|| अजय वाळिंबे

प्रत्येक देशाचे अर्थकारण समजावून घेताना त्या देशाच्या जीडीपी किंवा आर्थिक नियोजनाखेरीज अर्थकारणाशी निगडित अनेक समस्यांचा विचार आणि विश्लेषण करणे आवश्यक ठरते. तसेच देशाचा आर्थिक दर सुधारण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे  किंवा या समस्यांचे मूळ कारण काय याचाही विचार करणे आवश्यक असते. चीनप्रमाणेच भारतही लवकरच महासत्ता बनणार, असा एक मतप्रवाह हल्ली बळावत चाललेला दिसतो. याचे विवेचन खूप विस्तृत प्रमाणात करता येईल. ते सर्व विवेचन येथे करण्याचा उद्देश नाही, परंतु त्यातील एक महत्त्वाचा आणि पटण्याजोगा मुद्दा म्हणजे आपल्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या मागणी-उपभोगावर (consumption theme) डोळा ठेवून अनेक एफएमसीजी किंवा इतर उपभोगाच्या उत्पादनांची वाढती बाजारपेठ. जागतिक अमेरिकन कंपनी वॉलमार्टने फ्लिपकार्टवर ताबा मिळवून भारतात चलाखीने केलेला प्रवेश हा त्याचाच एक परिणाम असावा. त्यामुळे लोकसंख्या ही समस्या असली तरीही प्रचंड वेगाने वाढणारी उपभोग्य वस्तूंची वाढती बाजारपेठ हे भारतासारख्या देशांचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.

त्यामुळेच आपल्या पोर्टफोलियोमध्ये एफएमसीजी किंवा इतर उपभोग्य वस्तूचे उत्पादन करणारी अथवा विपणन करणारी एखादी तरी कंपनी हवी हे ध्यानात ठेवा. आज सुचवीत असलेली इमामी ही कंपनी, तिच्या अनेकविध उत्पादनांमुळे घराघरात पोचला आहे. कंपनीच्या ब्रॅण्ड्समध्ये प्रामुख्याने बोरोप्लस, नवरत्न, फेअर अँड हँडसम, फास्ट रिलीफ, झंडू बाम, मेन्थो प्लस बाम, केसरी जीवन, केशकिंग इ. सुप्रसिद्ध उत्पादनांचा समावेश करता येईल. १९७४ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये सध्या ३०० हून अधिक उत्पादने आहेत. आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी कंपनीने काही वर्षांपूर्वी झंडू ताब्यात घेतली. त्याचा प्रचंड फायदा कंपनीला झालेला दिसतो. त्यानंतर कंपनीने केशकिंग ही आयुर्वेदिक कंपनी देखील ताब्यात घेतली. सध्या इमामी ही जगभरातील एक मोठी आयुर्वेदिक कंपनी मानली जाते. ६०हून अधिक देशांत आपल्या उत्पादनांचे विपणन आणि वितरण करणारी ही एक मोठी भारतीय कंपनी आहे. कंपनीकडे ३१०० कर्मचारी कार्यरत असून कंपनीची आठ उत्पादन केंद्रे आहेत. ३२५० वितरकांकडून आपली उत्पादने वितरण करणाऱ्या इमामीची ४० लाखाहून अधिक किरकोळ दालनांमधून विक्री होते. मार्च २०१८ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने २३५३.९९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३०९.५२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. केवळ २२.७ कोटी रुपयांचे भागभांडवल असलेल्या या कंपनीने १:१ प्रमाणात बक्षीस समभाग जाहीर केले आहेत. कंपनीच्या उत्पादनांना केवळ शहरातूनच नव्हे तर  ग्रामीण भागातूनही उत्तम मागणी आहे. अत्यल्प कर्ज, उत्तम व्यवस्थापन आणि कामगिरीतील सातत्य यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भारतातील चौथ्या क्रमांकाची इमामी म्हणूनच गुंतवणूक योग्य वाटते.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.