|| अजय वाळिंबे

महाराष्ट्र सीमलेस लि. (बीएसई कोड – ५००२६५)

महाराष्ट्र सीमलेस ही डी पी जिंदाल समूहाची एक महत्वाची कंपनी. १९९१ मध्ये म्हणजे २७ वर्षांंपूर्वी सीमलेस् पाइप हे आयात पर्यायी उत्पादन करण्यासाठी महाराष्ट्रातील रोह्य़ाजवळ नागोठणे येथे महाराष्ट्र सीमलेसचा महत्वाकांक्षी प्रकल्प उभरण्यात आला. प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामग्री एमडीएच या जर्मन कंपनीच्या तांत्रिकी सल्लय़ानुसार अमेरिकेहून आयात करण्यात आली. १९९२ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वयित झाल्यापासून कंपनीने सीमलेस पाइप खेरीज कोटेड पाइप, ग्रील पाइप, ईआरडब्ल्यू पाइप, प्रीमियम कनेक्शन पाइप तसेच ऑइल कंट्री टय़ुब्युलर इ. विविध उत्पादने सुरू केली. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी असून कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे १६ टक्के उलाढाल निर्यातीची आहे. साधारण तीन वर्षांनंतर यंदा पोलाद उद्योगाला बरे दिवस आले आहेत. त्यातून सरकारने पोलाद आयातीवर अ‍ॅंटी डंपिंग डय़ुटी लावल्याने त्याचा फायदा महाराष्ट्र सीमलेससारख्या कंपन्यांना झाला आहे. कंपनीने सप्टेंबर २०१८ साठीचे आर्थिक निष्कर्ष नुकतेच जाहीर केले आहेत. कंपनीने गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत विक्रीत ४५.६१ टक्के वाढ नोंदवून ती ७०२.८३ कोटीवर गेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल १६०.४२ टक्के वाढ होऊन तो ८८.४९ कोटीवर गेला आहे. तर सप्टेंबर २०१८ अखेर संपलेल्या सहामाहीसाठी कंपनीने १,३१०.२६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १८८.८४ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनिकडे पुढील सहा महिन्याच्या साधारण १,००० कोटी रुपयांच्या ऑर्डर असून आगामी दोन वर्षे कंपनीसाठी उत्तम असतील. कंपनीच्या वाढत्या निर्यातीमुळे ढासळत्या रूपयांचा नकारात्मक परिणाम कंपनीच्या आर्थिक निष्कर्षांवर होणार नाही. त्यामुळे आगामी दोन वर्ष कंपनीकडून उत्तम आर्थिक कामगिरीची अपेक्षा आहे. उत्तम आणि अनुभवी प्रवर्तक, पोलाद उद्योगासाठी आलेले चांगले दिवस आणि त्याला मिळणारी सरकारची साथ तसेच कुठलेही कर्ज नसलेली महाराष्ट्र सीमलेस म्हणूनच आकर्षक खरेदी ठरू शकते. साधारण ४५० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर दोन वर्षांत ५० टक्के फायदा देऊ शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.