24 January 2020

News Flash

अनिवासी भारतीय गुंतवणूक आणि करदायीत्व  

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. अमेयने सकाळी सकाळी दीक्षितकाकांना फोन केला.

|| तृप्ती राणे

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. अमेयने सकाळी सकाळी दीक्षितकाकांना फोन केला. त्याच्या आवाजातला उत्साह काकांनी नुसत्या त्याच्या ‘हेलो’वरून जाणला. काका काही विचारायच्या आतच त्याने सांगितलं – काका! गेली अनेक र्वष उराशी बाळगलेलं माझं स्वप्न आज पूर्ण झालंय. मला माझ्या आवडत्या कॉलेजात पीजीसाठी प्रवेश मिळाला आहे. माझा व्हिसा पण आला आहे. पुढच्या महिन्यात निघतोय. पण त्याआधी तुम्हाला भेटायचंय. कधी येऊ काका?

काकांनी त्याचं अभिनंदन करत, कधीही भेटायला यायची मुभा दिली. अमेय त्यांच्या मित्राचा मुलगा. चांगला शिकलेला आणि हुशार होता. भारतात कमावतसुद्धा होता. परंतु त्याला पुढे प्रगतीसाठी हवं तसं शिक्षण आपल्या देशात मिळत नसल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आणि मग कुटुंबाची तयारी सुरू झाली. परदेशातील सगळी माहिती मिळवून, योग्य कॉलेजची निवड आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आणि सुदैवाने फार त्रास न होता व्हिसासुद्धा वेळेवर मिळाला. फीची सोय आई-बाबांनी करून ठेवलीच होती. त्यामुळे तसं सगळं व्यवस्थित होतं.

अमेय जेव्हा काकांना भेटला तेव्हा बरोबर त्याचे बाबासुद्धा आले. दीक्षितकाका अनेक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक आणि भावनिक सल्लागार होते. तेव्हा अमेयच्या आनंदात तेसुद्धा अमेयच्या आई-बाबांइतकेच खूश होते. अमेय ज्या वर्षी नोकरीला लागला तेव्हापासून काकांच्या सल्ल्याने गुंतवणूक करत होता. बँकेतील मुदत ठेवी, पीपीएफ, शेअर्स, म्युचुअल फंड आणि आजोबांनी काढलेल्या निरनिराळ्या विमा पॉलिसी असा सगळा पसारा त्याच्याकडे होता. शिवाय सधन कुटुंब असल्यामुळे त्याच्या नावावर स्थावर मालमत्तासुद्धा होती. त्यामुळे त्याला सर्वच बाबतीत काकांचं मार्गदर्शन हवं होतं.

दीक्षितकाका त्याला म्हणाले – अमेय, आजवर तू इथेच कमावत होतास आणि गुंतवणूक करत होतास. त्यामुळे तू एक गुंतवणूकदार म्हणूनसुद्धा निवासी भारतीय (रेसिडेंट इंडियन) म्हणून करत होतास आणि करसुद्धा निवासी भारतीय म्हणून भरत होतास. पण या वर्षीपासून चित्र बदलणार आहे आणि म्हणून तुला आज मी दोन कायद्यांच्या बाबतीत थोडी माहिती देऊ इच्छितो.

त्यावर अमेय म्हणाला – अहो काका, पण आता मी काही कमावणार नाही. पुढची दोन र्वष मी फक्त शिकणार आहे. तर मग त्याने माझ्या बाबतीत फार फरक पडेल का? आपल्याला फक्त कर भरायचा असतो तेव्हाच हे सगळं पाहावं लागतं ना? आणि मी काय परदेशी स्थायिक वगरे नाही होणार. कोर्स संपला की काही काळ तिथला अनुभव घेऊन मग पुढे इथेच परत येणार.

त्यावर काका म्हणाले – आपल्याकडे अनिवासी भारतीयांकडे कर नियमावलीनुसार बघितलं जातं. परंतु ज्या क्षणी कुणी भारत सोडून परदेशी जातो, त्या क्षणी त्याला फेमा लागू होतो, आणि त्याचा परिणाम पुढील गुंतवणुकींवर होतो. उदाहरण द्यायचं तर, अनिवासी भारतीयांना पीपीएफमध्ये गुंतवणूक करता येत नाही. शिवाय कर नियमसुद्धा अनिवासी आणि निवासी भारतीयांसाठी वेगळे आहेत. तेव्हा या सर्वाचा विचार तुला करायला हवा. तुला तुझ्या बँकेतील खाती ‘एनआरओ’ म्हणून बदलून घ्यावी लागतील. तुझं केवायसी अनिवासी भारतीय म्हणून बदलावं लागेल. तू इथे नसताना तुझ्या गुंतवणूक संदर्भातील जे व्यवहार ऑनलाइन होत नसतील त्यासाठी कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) करून घ्यावं लागेल. तुझ्या काही गुंतवणुकीबाबत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. उदाहरण म्हणजे – भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), ‘एसआयपी’ थांबवून रक्कम काढून घेणे किंवा तशीच ठेवणे, इत्यादी शिवाय तू परदेशात गेल्यानंतरसुद्धा तुझा एक भारतीय फोन नंबर चालू ठेवावा लागेल. कारण त्यावर सगळे महत्त्वाचे संदेश मिळत राहतील.  तू स्व-खर्चाने परदेशी जात आहेस, तेव्हा पुढे काही पसे जर तुला लागणार तर तेसुद्धा तुला आज प्लान करावं लागेल. त्यानुसार आपण तुझ्या गुंतवणुकीमधून पसे काढून ते ‘फेमा’अंतर्गत तुला भारताबाहेर पाठवू. तेव्हा आपल्याला कर नियमसुद्धा लक्षात घ्यावे लागतील.

एवढं ऐकून अमेयचे बाबा म्हणाले – पण तो इथे नसला तरी आम्ही आहोत ना. त्याच्या सगळ्या खात्यांमध्ये आणि गुंतवणुकींमध्ये मी किंवा त्याची आई ‘सेकंड होल्डर’ म्हणून आहोत. तेव्हा त्याच्या नावाखाली आम्ही ऑनलाइन व्यवहार तर चालू ठेवूच शकतो ना. त्याशिवाय तो म्हणतोय ना की तो परत भारतात येणार. मग आता त्याला अनिवासी करा, मग पुन्हा निवासी करा, या सगळ्या भानगडी कशाला? आपण जर योग्य कर भरला तर सरकारला तर काही नुकसान होत नाहीये. तर मग आपण का उगीच हे व्यवहार वाढवायचे?

दीक्षितकाका हसून म्हणाले – अरे बाबा! कायदा हा कायदा आहे. त्यात आपण चुकीची कामं कशाला करायची? योग्य नियोजन करून आपण आपली मिळकत व्यवस्थित ठेवायची आणि लागेल तसा कर भरायचा. शिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आज जरी अमेय म्हणत असला की तो परत येईल परंतु असं होईलच याची हमी कुणीही देऊ शकत नाही! जर दोन वर्षांऐवजी त्याला पाच र्वष लागली तर? म्हणून मी सांगतो की नियम पाळा आणि नसती डोकेदुखी टाळा. उद्या सगळं कमावलेलं जर पेनल्टी म्हणून भरावं लागलं तर? तेव्हा सगळं व्यवस्थित करून मग योग्य ते पुढील पाऊल उचलायचा सल्ला आज मी अमेय आणि तुलासुद्धा देईन.

आज आपल्या देशातून बरेच नागरिक शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशी जातात. तेव्हा जायच्या आधी त्यांनी त्यांच्या गुंतवणुकांबाबत आणि कर जबाबदाऱ्यांबद्दल योग्य माहिती घेऊन त्यानुसार काही गोष्टी जायच्या आधी आणि काही परदेशी गेल्यानंतर करायला हव्यात. शिवाय अशा निर्णयामुळे आर्थिक नियोजनामध्ये काही बदलही करावे लागतील आणि म्हणून या सर्वाचा विचार व्यवस्थित व पद्धतशीरपणे करायलाच हवा. या संबंधाने लेखात अगदी काहीच बाबी लक्षात आणून दिल्या आहेत. वाचकांनी निर्णय घेताना तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली, विचारविनिमय करूनच घ्यावा.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

trupti_vrane@yahoo.com

First Published on July 22, 2019 12:46 am

Web Title: nri investment in india mpg 94
Next Stories
1 मौद्रिक धोरण
2 ‘आयपीओ किमती’च्या ४० टक्के मूल्यात उपलब्ध
3 तोलण्या तूट जड भारी, रोख्यांना साज डॉलरी!
Just Now!
X