आपल्या संदर्भ निर्देशांकातील गुंतवणुकीवरील नफ्यापेक्षा एखाद्या फंडाने गुंतवणुकीवर दुप्पट नफा कमविला असेल तर त्या फंडाची कामगिरी अव्वल म्हणायला हवी. बाजारातील घसरणीमुळे हादरलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा वाटावा अशा या जवळपास सात वर्षांत मुदलाच्या सवा तीनपट वृद्धी देणाऱ्या फंडाचा आपल्या गुंतवणुकीत समावेश नसल्याबद्दल खेद वाटता अशी या फंडाची कामगिरी आहे. मार्च २०११ मध्ये पहिल्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ला केलेल्या रु. १ लाखाच्या गुंतवणुकीचे १६ फेब्रुवारीच्या एनएव्हीनुसार रु. ३.२४ लाख झाले आहेत.

मागील पाच वर्षे आणि विशेषत: केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर भारतातील उपभोग्य वस्तू आणि खासगी क्षेत्राकडून होणारी भांडवली गुंतवणूक या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विदेशी अर्थसंस्था गुंतवणूक करताना दिसत आहेत. याचे कारण अन्य उभरत्या अर्थव्यवस्थांप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था ही निर्यातप्रधान अर्थव्यवस्था नसल्याने जागतिक घटनांचे भारतीय अर्थव्यवस्थेवर फारच कमी परिणाम होतात. भारताच्या लोकसंख्येत ६५ टक्के लोकसंख्या ३५ पेक्षा कमी वयाची आणि ५० टक्के लोकसंख्या २५ पेक्षा कमी वयाची असल्याचा हा परिणाम आहे. दरवर्षी १ कोटी तरुण लोकसंख्या कमवायला सुरुवात करत असल्याने ही लोकसंख्या दरवर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर १.५ टक्कय़ाने वाढवत असते. भारत आणि चीन या दोन अर्थव्यवस्थांतून गुंतवणूक करणाऱ्या या फंडाची सुरुवात मिरॅ असेट इंडिया चायना कन्झ्युमर फंड या नावाने झाली.

फंडाच्या सुरुवातीला गुंतवणुकीचा ६५ टक्के हिस्सा भारतीय कंपन्यांमधून आणि ३५ टक्के हिस्सा मिरे असेट चायना अ‍ॅडव्हांटेज फंडात केला जात असे. सन २०१४ पर्यंत चीनची अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक दराने वाढणारी अर्थव्यवस्था होती, तर निश्चलनीकरण होण्याआधी भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती. चीनच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर कमी झाल्यानंतर फंडाच्या गुंतवणूक धोरणांमध्ये बदल करत भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीतील वाटा ६५ टक्कय़ांवरून ८० टक्क्य़ांपर्यंत वाढविण्यात आला. ३१ जानेवारीच्या फंड फॅक्टशीटप्रमाणे या फंडाने ८०.९६ टक्के गुंतवणूक भारतीय कंपन्यांमधून केली असून १४.७५ टक्के गुंतवणूक मिरॅ असेट एशिया ग्रेट कंझ्युमर फंडात केली आहे.

भारतीय समभागांचा विचार करता फंडाची सर्वाधिक गुंतवणूक अनुक्रमे बँक, बिगर गृहोपयोगी वस्तू, वाहन उद्योग, वाहनपूरक उत्पादने या उद्योग क्षेत्रात केली आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बजाज ऑटो, आयटीसी, स्टेट बँक या कंपन्यांमधून केली आहे. निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीतून एशियन पेंट्स, झी एंटरटेन्मेंट, जिलेट इंडिया, हेरिटेज फुड्स, इक्विटास होल्डिंग्ज या कंपन्या विकून रिलायन्स कॅपिटल, महिंद्रा अँड महिंद्रा, बर्जर पेंट्स, नव्याने नोंदणी झालेला खादिम इंडिया आणि मॅॅट्रोमोनीडॉटकॉम या कंपन्यांचा समावेश केला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सरासरी ४० कंपन्यांचा समावेश असून पहिल्या पाच गुंतवणुका या एकूण गुंतवणुकीच्या २५ टक्के आहेत, तर १० गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या ३८ टक्के आहेत.

हा फंड पहिल्या पाच गुंतवणूक समभागकेंद्रित धोका पत्करून नफा मिळविणारा फंड आहे. एकूण गुंतवणुकीच्या ६५ टक्क्य़ांहून अधिक हिस्सा भारतीय कंपन्यांच्या समभागात गुंतविलेला असल्याने प्राप्तिकराच्या दृष्टीने विचार करता हा फंड फंड्स ऑफ फंड न समजला जाता तो समभाग गुंतवणूक करणारा फंड समजला जातो. (फंड्स ऑफ फंड या प्रकारच्या फंडांच्या नफ्यावर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाप्रमाणे कर आकारणी होते.)

दोन वर्षांपूर्वी मिरॅ असेट चायना अ‍ॅडव्हांटेज फंडाच्या गुंतवणुकीच्या परिघाचा विस्तार केल्याने हा फंड चीनमधील कंपन्यांच्या बरोबरीने एशिया पॅसिफिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाचा मागील ५ वर्षांचा एसआयपी परतावा २०.२२, तर ३ वर्षांचा एसआयपी परतावा २०.०३ टक्के आहे. जागतिक अर्थसंस्थांनी भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थावाढीचा दर मागील पाच वर्षांतील सर्वात अधिक राहण्याची शक्यता वर्तविली असल्याचे प्रतीक या फंडाच्या परताव्यात येत्या दिवसात दिसणे अभिप्रेत आहे.

– वसंत माधव कुळकर्णी

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)