सध्याच्या जीवतोड महागाईच्या काळात साहजिकच त्याला आपल्या मुलाचे शिक्षण, त्याचे भवितव्य, याची चिंता लागून राहिलेला पालक सापडला नाही, तर आश्चर्यच ठरेल. पण गंमतीची गोष्ट म्हणजे पालकांच्या या भावनांनाच हात घातला जातो आणि त्या भरात मुलाबाळांच्या नावाने चुकीच्या पॉलिसी माथी मारून घेणाऱ्या पालकांची संख्याही आश्चर्यकारकच आहे.
दूरदर्शनच्या पडद्यावर एक मध्यमवर्गीय घरामधील दिवाणखाना दिसतो. समोरासमोरच्या सोफ्यांवर बसलेला दोन व्यक्ती चर्चा करीत असतात. एक असतो छातीवर कंपनीचा बिल्ला लावलेला विमा विक्रेता आणि दुसरा असतो विमा इच्छुक.
त्या दोघांमध्ये जीवन विमा पॉलिसीबाबत चर्चा सुरू असते. इतक्यात त्या विमाविक्रेत्याच्या मागे एक काळे कपडे घातलेला, पांढऱ्या तोंडाचा आणि पांढरी पिसे लावलेला पिशाच्च प्रवृत्तीचा कोणीतरी प्रकट होतो आणि अचकट विचकट हातभाव करून त्या विक्रेत्याला ‘चुकी’चा सल्ला द्यायला प्रवृत्त करतो. विमाविक्रेता मात्र त्याचे काही एक ऐकत नाही. विमा विक्रेत्याच्या चेहेऱ्यावर एकदम सोज्वळ भाव दिसू लागतात आणि तो समोरच्या विमा इच्छुकाला साजेशी पॉलिसी देऊ करतो. तो विक्रेता त्या गुंतवणूकदाराला त्याच्या कंपनीच्या प्रतीक चिन्हाला अनुसरून आयुष्यभरचा पार्टनर बनवितो.
गृहीत धरूयात की तो विमा इच्छुक असतो ३० वर्षांचा प्रकाश. अतिशय मेहेनती आणि कुटुंबवत्सल. नुकताच तो एका चिमुरडय़ाचा बाप झालेला असतो. सध्याच्या जीवतोड महागाईच्या काळात साहजिकच त्याला आपल्या मुलाचे शिक्षण, त्याचे भवितव्य, याची चिंता लागून राहिलेली असते. तो विक्रेत्याच्या रास्त सल्ल्यानुसार आपल्या मुलाच्या नावे ‘मॅक्स लाइफ पार्टनर प्लस’ पॉलिसी घेतो.
पॉलिसीची वैशिष्टय़े :
१) तीन महिन्याच्या बालकापासून ५५ वर्षांच्या व्यक्तीला ही पॉलिसी घेता येते.
२) पॉलिसीची टर्म विमाधारकाच्या वयाच्या ७५ वर्षांपर्यंतची असते.
३) विमा रक्कम किमान ५०,००० रु.
४) विमाधारकाच्या वयाच्या ६१ वर्षांपासून ते ७४ वर्षांपर्यंत दरवर्षी ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात विमाधारकाला प्राप्त होते.
५) विमाधारकाच्या ७५ व्या वर्षी त्याला मॅच्युरिटीची रक्कम प्राप्त होते आणि पॉलिसी संपुष्टात येते.

प्रकाशच्या मुलाच्या पॉलिसीचे विवरण :
मुलाचे वय  :  तीन महिने.
विम्याची रक्कम : रु. ८,४५,७२९
पॉलिसीची टर्म : मुलाच्या वयाच्या ७५ वर्षांपर्यंत.
प्रीमियम : दरमहा रु. ५,०००
प्रीमियमची टर्म : २० वर्षे
पॉलिसीचे लाभ :
कंपनी प्रकाशच्या मुलाला त्याच्या ६१ व्या वर्षांपासून ते ७४ व्या वर्षांपर्यंत दरवर्षी ६३,४३० रु.ची रक्कम देणार. त्याच्या वयाच्या ७५ व्या वर्षांपर्यंत मृत्यूच्या संभावनेमध्ये त्याच्या नामनिर्देशकाला विम्याची रक्कम आणि त्याच्या खात्यात जमा असलेला बोनस प्राप्त होणार. त्या वेळी पॉलिसीच्या शर्तीनुसार आगाऊ दिलेली रक्कम विचारात घेतली जाणार नाही. विमाधारक पॉलिसीची टर्म तरून गेला तर त्याच्या वयाच्या ७५ व्या वर्षी त्याला कमीतकमी ९,०९,१५९ रु. प्राप्त होणार. वित्तीय बाजारातील गुंतवणुकीवर कंपनीला जास्त नफा झाला तर विमाधारकाला जास्त रक्कमही प्राप्त होऊ शकते.
विश्लेषण :
प्रकाशच्या मुलाला ६१ वर्षांनी पुढील १४ वर्षे दरवर्षी ६३,४३० रु.इतकी रक्कम प्राप्त होणार. भाववाढीचा वार्षिक दर १० टक्के गृहीत धरला तर त्या ६३,४३० रु.ची आजची किंमत होते १८९ रु. आणि ७४ व्या वर्षी मिळणाऱ्या ६३,४३० रु.ची आजची किंमत होते ‘रु. थोडक्यात प्रकाश आपल्या मुलाच्या भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्यासाठी आजपासून पुढील २० वर्षे दर महिना १२,००० रु.ची गुंतवणूक करणार का? तर त्याला ६१ व्या वर्षी १८९ रु. (आजची किंमत) आणि ती रक्कम कमी कमी होत जाऊन त्याच्या वयाच्या ७४ व्या वर्षी ‘ रु. मिळणार. मुलाची वाताहात बघायला प्रकाश जिवंत नसणार. ये बात कुछ हजम नही होती. ७५ व्या वर्षी त्या मुलाला ‘गॅरंटेड’७ ९,०९,१५९ रु. मिळणार. भाववाढीनुसार आजची किंमत ७१५ रु. कंपनीने उदार होऊन हमी दिलेल्या रकमेच्या ५ पट रक्कम जरी प्रत्यक्षात दिली (९,०९,१५९x५=४५४५७९५ रु.)  तरी त्या रकमेची आजची किंमत होते ३५७४ रु. प्रकाशने जमा केलेल्या पहिल्या महिन्याच्या हप्त्याच्या (५००० रु.) ७० टक्के.
पॉलिसीबाबत टिप्पणी :
१) प्रकाशने केलेली पहिली चूक म्हणजे त्याने जीवन विम्याच्या पॉलिसीचा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला. जीवन विम्याचा विचार करताना पूर्णत: व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा लागतो. जी व्यक्ती घरात पैसे कमावून आणते आणि त्या पैशावर घराचा चरितार्थ चालतो त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर घरात येणाऱ्या पैशाचा स्रोत बंद होतो आणि घराची आर्थिक घडी बिघडते. हा जो संभाव्य धोका आहे त्याचा समर्थपणे सामना करण्यासाठी आणि फक्त त्यासाठीच जीवन विमा आवश्यक आहे.
२) प्रकाशने लहान बाळाबद्दलच्या भावनेच्या भरात त्याच्या नावे विमा पॉलिसी घेतली. त्या बाळासाठी खरोखरच विमा पॉलिसीची आवश्यकता आहे का? आणि तीही ७५ वर्षांनी मिळणाऱ्या क्षुल्लक परताव्यासाठी? ही कंपनी ‘आपके सच्चे आडव्हायजर’७ म्हणून जाहिरात करून मिरवत असते आणि त्याद्वारे लोकांपर्यंत संदेश पोहोचविते ‘चुकीची पॉलिसी विकण्याचे (गळ्यात बांधण्याचे) दिवस इतिहासजमा झाले आहेत.’ (गळ्यात बांधण्याचे) दिवस इतिहासजमा झाले आहेत.
कंपनीची पॉलिसीच जर ‘झुटी’ असेल तर अ‍ॅडव्हायजर सच्चा राहूच कसा शकतो.  (Mis-selling is a thing of past) सर्वात कळस म्हणजे या पॉलिसीचे घोषवाक्य आहे. ‘रिटायमेंट हो तो ऐसा’ प्रकाशला जर ‘सच्चा अ‍ॅडव्हाइस’ द्यायचा असता तर त्या विक्रेत्याने त्याला त्याच कंपनीची बिननफ्याची प्युअर टर्म पॉलिसी घ्यायला सांगितले असते आणि तीही बाळाच्या नावे नाही तर स्वत: प्रकाशच्या नावे. ५० लाख रु.ची ३० वर्षांच्या टर्मची पॉलिसी त्याने घेतली असती तर वार्षिक प्रीमियमची रक्कम होते १०,६०० रु. तीस वर्षांच्या एकूण प्रीमियमची रक्कम होते ३,१८,००० रु. त्याने बाळाच्या नावे घेतलेल्या पॉलिसीच्या प्रीमियमची एकूण रक्कम होते ७,२०,००० रु. (५०००x१२x२०) दोन्ही प्रीमियममधील फरक ४,०२,००० रु. ही रक्कम प्रकाशने गुंतवणुकीच्या ज्या पर्यायामध्ये आयकरामध्ये सूट मिळते आणि परतावा आयकरमुक्त असतो अशा ठिकाणी ११,४०० रु.प्रमाणे गुंतविली असती तर प्रकाशच्या साठीला आणि त्याच्या मुलाच्या तिशीला त्याच्याजवळ १९,१४,००० रु. इतकी गंगाजळी तयार झाली असती आणि त्या रकमेवर त्याला आणि त्याच्या पश्चात त्याच्या मुलाला आयकर वजा जास्त निव्वळ ६ टक्के परतावा मिळणाऱ्या पर्यायामधून वार्षिक १,१४,८०० रु. इतके उत्पन्न कायमस्वरूपी मिळू शकले असते आणि तेही गॅरंटेड. या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ आहे ७८ टक्के.
प्रकाशने अशाच प्रकारची पॉलिसी पहिल्या दोन नंबरच्या कंप्ोन्यांकडून घेतली असती तर काय झाले असते ते पाहू या. विमा रक्कम- ५० लाख रु. आणि पॉलिसीची टर्म ३० वर्षे. गुंतवणुकीची एकूण रक्कम ७,२०,००० रु. कंपनी क्र. १- क्लेम सेटलमेंट रेशिओ ९७.१ टक्के. वार्षिक प्रीमियम १६,८०० रु.
३० वर्षांचे एकूण प्रीमियम – ५,०४,००० रु.
प्रीमियमच्या रकमेमधील बचत २,१६,००० रु.
ही रक्कम प्रतिवर्षी ७२०० रु.प्रमाणे वरील पर्यायांमध्ये गुंतविली तर प्रकाशच्या ६० व्या वर्षी २,४५,५४७ रु. इतकी गंगाजळी तयार होते.
कंपनी क्र. १ क्लेम सेटलमेंट रेशिओ ९५.४४ टक्के.
वार्षिक प्रीमियम- ६२१० रु.
३० वर्षांच्या एकूण प्रीमियमची रक्कम १,८६,३०० रु.
प्रीमियमच्या रकमेमधील बचत ५,३३,७०० रु.
ही रक्कम दरवर्षी १७,७९० रु.प्रमाणे वरील सेफ पर्यायांमध्ये गुंतविली तर प्रकाशच्या ६० व्या वर्षी २३,३६,२०० रु. इतकी गंगाजळी तयार होते आणि ही रक्कम आयकर वजा जाता ६ टक्के परतावा मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतविली तर प्रकाशला आणि त्याच्या पश्चात त्याच्या मुलाला दरवर्षी आयकर मुक्त अशी १,४०,१०० रु. इतकी रक्कम कायमस्वरूपी प्राप्त होऊ शकते.
आज प्रकाशसमोर दोन पर्याय आहेत. पुढील वीस वर्षांमध्ये ७,२०,००० रु. खर्च करून, ज्याच्या मृत्यूची संभावना जवळजवळ नाहीच, अशा आपल्या तीन महिन्यांच्या मुलासाठी ‘मॅक्स लाइफ पार्टनर प्लस’ नावाची ७५ वर्षांची ८.५० लाख रु.ची पॉलिसी घेऊन त्या पॉलिसीच्या ६१ वर्षांपासून ७४ वर्षांपर्यंत आणि ७५ व्या वर्षी नगण्य असा परतावा पाडून घ्यायचा की – पुढील ३० वर्षांमध्ये तितकीच रक्कम खर्च करून स्वत:साठीची ५० लाख रु.ची पॉलिसी घेऊन, ती पॉलिसी तो तरून गेला तर त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी १९.१४ लाख किंवा ९.५० लाख किंवा २३.३६ लाख रु. इतकी आयकर मुक्त गंगाजळी तयार करायची. अर्थात निर्णय घेणे हे सर्वस्वी प्रकाशवर अवलंबून आहे. कारण पैसे त्याचे आहेत. खरे पाहता प्रकाशजवळ तिसरा पर्यायही आहे. त्याने जर चुकीच्या पॉलिसीमध्ये अगोदरच गुंतवणूक केली असेल तर त्यातून कमीत कमी नुकसानीस बाहेर पडणे आणि योग्य वेळी चुकीची दुरुस्ती करणे.