागतिक मंदीच्या दिशेने वाटचाल चालू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच परिस्थितीचे भान ठेवून गुंतवणूक करणे अभिप्रेत आहे.

*१० रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सचे विभाजन प्रत्येकी दोन रुपयांच्या पाच शेअर्समध्ये २४ मार्च २०२० पासून झाले आहे