02 March 2021

News Flash

अर्थ वल्लभ : मिडकॅप सम्राट

५ जानेवारी २०१८ रोजी गाठलेल्या शिखरानंतर मिडकॅप निर्देशांकाचा माघारी प्रवास सुरू झाला.

(संग्रहित छायाचित्र)

वसंत कुलकर्णी

मागील दीड वर्ष मिडकॅप गुंतवणूकदारांसाठी वावटळीचे वर्ष ठरले. ५ जानेवारी २०१८ रोजी गाठलेल्या शिखरानंतर मिडकॅप निर्देशांकाचा माघारी प्रवास सुरू झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी हे लार्जकॅप निर्देशांक नवीन शिखरे पादाक्रांत करीत असताना एस अँड पी बीएसई मिडकॅप निर्देशांकांचा मागील २३ महिन्यांतील प्रवास नकारात्मक राहिल्याने गुंतवणूकदारांची मिडकॅपकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अजून सकारात्मकतेचा अभाव दिसून येत आहे. मिडकॅप समभागांच्या सध्याच्या किमतीचा विचार केला तर पाच पैकी तीन समभागांच्या किमती त्यांच्या ऐतिहासिक शिखरापासून अजून किमान १७ ते २० टक्के खाली आहेत. जोखीम घेण्याची मानसिकता आणि नकारात्मक परतावा दिसला तरी किमान पाच वर्षे गुंतवणुकीशी वचनबद्धता राखल्यास ही घसरण संपत्ती निर्मितीची एक संधी आहे. मिडकॅप समभागातील अस्थिरतेवर मात करण्यासाठी मिडकॅप फंडांत पद्धतशीर गुंतवणुकीद्वारे (एसआयपी) गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीच्या ज्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधींचे सोने करण्याची क्षमता असलेला निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड हा एक फंड आहे.

मागील ऑक्टोबर महिन्यात निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने २५व्या वर्षांत पदार्पण केले असून २२व्या वर्षांत या फंडाच्या ‘ग्रोथ’ पर्यायाच्या ‘एनएव्ही’ने चार आकडी संख्या गाठली आहे. भारतीय म्युच्युअल फंडांच्या इतिहासात चार आकडी एनएव्ही गाठणारा हा एकमेव फंड आहे. फंडाच्या पहिल्या एनएव्हीप्रमाणे ८ ऑक्टोबर १९९५ रोजी गुंतविलेल्या एक लाखाचे शुक्रवार, २९ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.१२ कोटी रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर २१.६ टक्के आहे. मिडकॅप फंड प्रकारात निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड दीर्घ मुदतीत चांगली कामगिरी करणारा फंड आहे. मूळ मल्टिकॅप प्रकारच्या या फंडाचे सेबीच्या प्रमाणीकरणानंतर, फंड घराण्याने मिडकॅप प्रकारात वर्गीकरण केले. मिडकॅप गटात वर्गीकरण होण्याआधी या फंडाचा मानदंड एस अँड पी बीएसई १०० निर्देशांक होता. त्याऐवजी मे २०१८ पासून एस अँड पी बीएसई मिडकॅप निर्देशांक फंडाचा मानदंड निश्चित करण्यात आला. सुनील सिंघानिया या फंडाचे प्रदीर्घ काळ निधी व्यवस्थापक होते. मनीष गुनवाणी आणि धृमील शहा हे या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक आहेत. चार आकडी एनएव्ही असल्याने कमी युनिट्स मिळतात आणि फंड मालमत्तेने ६,००० कोटींचा टप्पा पार केल्याने फंडाचा अवाढव्य आकार या गोष्टी गुंतवणूकदारांच्या मनात या फंडाच्या निवडीबाबत नकारात्मकता जागृत करतात. ही नकारात्मकता बहुधा ऐकीव गोष्टींमुळे निर्माण होते. वेगवेगळ्या फंड गटातील फंडांच्या कामगिरीचा विचार केल्यास मल्टिकॅप गटात आयडीएफसी मल्टिकॅप (आधीचा आयडीएफसी प्रीमिअर इक्विटी), फ्रँकलिन इंडिया इक्विटी (आधीचा फ्रँकलिन इंडिया प्राइमा प्लस) तसेच लार्जकॅप गटात एचडीएफसी टॉप १०० (आधीचा एचडीएफसी टॉप २००) यांची कामगिरी त्या फंड गटातील कमी मालमत्ता असलेल्या फंडांपेक्षा उत्कृष्ट असल्याचा निष्कर्ष अद्याप कोणी आकडेवारीवर विसंबून काढलेला नाही. निधी व्यवस्थापक किती यशस्वीपणे सक्रिय व्यवस्थापन करतात यावर फंडाची कामगिरी निश्चित होत असते. या फंडाची अस्थिरतादेखील त्या फंड गटातील सरासरीपेक्षा कमी आहे. तसेच या फंडाचा जोखीम-समायोजित परतावा या फंडांना अव्वल तारांकन मिळविण्यास कारणीभूत ठरला तो मोठय़ा मालमत्तेमुळे. मोठय़ा मालमत्ता असलेल्या फंडांची कामगिरी त्यांच्या आकारामुळे बाधित झाली आहे असे अद्याप तरी कोणा विश्लेषकांनी विधान केलेले नाही. गुंतवणुकीसाठी कायम खुले असलेले (ओपन-एंडेड) फंड अनेकदा खराब कामगिरी करणाऱ्या समभागातून वेळोवेळी बाहेर पडतात. फंडांचा आकार मालमत्ता व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण ठरवत असतो. फंड मालमत्ता जितकी अधिक तितका निधी व्यवस्थापन खर्च कमी असल्याने, ही गोष्ट गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडत असते.

या फंडाची पाच वर्षांची एसआयपी कामगिरी व्यापारचक्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांत कमी अधिक प्रमाणात जरी बाधित झाली तरी सात वर्षांच्या कालखंडात तीन वर्षांचा चलत परतावा (रोलिंग रिटर्न) प्रत्येक तिमाहीत संदर्भ मानदंडापेक्षा उजवी राहिलेली आहे. समभाग गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी केली जाते. म्हणून फंड निवड करताना कमी कालावधीपेक्षा दीर्घ मुदतीच्या कालावधीचा विचार करणारे गुंतवणूकदार आपल्या संपत्ती संचयनासाठी किमान पाच किंवा सात वर्षांचा परतावा निश्चित करतात. बदलत्या परिस्थितीत या फंडाचा परतावा या फंडाने दिलेल्या दीर्घकालीन परताव्याइतका निश्चित नसेल तरी भविष्यात या फंडाचा दीर्घकालीन वार्षिक परतावा १० ते १२ टक्के नक्कीच मिळेल, अशी आशा बाळगायला नक्कीच वाव आहे.

shreeyachebaba @gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 4:12 am

Web Title: midcap stocks investment abn 97
Next Stories
1 वित्त शेष : इच्छापत्र
2 माझा पोर्टफोलियो : टाटांची मायक्रो कॅप ‘मुद्रा’
3 क.. कमॉडिटीचा : पाम आधुनिक कल्पवृक्ष
Just Now!
X