|| अजय वाळिंबे

केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (बीएसई कोड ५३२७३२)

वर्ष १९८१ मध्ये स्थापन झालेली केवल किरण क्लोदिंग ही ब्रॅण्डेड तयार कपडे उत्पादन करणारी भारतातील एक मोठी कंपनी आहे. भारतामध्ये जीन्स पँटचा वापर साधारण १९७५ पासून सुरू झाला. सुरुवातीला या नवीन फॅशनला नाके मुरडणारी मंडळीदेखील नंतर जीन्स घालून मिरवू लागली आणि आता तर जीन्स ही केवळ तरुणांसाठीच नव्हे, तर आबालवृद्ध आणि सर्व स्तरांसाठी एक नियमित फॅशन आणि गरज बनली आहे. जीन्सचा वापर आता अगदी लहानात लहान खेडय़ातही होताना दिसतो. सुरुवातीला केवळ परदेशी ब्रॅण्डने प्रचलित असलेल्या जीन्सचे उत्पादन भारतातही सुरू झाले आणि त्यात काही ब्रॅण्ड आघाडीवर राहिले. किलर, ईझीज, लॉमॅन पीजी३ आणि इण्टिग्रिटी हे असेच काही भारतीय जीन्सचे प्रसिद्ध ब्रॅण्ड्स. १९९२ पासून केवल किरण क्लोदिंगने भारतीय बाजारपेठेची नस ओळखून तरुणाईसाठी तयार कपडय़ांची नवीन श्रेणी बाजारपेठेत उपलब्ध केली. काही मोजक्या उत्तम भारतीय ब्रॅण्ड्समध्ये कंपनीच्या ब्रॅण्डची गणना होते. तरुण मुला-मुलींसाठी फॅशनच्या बदलत्या नियमांनुसार कंपनीने आपले स्थान कायम वरच्या स्तरावर ठेवण्यात यश मिळवले आहे. उत्तम विपणन असलेल्या केवल किरणची आज भारताच्या २५ राज्यांत ३६० हून अधिक रिटेल स्टोअर असून, परदेशातही कंपनीच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्वत:च्या स्टोअर्सव्यतिरिक्त कंपनी आपली उत्पादने ऑनलाइन तसेच लाइफस्टाइल, शॉपर्स स्टॉप, सेंट्रल इ. मोठय़ा रिटेल चेन, मॉलमधून विकत आहे. २०१७ हे आर्थिक वर्ष नोटाबंदी आणि जीएसटीमुळे इतर कंपन्यांप्रमाणे केवल किरणलादेखील तसे कठीणच गेले. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनी पुन्हा प्रगतिपथावर आलेली दिसते. मजबूत ताळेबंद असलेल्या केवल किरणने जून २०१८ मध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत १०५.९२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १३.९२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षांच्या तिमाहीच्या तुलनेत तो ६९ टक् के अधिक आहे. भारतामधील वाढत्या तरुणाईची संख्या, तयार ब्रॅण्डेड कपडय़ांना असलेली मागणी आणि उत्पादनांचे उत्तम विपणन जाळे यामुळे कंपनीच्या उत्पादनांना आगामी कलावधीत मोठा वाव मिळेल अशी आशा आहे. अनुभवी व्यवस्थापन, उत्तम ब्रॅण्ड आणि बदलत्या बाजारपेठेत टिकून राहण्याची क्षमता असलेली केवल किरण म्हणूनच आकर्षक वाटते. अत्यल्प कर्ज आणि केवळ १२.३३ कोटी रुपयांचे भागभांडवल असलेली ही कंपनी तुम्हाला येत्या दोन वर्षांत चांगला फायदा मिळवून देऊ शकेल. केवळ ४.४२ टक्के फ्लोटिंग स्टॉक असल्याने हा शेअर तितकासा द्रवणीय (लिक्विड) नाही हेही लक्षात ठेवावे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.