श्रीकांत कुवळेकर ksrikant10@gmail.com
कृषिमाल बाजारपेठेचा विचार करता अगदी जागतिक स्तरावर यावर्षी सोयाबीनबद्दल जेवढे लिहिले, वाचले आणि चर्चिले गेले तेवढे यापूर्वी कधीच झाले नसेल. याला कारणच तसे आहे. एखादा अपवाद वगळता मागील दोन दशकांमध्ये सोयाबीनच्या किमतींमध्ये एवढी तेजी कधीच अनुभवायला मिळाली नव्हती. यापूर्वीच्या काळात जेव्हा जेव्हा तेजी आली ती कायमच अल्पकालीन असायची. यावेळी मात्र मागील हंगामाच्या काढणीनंतर लगेचच म्हणजे नोव्हेंबरपासून सुरू झालेली तेजी आज पुढील हंगाम एक महिन्यावर आला तरी संपायचे नाव नाही. जे या परिस्थितीशी अवगत नसतील त्यांच्या माहितीसाठी सांगायचे तर सोयाबीनची किंमत मागील सप्टेंबरमध्ये ३,८०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास होती ती मागील महिन्यामध्ये १०,००० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती. यापूर्वीचा विक्रम ५,००० रुपयांहून थोडा अधिक तोदेखील जेमतेम चार-आठ दिवसांसाठीच होता. शिवाय तो प्रातिनिधिकच होता. म्हणजे त्या भावामध्ये प्रत्यक्ष सौदे फारच कमी झाले होते.

परंतु सोयाबीनमधील या वर्षीची तेजी अगदी शेअर बाजाराला लाजवेल अशी होती. त्याची कारणे अधिक करून जागतिक होती. अमेरिका, युरोप खंड आणि युक्रेन, रशियासारख्या देशांमधील प्रतिकूल हवामान आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सोयाबीन, सूर्यफूल आणि मोहरी या प्रमुख तेलबियांचे घातलेले उत्पादन, चीनची न संपणारी भूक, आणि भारतामध्ये मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी झालेला प्रचंड पाऊस आणि त्यामुळे वाया गेलेले पीक अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम आणि जोडीला करोना प्रकोपामुळे मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये घटलेले पाम तेलाचे उत्पादन हे महत्त्वाचे घटक सोयाबीनमध्ये दीर्घकालीन तेजीला साथ देत राहिले.

या तेजीचा कुणाला, किती फायदा झाला याबद्दल वेगळी चर्चा करता येईल. तसेच शेतकऱ्यांना याचा फायदा किती मिळाला आणि सोयाबीन कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या उद्योगांची त्यामुळे काय परिस्थिती झाली, पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे तेजीच्या शेवटच्या काळात कसे मोडले गेले इत्यादी गोष्टींचीदेखील चर्चा आर्थिक विषयाशी निगडित माध्यमांमध्ये अनेकदा झाली. या सर्वामधील एक समान दुवा म्हणजे जोखीम व्यवस्थापन. जे केले असते तर सोयाबीन कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या उद्योगांना तेजीमुळे झालेले नुकसान वाचवता येऊन आपला उद्योग या कठीण परिस्थितीमध्येदेखील फायदेशीरपणे करता आला असता. तर उत्पादकांनादेखील वायदे बाजाराच्या अनुषंगाने अधिक चांगला भाव मिळवणे शक्य झाले असते. याकरिता वायदे बाजारामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स या दोन्ही प्रकारच्या साधनांची उपलब्धता आणि त्यात चांगली तरलतादेखील एनसीडीईएक्स या कमॉडिटी एक्सचेंजवर उपलब्ध आहे. या साधनांचा वापर करून करता येणाऱ्या जोखीम व्यवस्थापनाबद्दल देखील या स्तंभातून वेळोवेळी लिहिले गेले आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या जोडीला ‘अ‍ॅग्रीडेक्स’ या निफ्टी ५० निर्देशांकासारख्या पण कमॉडिटी निर्देशांकामध्येदेखील जोखीम व्यवस्थापन करण्याचा एक पर्याय म्हणूनदेखील यापूर्वी लिहिले गेले आहे. त्याच पठडीतील ‘सोयडेक्स’ या नवीन निर्देशांकाविषयी, त्याची उपयुक्तता आणि महाराष्ट्रामधील सोयाबीन शेतकऱ्यांना त्यापासून मिळणारे फायदे याबद्दल माहिती करून घेऊया.

अ‍ॅग्रीडेक्स हा सोयाबीन, मोहरी, गवार, कॅस्टरसारख्या विविध प्रकारच्या कृषी माल वायद्यांवर आधारित असलेला निर्देशांक आहे. म्हणजेच निफ्टी ५० प्रमाणे चालणारा हा निर्देशांक आहे. तर सोयडेक्स हा नावाप्रमाणेच सोयाबीन वर्गीय उत्पादनांवर आधारित निर्देशांक आहे. म्हणजेच सोयाबीन आणि सोया तेल या दोन वायद्यांशी समांतर चालणारा हा निर्देशांक असून शेअर बाजारातील ‘बँक निफ्टी’शी त्याची तुलना करता येईल. या सोयडेक्सचे वायदा कॉन्ट्रॅक्ट एनसीडीईएक्स या एक्सचेंजवर लवकरच व्यवहारांसाठी उपलब्ध होणार आहेत.

ज्याप्रमाणे निफ्टी ५० निर्देशांकात व्यवहार केल्यास एकाच व्यवहारामध्ये ५० कंपन्यांच्या समभागांत हिस्सा मिळतो त्याप्रमाणे सोयाबीन आणि सोया तेल या वायद्यांमध्ये वेगवेगळे व्यवहार करण्याऐवजी या दोन्ही कमॉडिटीज्मध्ये एकाच कॉन्ट्रॅक्टद्वारे व्यवहार करण्याची संधी आपल्याला सोयडेक्स वायदा कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये सोयाबीन आणि सोया तेल यांचा वाटा अनुक्रमे ६५ टक्के आणि ३५ टक्के असा असेल. अर्थात त्यात थोडे बदल शेवटच्या क्षणी होतील. सध्या एनसीडीईएक्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध रिअल-टाइम पद्धतीने हा निर्देशांक उपलब्ध असून, वायदे कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध झाल्यावरच त्यात व्यवहार शक्य होईल.

या निर्देशांकाचा फायदा सोयाबीन प्रक्रियाधारक, जे दोन्ही पदार्थ आपल्या उद्योगांमध्ये वापरत असतात, ते अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. केवळ एकाच कॉन्ट्रॅक्टमधून दोन्ही वस्तूंच्या किमतींचे जोखीम व्यवस्थापन झाल्यामुळे दोन वेगवेगळ्या व्यवहारांसाठी एक्सचेंजला द्यावे लागणारा मार्जिन मनी यापुढे केवळ एकाच व्यवहारावर द्यावा लागेल. त्यामुळे खेळत्या भांडवलाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊन त्याचा आर्थिक फायदा होतो. तर किरकोळ गुंतवणूकदारालासुद्धा कमी पैशात दोन व्यवहार करण्याचे फायदे मिळतात.

इंडेक्समध्ये द्यावे लागणारे मार्जिनदेखील खूपच कमी असणार आहे. आणि त्यात बाजारातील अनिश्चिततेवर आणि इतर घटकांवर आधारित वेळोवेळी द्यावी लागणारी अधिकची तात्कालिक मार्जिन्स द्यावी लागणार नसल्यामुळे खेळत्या भांडवलाचा एखादा भाग राखीव ठेवण्याची आवश्यकतादेखील लागणार नाही.

त्याबरोबरच आपण नेहमी पाहतो की, किरकोळ किंवा डिलिव्हरी-मुक्त अल्प मुदतीचे गुंतवणूकदार संधी असूनही कमॉडिटी बाजाराच्या वाटेला जाताना दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे त्यात डिलिव्हरी घ्यायची पाळी आली तर ती शेअर बाजाराएवढी सुलभ नसते. म्हणून नसती भानगड नको या भीतीपोटी ते कमॉडिटी बाजाराकडे पाठ फिरवताना दिसतात. त्यामुळेच सोयाबीन असो किंवा चणा, त्यात मिळणारे लाभ मिळविण्यापासून वंचित राहतात. परंतु सोयडेक्सचा फायदा हा आहे की, तो डिलिव्हरी-मुक्त असतो. त्यामुळे सोयाबीन असो किंवा सोया तेल, दोन्हींमध्ये खरेदी किंवा विक्री केल्यास वायदा समाप्तीला भावातील फरक आधारित रोखीने सेटलमेंट होत असते. डिलिव्हरीची भीती गेल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनादेखील या इंडेक्समध्ये नशीब अजमावायला संधी मिळेल. सोयाबीन आणि सोया तेल हे जागतिक बाजारातील प्रमुख कृषी वायदे असल्यामुळे आणि येथील किमती बऱ्याच प्रमाणात तेथील घटकांवर आधारित असल्यामुळे  सोयडेक्समधील व्यवहार एक प्रकारे थेट जागतिक कमॉडिटी बाजारात व्यवहार करण्याचे समाधान देतील.

जे अधिक परिपक्व गुंतवणूकदार असतात त्यांच्यासाठी आणि म्युच्युअल फंडांसाठी तर या निर्देशांकातील व्यवहारांमुळे कमॉडिटी बाजारात केवळ सोयाबीनच्याच वेगवेगळ्या काँट्रॅक्टसमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या महिन्यातील समाप्तीचे फ्युचर्स, ऑप्शन्स आणि इंडेक्स यापैकी एकाच वेळी एकामध्ये खरेदी आणि दुसऱ्यात विक्री अशा व्यवहारांद्वारे १०० टक्के जोखीममुक्त नफा मिळवणे शक्य होणार आहे. याला स्प्रेड किंवा आर्ब्रिटाज व्यवहार असेही म्हणतात. या कारणानेही सोयडेक्सची प्रतीक्षा फायद्याची ठरेल.

नुकताच अशा प्रकारचा ‘ग्वारेक्स’ हा निर्देशांक ‘एनसीडीईएक्स’ने व्यवहाराला खुला केला असून, गवार बिया आणि गवार गम या दोन कमॉडिटीजवर आधारित या निर्देशांकामध्ये मागील काही दिवसांत गवार बिया आणि गम यामध्ये आलेल्या जोरदार तेजीचे प्रतिबिंब उमटले आहे. ज्यांना गवार ही कमॉडिटी समजते त्यांना व्यवहार करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. परंतु हे पीक प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरात, हरियाणा या राज्यांमध्ये घेतले जात असते. तेथील उद्योगांना आणि शेतकऱ्यांना त्यात फायदा आहे. महाराष्ट्रासाठी सोयाबीन प्रमुख पीक असून या वर्षी तर महाराष्ट्र कदाचित मध्य प्रदेशला मागे टाकून देशातील प्रथम क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक बनेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सोयडेक्सचा फायदा आपल्या राज्यातील उत्पादकांना अधिक होईल.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक