28 February 2020

News Flash

वीकेंड होम गरज, गुंतवणूक की खर्च?

सकाळचा चहा आणि पाऊस, दोन्हीचा डोळे मिटून आणि मन भरून आस्वाद घेत असताना वसंतला जाग आली ती वीणाच्या हाकेने!

|| तृप्ती राणे

सकाळचा चहा आणि पाऊस, दोन्हीचा डोळे मिटून आणि मन भरून आस्वाद घेत असताना वसंतला जाग आली ती वीणाच्या हाकेने!

‘‘अरे वसंत, बघ ना. कसला मस्त प्रोजेक्ट दिसतोय. चारी बाजूला हिरवा निसर्ग आणि एक टुमदार बंगला!! रिटायर झाल्यावर अशा घरात मला राहायला खूप आवडेल. इथे मुंबईत काय ठेवलंय? नुसती धाव धाव आणि पळ पळ. घडय़ाळ्याच्या काटय़ावरचं मेलं आयुष्य. जरा काही जिवाला शांतता नाही. नुसता गोंगाट आणि त्रास. आपलंही एखादं वीकेंड होम झालं तर कित्ती बरं होईल नं. शनिवार-रविवार मस्तपकी तिथे घालवायचा आणि सोमवारपासून सुरू होणाऱ्या धकाधकीची तयारी करायची. हे काय? मीच एकटी बोलतेय. अरे, तू काहीच प्रतिसाद का देत नाही?’’

वसंत तिला चिडवत म्हणाला – ‘‘तू बोलायची थांबलीस तर मी बोलेन ना? डबल फास्ट लोकलसारखी सुटलीस की सुटलीस! आणि काय गं? गेले काही महिने मी बघतोय, तू प्रत्येक वेळी पेपर वाचायला घेतलास की निरनिराळ्या गृह प्रकल्पांची माहिती वाचतेस आणि नंतर त्याचबद्दल बोलत असतेस. बाकी इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचतेस की नाही?’’

हे ऐकून वीणाचा चेहरा असा काय पडला जणू तिचं काही तरी मोठं नुकसान झालं. रागाने फणफणत म्हणाली – ‘‘तुला ना काही समजत नाही. जरा आपल्या आजूबाजूला बघ. लोकांची कशी प्रगती होतेय. आपल्या सोसायटीमध्ये बहुतेक सर्वाचीच वीकेंड होम्स आहेत. तुला कधी आपले शेजारी शनिवार-रविवार घरात दिसतात का? सगळे शनिवारी लवकर उठून जातात आणि दुसऱ्या दिवशी रात्री झोपायला परत येतात. तुला ना मजा करायची माहितीच नाही. बघावं तेव्हा आपलं एकच – कशाला नसता खर्च करायचा? गरज आहे का? असं म्हटलं की संपला संवाद!’’

वीणाचं हे नेहमीचं होतं आणि वसंतला त्याची सवय झाली होती. त्यामुळे ती कितीही चिडली तरी तो मात्र शांतपणे सगळं ऐकून घ्यायचा. त्यांचा हा संवाद म्हणजे एक प्रकारची विक्रम-वेताळाची गोष्टच होती! वीणा चिडणार, वसंतला टोमणे मारणार, मग वसंत तिला समजावणार आणि शांत करणार आणि परत पुढच्या रविवारी हेच वीकेंड होमचं भूत वीणाच्या मानेवर येऊन बसणार. हे सगळं इतकं वसंतच्या अंगवळणी पडलं होतं की, जणू रविवारच्या नियमित यादीमधले एक काम! तर पुन्हा एकदा या विक्रमाने मौन बाजूला सारत वीणाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुरुवात केली.

वसंत तिला समजावत म्हणाला – ‘‘अगं, अशी रागावू नकोस बरं! मलाही हे सगळं दिसतंय आणि तू म्हणतेस तसं मलाही मुंबईचा खरं सांगायचं तर कंटाळा आला आहे. तेव्हा रिटायरमेंटनंतर मलासुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात, शांत आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणाऱ्या प्रकल्पामध्ये राहायला आवडेल; पण त्याला अजून २० र्वष आहेत की बाकी. आतापासून कशाला त्यात पसे घालायचे?’’

वीणा त्यावर पटकन बोलली – ‘‘अरे, आज ही घरं स्वस्त आहेत. शिवाय कर्जही मिळतंय! निवृत्तीनंतर स्वखर्चाने सगळं करावं लागेल. मग तेव्हा पसे पुरले नाहीत तर? आणि तू असा का विचार करत नाहीस, की आज आपण कर्ज काढून जे घर घेणार, ते गुंतवणूक म्हणूनही होईल की. पुढे वाटलं तर चांगली किंमत मिळाली की विकलं!! नाही तर आपल्या वीकेंड आऊटिंगला उपयोगी होईल ना. हॉटेलचा खर्च किती वाचेल बघ.’’

वसंत मनातल्या मनात वीणाच्या वादविवाद कौशल्यावर हसला! या वेळी वीणाने चांगलीच तयारी केली होती. त्यामुळे वसंतला खरा मुद्दा तिला पटवून द्यायला जरा जास्त मेहनत घ्यावी लागणार हे समजत होतं. समोरच्या खणातून पेन आणि डायरी घेत वसंत म्हणाला – ‘‘ये वीणा! चल आज आपण निर्णय घेऊ वीकेंड होम घेण्याचा. जरा मला हे आकडेमोड करायला मदत कर बरं!’’

वीणा हे ऐकून कसली खुलली, जणू काय आताच हातात नवीन घराची किल्ली मिळाली! लगेच चहाचा कप बाजूला ठेवून, वृत्तपत्र हातात घेऊन ती टेबलजवळ येऊन बसली. वसंतला एक प्रोजेक्ट तिने दाखवला आणि म्हणाली – ‘‘हे बघ! अलिबागला कसला मस्त प्रोजेक्ट आहे. बिल्डरने गावासारखा फील ठेवून सगळ्या शहरी सोयी दिल्या आहेत. घोटी स्वतंत्र घरं, पण कॉमन सव्र्हिसिंग आणि मेंटेनन्स. शिवाय बिल्डर म्हणालाय की, जोवर पझेशन मिळत नाही तोवर फक्त १० टक्के रक्कम भरायची. पझेशननंतर ईएमआय भरायचा म्हणजे साधारण तीन वर्षांनी आणि तीन बँकांनी या प्रकल्पाला कर्जाची मंजुरीही दिली आहे. त्यामुळे कर्ज मिळवायलासुद्धा त्रास नाही. काय मस्त आहे ना?’’

वसंत विचार करत म्हणाला – ‘‘चल, आपण असं समजू या, की उद्याच जाऊन हे घर घेतोय. तर आपले पसे असे गुंतवले जातील..

  • अग्रिम रक्कम १०% – रु. ७.५ लाख
  • कर्ज (रु. ६७.५ लाख) – ईएमआय रु. ८५,०००
  • वार्षिक मेंटेनन्स – रु. १.९५ लाख

पुढची महागाई गृहीत न धरता होणारा पझेशननंतरचा मासिक खर्च १ लाख रुपये आणि एकूण २० वर्षांवर होणारा खर्च २ कोटी रुपये! आणि यात आपण हे धरलंच नाहीये की बिल्डरने वेळेवर पझेशन दिलं नाही तर काय होईल. अगं, हे ‘आज घ्या आणि नंतर ईएमआय भरा’ – हा प्रकार काय आहे तुला माहीत नाहीये. जरी पझेशननंतर ईएमआय भरणार, असे बिल्डर सांगतात, तरी कर्ज हे आपल्या नावावर घेतले जाते आणि बिल्डर आपल्या खात्यात ईएमआयचे पसे भरतो. त्याने जर असे केले नाही तर बँक आपल्यामागे वसुलीसाठी लागते.’’

‘‘आता मी तुला एक पर्याय सुचवतो. दर महिन्याला १ लाख रुपये असा खर्च नुसत्या वीकेंड होमवर करण्यापेक्षा, आपण जर ठरवून आणि व्यवस्थित नियोजन करून फिरायला गेलो तर? प्रत्येक वेळी त्या एकाच ठिकाणी जायच्या ऐवजी आपण दर वेळी नवीन जागेचा अनुभव घेऊ. हॉटेलमध्ये चांगला आराम करता येईल आणि मला अगदी खरं सांग की, आपण प्रत्येक वीकेंडला तिथे जाणार का? कारण सणवार, मुलांच्या परीक्षा, पाऊस किंवा फक्त कंटाळा आला म्हणूनसुद्धा आपण कधी कधी बाहेर जात नाही. तर मग वर्षांतून ३-४ वेळा जाण्यासाठी हा एवढा खर्च निर्थक नाही का वाटत तुला? फिरायला मलासुद्धा आवडतं. तर आपण दर वर्षी ठरवून फिरू या की! हॉटेलचा होणारा खर्च वाचवण्यासाठी उगीच मानेभोवती सक्तीच्या खर्चाचा पाश कशाला हवाय आणि तू एक लक्षात घे की, गुंतवणूक म्हणून तू हे घर बघत असशील तर मला त्यात जोखीम जास्त वाटतेय. इतके कर्ज घेऊन जर सगळं व्यवस्थित नाही झालं तर आपलं आर्थिक नियोजन बिघडेल. आपण युविकाच्या आणि युवानच्या उच्च शिक्षणासाठी जो पसा जमवतोय त्यात कमी पडलेलं तुला चालेल का?’’

परत एकदा वीणा हे सगळं ऐकून गप्प बसली. तिला मनापासून जरी हे सगळं पटलं असलं तरी प्रत्येक वेळी वसंत जिंकतो आणि त्याचा मुद्दा व्यवस्थित तिला मान्य करायला लावतो. या गोष्टीने तिला नेहमीच कुठे तरी कमी पडल्यासारखं वाटायचं; पण शेवटी जे योग्य आहे ते मान्य करण्यापासून दुसरा काही पर्याय नाही असं ठरवून तिने वसंतकडे पाहिलं आणि म्हणाली – ‘‘चल, तुला एक कप गरम चहा देते आणि पुढच्या वीकेंडला कुठे जायचं याचा प्लान बनवते..’’

‘घर घ्या घर, सर्व सोयींनी सज्ज, विना जीएसटी, कमी कर्जाच्या हप्त्यावर, रजिस्ट्रेशन/ मुद्रांक शुल्क/ मॉडय़ुलर किचनसकट!’ गेले कित्येक महिने या जाहिराती आला दिवस वृत्तपत्रांमध्ये पान भरून आणि निरनिराळ्या स्कीम्सबद्दल सांगत लोकांना प्रोजेक्टमध्ये गुंतवण्यासाठी प्रलोभित करत आहेत. तेव्हा अशा ठिकाणी गुंतवणूक करताना आपले आर्थिक नियोजन तर विस्कळीत होणार नाही याची खबरदारी घ्या आणि खरंच परवडत असेल तर ‘वीकेंड होम’ घ्या.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

trupti_vrane@yahoo.com

First Published on July 7, 2019 6:08 pm

Web Title: holiday home investment plan mpg 94
Next Stories
1 पायाभूत सुविधांवर भर ‘लाभ’कारक!
2 वाटचाल अर्थसंकल्पानंतर!
3 ट्रम्पचे ट्वीट अन् सोने गुंतवणूकदारांची चांदी
Just Now!
X