अजय वाळिंबे

गुजरात गॅस लिमिटेड (जीजीएल) ही गुजरात स्टेट पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड या गुजरात सरकारच्या कंपनीने स्थापन केलेली कंपनी. जीजीएल ही भारतातील सर्वात मोठी शहर गॅस वितरण कंपनी आहे. कंपनीकडे २५ परवाने असून गुजरात राज्यातील २३ जिल्ह्य़ांमध्ये तसेच दादरा आणि नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश आणि महाराष्ट्रातील पालघरमध्ये कंपनी आपल्या सेवा पुरविते. कंपनीच्या ग्राहकांत निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांचा समावेश होतो.

गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड (जीएसपीएल) ला पूरक अशी गुजरात गॅस लिमिटेडची स्थापना केली गेली आहे. त्यामुळे जीएसपीएलचे नेटवर्क जिथे समाप्त होते त्या प्रत्येक ठिकाणी गुजरात गॅस रिटेल नेटवर्क सुरू होते. यामुळे गुजरातमधील नेटवर्क व्यवस्थापन उत्तम असून सर्व किरकोळ विभागांना गॅस पुरेसा उपलब्ध आहे.

गुजरात गॅसकडे सुमारे २३,२०० कि.मी. गॅस पाइपलाइन नेटवर्क आहे. तसेच जवळपास ४,३४४ सीएनजी स्थानके आहेत. सुमारे १३,५५,००० कुटुंबांना गॅस पुरवणारी जीजीएल दररोज अंदाजे दोन लाख सीएनजी वाहनांना सेवा पुरवते. तसेच सुमारे ३,५४० हून अधिक औद्योगिक ग्राहकांना एमएमएससीएमडी नैसर्गिक वायूचे वितरण करते.

सप्टेंबर २०१९ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी करून २,५१२.९१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५१७.२५ कोटी (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ४१.०७ कोटी) रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तर यंदाच्या सहमाहीसाठी ५,२४०.०७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७५०.९४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. केंद्र सरकार देशभरात प्रदूषणमुक्त आणि स्वस्त नैसर्गिक गॅस पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने कंपनीला नुकतेच राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशचे सीएनजी वितरण कंत्राट मिळाले असून आगामी कालावधीत कंपनी आपली गॅस वितरण सेवा या राज्यांतून सुरू करेल. यंदाच्या वर्षांत आतापर्यंत कंपनीची ६३ नवीन सीएनजी स्टेशन सुरू झाली आहेत.

सध्या २७०च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला दोन वर्षांत उत्तम फायदा देऊ शकेल.

गुजरात गॅस लिमिटेड 

(बीएसई कोड – ५३९३३६)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २७१/-

लार्ज कॅप समभाग

प्रवर्तक : जीएसपीएल

व्यवसाय : नैसर्गिक वायू, सीएनजी

बाजार भांडवल : रु. १८,६६६ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  २७८/११६

भागभांडवल : रु. १३७.६८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ६०.८९

परदेशी गुंतवणूकदार  १२.०६

बँक/ म्यु. फंड्स/ सरकार ५.७३

इतर/ जनता    २१.३२

पुस्तकी मूल्य :        रु. ३१.७

दर्शनी मूल्य :            रु. २/-

लाभांश :      ५०%

प्रति समभाग उत्पन्न :        रु. १४.७८

पी/ई गुणोत्तर :     १८.३४

समग्र पी/ई गुणोत्तर :         २०.५१

डेट इक्विटी गुणोत्तर :        ०.७०

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ५.८९

रिटर्न ऑन कॅपिटल :     १९.१३

बीटा :        ०.८

सबुरीचे फळ..

शेअर बाजारचा निर्देशांक किती चंचल असतो त्याचा प्रत्यय वाचक गुंतवणूकदारांना आलाच असेल.  ३१ डिसेंबर २०१९ अखेर आपल्या २०१९ सालच्या पोर्टफोलिओची वर्षभराची कामगिरी होती ३.४४ टक्के निव्वळ नफा आणि ८.०४ टक्के ‘आयआरआर’. आज केवळ पंधरवडय़ात पोर्टफोलिओचा निव्वळ नफा झाला आहे ९.५ टक्के तर ‘आयआरआर’ २०.४२ टक्के झाला आहे. ‘सब्र का फल मीठा होता है’ याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.