निमेश शाह

करोना विषाणूच्या उद्रेकाशी संबंधित घडामोडी आणि त्यातून उद्भवलेल्या अर्थचिंता पाहता, देशांतर्गत आणि जगभरात भांडवली बाजारात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तथापि सध्या बाजाराचे मूल्यांकन स्वस्त आहे. मागे वळून पाहिल्यास अशा घटना दीर्घकालीन समभाग गुंतवणुकीसाठी उपकारक ठरल्याचे सिद्ध झाले आहे. अशी संधी दशकात एकदाच येत असते. याआधी गुंतवणूकदारांना २००८ आणि २००१ सालात अशी संधी मिळाली. तीन ते पाच वर्षांसाठी पैसा टाकणारे गुंतवणूकदार चांगल्या समभागांतून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळवू शकतात. अर्थात पुढे काय होईल याचा अंदाज कोणीही घेऊ शकत नाहीत. त्यामुळे खर्च वजा वरकड ही टप्प्याटप्प्याने गुंतविणेच सुयोग्य.

अगदी रोखे बाजारही सध्या आकर्षक दिसत आहे आणि तेथेही गुंतवणुकीची संधी दिसून येते. येथेही दशकात एकदाच दिसून येणारी कॉर्पोरेट पेपरमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

आमच्या इक्विटी व्हॅल्यूएशन इंडेक्सनुसार (फॅक्टशीटमध्ये प्रकाशित) सध्या बाजार अतिविक्री क्षेत्रात असून आता समभागांत गुंतवणूक करण्याची वेळ आली असल्याचे हा संकेत आहे. करोनाच्या धक्क्य़ामधून बाजार सावरण्याची शक्यता आहे अशी आमची धारणा आहे. तसेच, करोनाचा घात आणि प्रभाव आणखी किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. तथापि या संबंधाने किंचित दिलासादायी बातमी मिळताच बाजार सुधारण्यास सुरुवात होईल. या गृहीतकाला बाधा आणणारा घटक एकच, तो म्हणजे देशात सध्याच्या २१ दिवसांच्या मुदतीपेक्षाही जास्त टाळेबंदी सुरू ठेवण्याची वेळ येऊ नये. टाळेबंदीपायी पुरवठा आणि मागणी या दोहोंबाबत अडथळे निर्माण झाले आहेत. म्हणून नजीकच्या काळात मंदी येण्याची शक्यता आहे. उद्योगजगतदेखील करोना साथीच्या आजाराने ग्रस्त आहे आणि त्याचा परिणाम आगामी तिमाहीत दिसून येईल. नजीकच्या भविष्यात बाजारात फार मोठय़ा तेजीची शक्यता नाही, हेदेखील लक्षात घ्यावयास हवे.

वर्ष २००८-२००९ च्या मंदीचा धडा म्हणजे जेव्हा कंपन्यांच्या मिळकतीमध्ये (उत्सर्जनामध्ये) कपात होईल तेव्हा काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण बाजारपेठ आनुषंगिक भूमिकाच घेईल. आपल्याला हेही लक्षात ठेवावे लागेल की, आठवडय़ापूर्वीच्या निचांक स्तरावरून समभागांच्या किमतीमध्ये सध्या ३०-४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणून, उत्सर्जनाकडे लक्ष देण्याचे कोणतेही औचित्य नाही. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी भारतीय बाजार खूप महागडय़ा स्तरावर पोहोचला होता. म्हणूनच अशा समयी गुंतवणूकदारांना डायनॅमिक अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन उत्पादने आणि रोखेसंलग्न योजनांची निवड करण्याचा सल्ला आम्ही देत होतो.

अस्थिरता हा समभागातील गुंतवणुकीचा एक अविभाज्य पैलू आहे. गेल्या काही वर्षांत ज्यांनी बाजारात प्रवेश केला आहे अशा गुंतवणूकदारांसाठी बाजारातील पडझडीचा हा पहिलाच अनुभव असेल. याआधीच्या २००८ सालच्या संकटात जे तग धरून राहिले त्या भारतीय गुंतवणूकदारांकडून चांगली कमाई झाली आहे. ताज्या पडझडीच्या काळातही आम्ही एक फंड घराणे म्हणून खरेदी करीत आहोत. आठवडय़ाभरात सर्व क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असली तरी सध्याचे मूल्यांकन हे २००८ सालच्या मूल्यांकन स्तराच्या खालीच आहे. अशा स्वस्त मूल्यांकनावर खरेदीची ही चांगली संधी आहे. तथापि, जर गुंतवणूकदार सध्याच्या अनिश्चिततेची चिंता करीत बसले तर येत्या काही वर्षांत अपेक्षेपेक्षा जास्त परताव्याची संधी ते गमावतील, असे खात्रीने सांगता येईल.

ऐतिहासिकदृष्टय़ा असे दिसून आले आहे की जेव्हा जेव्हा बाजार सुधारतो तेव्हा उलथापालथीच्या काळात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना जलद फायदा होतो. समभागच नव्हे तर रोखे बाजार ही सध्या अल्प ते मध्यम मुदतीच्या दृष्टिकोनातून चांगल्या किमतीला आहेत. जोखमीबाबत अतिदक्ष किंवा पारंपरिक गुंतवणूकदार हे अत्यल्प, अल्प आणि मध्यम मुदतीच्या रोखे योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. रेपो दर सार्वकालिक निचांक स्तराला असल्याने उच्च जोखमीची क्षमता असलेले गुंतवणूकदार अ‍ॅक्रुअल फंडात गुंतवणुकीचा विचार करू शकतात.

अलीकडील भांडवली बाजारातील सुधारणेनंतर धातू, खाणकाम, दूरसंचार आणि ऊर्जा क्षेत्रात समभागांमध्ये परताव्याच्या दृष्टीने चांगली क्षमता दिसून येते. तर ग्राहकोपयोगी उत्पादने, नॉन-डय़ुरेबल उत्पादने, वाहन आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट लेडिंगमध्ये कार्यरत बँका, चांगली पतक्षमता असलेल्या आणि ग्राहककेंद्रित पतपुरवठा करणाऱ्या बँकेतर वित्तीय कंपन्यांबाबत आम्ही नेहमीच चोखंदळ सकारात्मक ता दर्शविली आहे. आम्ही निवडक सोने तारण कर्जदार आणि विमा कंपन्यांबाबत सकारात्मक आहोत. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन संरचनात्मक वाढीच्या या कंपन्या लाभार्थी ठरू शकतील.

गेल्या १२ महिन्यांपासून ‘एसआयपी’मध्ये सरासरी गुंतवणुकीचा ओघ ८,२०० कोटींपेक्षा जास्त आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी पसंतीचा मार्ग म्हणून ‘एसआयपी’चा उदय होत असल्याने हा प्रघात कायम राहण्याची शक्यता आहे. बाजारात वादळी चढ-उतार सुरू असले तरी, अशा वेळी सध्याच्या गुंतवणुकीला सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. बाजारपेठेतील सद्य:स्थिती लक्षात घेता गुंतवणूकदारांनी त्यांचे विद्यमान ‘एसआयपी’ आणि म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक ‘टॉप अप’ करावी. कारण आता तुलनेने कमी किमतीत अधिक युनिट्स जमा करणे शक्य झाले आहे.

(लेखक आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी)