28 January 2021

News Flash

नावात काय : नामाचा गजर..

सरकारं येतात, बदलतातसुद्धा मात्र अर्थविचार आणि निर्णय याचा ताळमेळ बसला पाहिजे

कौस्तुभ जोशी

सगळी सुखं पैशाने विकत घेता येत नाहीत!

एक वेळ तुम्ही पैशांनी गॅजेट्स विकत घ्याल, पण माणसासारखा माणूस कुठून आणाल?

माणूस येताना येतो तसाच जाताना एकटा जातो, काय करायचा बँक बॅलन्स?

‘नावात काय’ या सदराच्या लेखाच्या सुरुवातीची ही वाक्यं वाचून कदाचित तुम्हाला चुकल्यासारखं वाटेल! पण अशी वाक्यं मनात येऊच नयेत यासाठीच हा नामाचा गजर दोन वर्षांपासून सुरू आहे. माणसाच्या सर्व सुखाचे आणि दु:खाचे मूळ हे गरज आणि असमाधान या चक्रात मोडते. माणसाकडे असलेली संसाधने कमी आणि गरजा किंवा स्वप्नं फारच मोठी. या परिस्थितीत ताळमेळ घालायचा तो कसा? यासाठीच अर्थभान हवे. मात्र हे अर्थभान आणायचे कसे? ते शिकवायची कुठे सोय आहे का? तर याचे उत्तर नाही हे आहे. सर्वसाधारणपणे गुंतवणूक हा विषय कॉमर्सच्या मुलांचा, अशी बालबुद्धी समजूत असणाऱ्या समाजात दुर्दैवाने आपण जगतो. पैसा हे अंतिम ध्येय नसून पैशाच्या मागे धावणारे चुकीच्या वाटेने जातात हे आपल्या मनावर कळत-नकळत बिंबवलं जातं. महाराष्ट्र ही संतांची भूमी असला तरीही तो पासरी तागडी घेऊन चहुकडे फिरणाऱ्या व्यापाऱ्यांचीही भूमी होता हे आपण विसरून कसे चालेल. एकीकडे महाराष्ट्रातल्या बंदरांतून अगदी पार युरोपापर्यंत व्यापार चालायचा हे अभिमानाने मिरवताना आपले साधे आर्थिक निर्णय हे नेमके कसे घ्यायचे हेसुद्धा आजच्या तरुण पिढीला समजू नये हे दुहेरी सत्य पचवण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. मुळात पैसा मिळवणे यापेक्षा मिळालेला पैसा वाढेल कसा? याचा विचार करणे ही एक संपूर्णत: वेगळी प्रक्रिया आहे हे समजून घेणे हीच अर्थ साक्षरतेची पहिली पायरी असते. गुंतवणूक करणे, गुंतवणुकीचा सल्ला घेणे आणि गुंतवणूक सल्लागाराने दिलेल्या सल्लय़ाचा आपण स्वत: अभ्यास करणे या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अमुक एक व्यक्ती येऊन जे फॉर्म देते त्यावर सह्य़ा करून तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा गुंतवण्याचा निर्णय घेता का? असे असल्यास तुम्हाला नामस्मरणाची गरज आहे. मात्र हे नामस्मरण म्हणजे कोणत्या इष्टदैवताचे, ग्रामदेवतेचे नसून ‘अर्थदेवतेचे’ आहे! आपण गुंतवलेला पैसा नेमका कशा पद्धतीने आपल्याला परत मिळणार आहे याची माहिती मिळवणे, त्याचा अभ्यास करणे यासाठी काही मूलभूत संकल्पना आपल्याला यायला हव्या. सरकार, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, व्यापारी धोरण, बँकिंग व्यवस्था, भांडवली बाजार या प्रमुख विषयासंबंधी आपल्याला मूलभूत संकल्पनांची माहिती असणे अत्यावश्यक आहे. एखाद्या कंपनीचा शेअर अचानक झपाझप वाढतो आणि काही कळायच्या आत गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत असलेला शेअर दोन आकडी होतो. गुंतवणुकीचे बेसिक्स पक्के नसलेल्यांचा यामुळे गुंतवणुकीवरचा विश्वास उडतो, मात्र अभ्यासू वृत्ती बाळगून जर मूलभूत संकल्पना शिकून घेतल्या तर निदान होणारे संभाव्य नुकसान टाळता आले नाही तरी कमी करता येऊ शकते.

आर्थिक उद्दिष्टे आणि वैयक्तिक उद्दिष्टे

उच्च शिक्षण पूर्ण करून नुकतेच नोकरी-व्यवसायाला सुरुवात केलेले, नवविवाहित, चाळीशी पार करून मुलाबाळांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलणारे, साठीच्या दिशेने हळूहळू वाटचाल करताना आपल्या आयुष्याचा हिशेब लावणारे आणि वानप्रस्थाश्रम वयातील मंडळी या सर्वानाच काहीतरी मिळवायचं असतं त्या मिळवण्यामध्ये हव्यास, लालसा नसते तर अभिलाषा असते. आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातून एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर चेहऱ्यावर आनंदाचं जे तेज दिसतं त्याचप्रमाणे आपल्या उतारवयात आपणच गुंतवलेल्या पैशाने आपल्याला हव्या त्या वस्तू घेता येण्याचं सुख अनुभवायला तेवढी निष्ठा लागते. मूर्ती साच्यातूनच बनते पण त्या मूर्तीला सजीवपणा येतो तो मूर्तिकाराच्या भावनांमुळे. पदार्थ तेच वापरले जातात पण आपला प्राण त्यात ओतल्यामुळे त्याला घरच्या अन्नाची चव येते.  एवढं प्रेम तुम्ही कमावलेल्या पैशांवर कधी केलंय का?

चला पैशाच्या प्रेमात पडू या!

आपण स्वत: अभ्यास करून एखाद्या गुंतवणुकीबाबतचा निर्णय घ्यावा. एका तज्ज्ञ सल्लागाराचा सल्लासुद्धा घ्यावा, त्यातून आपणच कष्टाने कमावलेले पैसे वाढावेत आणि त्याचे फायदे आपल्याला उपभोगता यावे ही प्रोसेस तुम्ही कधी अनुभवली आहे का?  यासाठी नामस्मरण हवं. सरकार करत असलेला खर्च, सरकारी उत्पन्न, रिझव्‍‌र्ह बँकेची धोरणं, कर्ज बुडतात म्हणजे काय? अमेरिकेत आलेल्या वित्तीय संकटाने भारतातल्या एखाद्या माहिती तंत्रज्ञान उद्योगात काम करणाऱ्या होतकरू इंजिनीअरच्या नोकरीवर गदा येऊ  शकते का? एखाद्या आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित असलेल्या कंपनीचा व्यवसाय कुठल्या तरी देशाच्या सरकारने घेतलेल्या एकाच निर्णयाने संकटात येऊ शकतो का?  कोणतेही अनुकूल सुचिन्ह दिसत नसताना बाजार वर जातो तेव्हा नेमका पैसा कुठून येत असतो? काय असतं लिक्विडिटीचं गणित? रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात वाढ करतो म्हणजे नक्की होतं काय? सरकारने खर्चाला आळा घालण्यासाठी केलेले उपाय प्रत्यक्षात आणले नाहीत आणि वारेमाप खर्च केला तर महागाई कशी येते? एखाद्या देशावर असलेल्या कर्जाचा डोलारा कसा वाढतो? त्याचा नागरिकांवर काय परिणाम होतो? एखादी सुस्थितीत असलेली बँक अचानकच कशी बुडते? अर्थचक्र रुतलेले असताना अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारकडून ‘बूस्टर डोस’ दिला जातो म्हणजे काय करतात? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं नावात काय या माध्यमातून गेली दोन र्वष आपण शोधायचा प्रयत्न केला.

आपल्या देशाचा जगाशी असलेला कनेक्ट चांगलाच वाढला आहे. शाळेच्या बंदिस्त वातावरणात आईवडिलांच्या सुरक्षित वर्तुळात वावरणाऱ्या मुलाला बाहेरच्या जगात गेल्यावर जसे नवनवे अनुभव येतात, बरेच काही शिकवून जातात तसं नवख्या गुंतवणूकदाराचं होऊ  नये. टेस्ट मॅचला सुरुवात करताना हवामान, खेळपट्टी, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची बलस्थानं, कच्चे दुवे यांचा अभ्यास करूनच ज्याप्रमाणे मैदानात उतरावं त्याप्रमाणे सर्वानीच आपले आर्थिक निर्णय घेताना आधी गृहपाठ करायला हवा.

सुदृढ आर्थिक विकासासाठी अर्थविचार

सरकारं येतात, बदलतातसुद्धा मात्र अर्थविचार आणि निर्णय याचा ताळमेळ बसला पाहिजे. शेवटी काय, आपल्याला जे येईल त्यालाच सामोरं जायचंय! असा निराशादायक विचार आपल्या समाजात रुजलेला आहे याचं कारण अर्थविचार सर्वदूर पसरलेले नसतात.  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तर वर्षे होऊनही मूलभूत भौतिक सुविधांची वानवा असणाऱ्या आपल्या देशात अर्थविचार रुजणे खूपच क्रांतिकारी आहे. मात्र त्याची सुरुवात नक्कीच व्हायला हवी. एखादा चुकीचा निर्णय, विचार रेटला जात असेल तर सजग अर्थसाक्षर नागरिक दबावगट निर्माण करून सरकारला चुकीचे निर्णय घेण्यापासून रोखू शकतात हे खूपच मोठे आव्हान आहे याची पूर्ण जाणीव ठेवूनच हा नामाचा गजर दोन वर्षांपूर्वी सुरू केला. सुजाण वाचकांना आजूबाजूच्या घटनांची आपल्याला जाण असली पाहिजे, याची किमान जाणीव झाली असेल हीच अपेक्षा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 12:09 am

Web Title: return on investment investment advice financial objectives zws 70
Next Stories
1 अर्थ वल्लभ : म्युच्युअल फंड सही है
2 माझा पोर्टफोलियो : दुर्लक्षिता न येणारा निर्यातसुलभ मातबरी
3 बाजाराच्या बदलत्या व्यापार चक्रात गुंतवणुकीची संधी
Just Now!
X