‘मेकॅनिकल अ‍ॅनालिसीस’ ही संकल्पना एका क्लायंटबरोबर (गुंतवणुकदार) झालेल्या चच्रेतून उदयास आली. जून २००८ मध्ये एका महिन्यात सेन्सेक्स ५.२८ टक्क्यांनी घसरला आणि १३,८००च्या पातळीवर रोडावला. जानेवारी २००८पासूनच्या सहा महिन्यांचा विचार केला तर एकूण घट ३५ टक्के. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न – बाजार आणखी किती खाली जाणार?   मीदेखील त्याबाबतीत विचार करू लागलो. एका सोप्या तर्कशास्त्राचा वापर केला. १९९२ आणि २००० मधील उच्चांकांपासून सेन्सेक्स ५६ टक्के खाली आला होता. त्यानुसार २००८ मधील २१,००० या उच्चांकावरुन तो ९,००० पर्यंत खाली येण्याची शक्यता दिसत होती. ९,०००च्या संख्येला आणखी १० टक्क्यांचा अधिभार दिला आणि सेन्सेक्स ८१००च्या पातळीपर्यंत पोहोचेल याची खूणगाठ बांधली. हा १० टक्के जास्तीचा अभिभार देण्यामागे एक सबळ कारण होते. १९९२ आणि २००० मधील वाताहातीला प्रत्येकी एक व्यक्ती आणि तिचे कारनामे जबाबदार होते. २००८ मधील मंदीला जागतिक स्तरावरील मोठया आर्थिकसंस्था जबाबदार होत्या. त्यावेळी बाजारात कशा प्रकारे खरेदी करायची याचा विचार करताना सेन्सेक्सचीच खरेदी करावी याची जाणीव झाली. त्यानुसार सेन्सक्समधील ३० कंपन्यांपकी २५ कंपन्यांची यादी तयार केली. कमी केलेल्या पाच कंपन्यांचे सेन्सेक्समधील भारांकन त्या व्यवसायामधील इतर कंपन्यांमध्ये मिळविले. (नशीबाने कमी केलेल्या पाच कंपन्यांमध्ये ‘सत्यम’चे नाव होते!) सदर ्रगुंतवणूकदाराला बरीच मोठी रक्कम गुंतवायची होती. त्यामुळे या २५ कंपन्यांच्या खरेदीचा प्रस्ताव त्याच्यासमोर मांडला. या प्रस्तावाबाबत त्यांची प्रतिक्रिया होती, ‘‘मला या २५ कंपन्यांचा ट्रॅक ठेवणे जमणार नाही. मी जास्त जोखीम घ्यायला तयार आहे. मला सेन्सेक्सच्या टॉपच्या पाच कंपन्यांमध्येच पसे गुंतवायचे आहेत त्यानुसार नवीन प्रस्ताव तयार करा.’’
या चच्रेनुसार नवीन प्रस्ताव तयार केला. तो तयार करताना त्या पाच कंपन्यांच्या सेन्सेक्समधील भारांकनानुसार त्यांचे आपापसातले भारांकन तयार केले आणि हे सर्व करताना ‘मेकॅनिकल अ‍ॅनालिसीस’ या संकल्पनेने मूळ धरले.
सेन्सेक्समधील टॉपच्या पाच कंपन्यांमध्ये त्यांच्या भारांकनानुसार गुंतवणूक करण्यामागचे लॉजिक – या कंपन्यांचे सेन्सेक्समधील सुमारे ४० टक्के एकत्रित भारांकन असे आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या भावांमधील तेजी-मंदीचा  सेन्सेक्सवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यांचा सरासरी बीटाही १ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तेजीच्या काळात सेन्सेक्सपेक्षा किंचित जास्त परतावा प्राप्त होण्याची शक्यता असते.
‘मेकॅनिकल अ‍ॅनालिसीस’मार्फत किंचित प्रमाणातील थ्रील निर्माण करताना गुंतवणूकदाराच्या मानसिकतेचाही विचार केला आहे. प्रत्येक व्यक्तिगणिक धोका पत्करायची पातळी भिन्न असते आणि त्यानुसार या थिअरीमध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे नमुने बनविता येतात. सामान्यत: तीन प्रकारचे गुंतवणूकदार असतात १) जास्त धोका पत्करणारे, २) मध्यम धोका पत्करणारे, आणि ३) कमी  धोका पत्करणारे. भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज – कलिपदेव, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर, यांच्याबरोबर त्यांची तुलना करता येते. बॅटिंगच्या बाबतीत कलिपदेव सर्वात रिस्की समजला जातो तर सचिन हा ऑफेन्स आणि डिफेन्सचा उत्तम संयोग असलेला जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून ओळखला जातो. सुनील गावसकर हा सुध्दा श्रेष्ठ फलंदाज म्हणून नावाजलेला, परंतु बचावात्मक फलंदाजीवर त्याचा जास्त भर असायचा. या तिघांपकी कपिलदेवची धावा करण्याची गती सर्वात जास्त होती. कोणत्याही क्षणी धोका पत्करायची त्याची तयारी असायची. त्यामुळे कधी कधी संघाचे नुकसानही व्हायचे. परंतु त्याने खेचून आणलेला विजय सनसनाटी असायचा. सचिन हा सुसंगत बल्लेबाज आहे. धोका कधी पत्करायचा याबाबत त्याचे स्वत:चे असे गणित आहे. त्यानेही एकहाती विजय मिळवून दिले आहेत. परंतु त्याचा खेळ बघताना छातीचे ठोके कधी चुकलेले नाहीत. सुनील गावसकरच्या बाबतीत तिसराच प्रकार असायचा. तो आऊट होण्यापेक्षा, कधीही आऊट होणार नाही याबाबत प्रेक्षकांना जास्त खात्री असायची. कोणत्याही परिस्थितीत विकेट देणार नाही हे तत्त्व त्याने कायम जोपासले.
बीएसई सेन्सेक्समधील कंपन्या आणि त्यांचे बीटा यांचा वापर करून ‘मेकॅनिकल अ‍ॅनालिसीस’च्या थिअरीवर तीनही प्रकारच्या गुंतवणुकदारांसाठी, त्यांच्या धोका पत्करायच्या मानसिकतेला अनुरुप असे तीन गुंतवणुकीचे नमुने बनविले आहेत.
या समूहामध्ये सेन्सेक्समधील सर्वात कमी बीटा असलेल्या कंपन्यांचा समावेश केला आहे. आणि सरासरी बीटा आहे ०.४९. त्यामुळे सेन्सेक्सच्या वाढीपेक्षा अर्धा नफा पदरात पडू शकतो आणि सेन्सेक्स खाली जातो तेव्हा गुंतवणुकाराच्या नुकसानीचे प्रमाणही त्याच्या अध्रेच असते.
या थिअरीनुसार मिडकॅप किंवा स्मॉलकॅप निर्देशांकांमधील कंपन्यांचेही समूह बनविता येतात. समूह कोणताही असो, गुंवतणूक करताना एकरकमी गुंतवणूक करण्याचे टाळावे. अशा पध्दतीची गुंतवणूक म्हणजे अनाहुतपणे बाजाराचे टायिमग ठरवून गुंतवणूक करणे. हे टायिमग जर चुकले, तर फायदा तर दूरच, काही वेळा मूळ रक्कमही अर्धी झालेली दिसते. सर्वात बिनधोक आणि कधीही अपयशी न ठरणारी पध्दत आहे- एसआयपी (Systematic Investment Plan)ची! दर महिन्याला किंवा तिमाहीला ठरलेल्या दिवशी ठरावीक रकमेची गुंतवणूक केली तर भावांची सरासरी साधली जाते. त्यातही थोडा बदल केला म्हणजे बाजार १० टक्के खाली गेला असताना पाच टक्के रक्कम वाढविली किंवा ३० टक्के खाली असेल तर १५ टक्के रक्कम वाढविली तर नफ्याच्या प्रमाणात लक्षणीय फरक पडतो.
पर्याय, पध्दत कोणताही वापरा. गुंतवणुकीत खंड पडणार नाही याची दक्षता घेतली व जमावाच्या मानसिकतेकडे काणाडोळा केला तर भाववाढीवर मात करण्यात नक्कीच यशस्वी होता येईल.

सेन्सेक्सचे कपिल!
कंपनीचे नांव                    बीटा    बीटानुसार भारांकन       
हिंडाल्को                            १.९    २०.५ %       
आयसीआयसीआय          १.६४    २०.५ %       
स्टरलाइट इंड.                   १.६२    २०.५ %       
लार्सन अँड टुब्रो                 १.५५    १९.२५%       
जिंदल स्टील                     १.५५    १९.२५%    
सेन्सेक्समधील सर्वात जास्त बीटा असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा सरासरी बीटा आहे १.६६. कंपन्यांच्या भारांकनाप्रमाणे त्यांची खरेदी केली तर सेन्सेक्स जेव्हा १० टक्के वर जाईल तेव्हा गुंतवणूकदाराचा नफा १६.६० टक्क्यांच्या आसपास असेल. उलट सेन्सेक्स जेव्हा १० टक्के खाली गेलेला असेल तेव्हा नुकसानही १६.६ टक्क्यांच्या आसपास असेल.

सेन्सेक्सचे सचिन!
कंपनीचे नांव                   बीटा    बीटानुसार भारांकन       
रिलायन्स इन्ड.              १.०२    २०.५ %       
टाटा पॉवर                        १.०२    २०.५ %       
एचडीएफसी बँक              १.०२    २०.५ %       
इन्फोसिस                       ०.९६    १९.२५%       
मारुती                             ०.९५    १९.२५%    
या समूहामध्ये १ च्या जवळपास बीटा असलेल्या कंपन्यांचा समावेश आहे, आणि सरासरी बीटा आहे ०.९९४. त्यामुळे या समूहाचे नफा-नुकसान सेन्सेक्सच्या हालचालीइतकेच असेल.

सेन्सेक्सचे सनी!
कंपनीचे नांव                     बीटा    बीटानुसार भारांकन       
टीसीएस                             ०.४१    १६%       
हिंदुस्तान युनि.                 ०.४७    १९%       
सन फार्मा                          ०.४९    १९%       
सिप्ला                               ०.५३    २३%       
कोल इंडिया                       ०.५६    २३%    
या समूहामध्ये सेन्सेक्समधील सर्वात कमी बीटा असलेल्या कंपन्यांचा समावेश केला आहे आणि सरासरी बीटा आहे ०.४९. त्यामुळे सेन्सेक्सच्या वाढीपेक्षा अर्धा नफा पदरात पडू शकतो आणि सेन्सेक्स खाली जाईल तेव्हा गुंतवणूकदाराच्या नुकसानीचे प्रमाणही त्याच्या अध्रेच असेल.