* दत्ता मांडवे, बोरिवली
माझे वेतनातून मिळणारे उत्पन्न रु. पाच लाखापेक्षा कमी आहे. मला विवरणपत्र भरणे गरजेचे आहे का?
उत्तर : सरकारी अधिनियमानुसार ज्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न रु. पाच लाखापेक्षा कमी असेल आणि त्यांनी काही शर्तीची पूर्तता केली असेल तर त्यांना आयकर विवरणपत्र भरणे गरजेचे नाही. त्या शर्ती अशा- त्यांचे करपात्र उत्पन्न रु. पाच लाखापेक्षा कमी पाहिजे. त्या उत्पन्नात फक्त एकाच मालकाकडून मिळालेल्या वेतनाचा समावेश हवा व बचत खात्यावरील व्याजाचा (जे रु. १०,००० पेक्षा कमी आहे) समावेश हवा. बचत खात्याचे व्याज आणि पॅन नंबर हे मालकाला कळविले पाहिजेत. आपला संपूर्ण कर वेतनातून मालकाने कापलेला असावा.

* जी.डी. मुसाळे
मी एमटीएनएलमध्ये काम करतो. २०१३-१४ साठीचे आयकर विवरण ३ ऑगस्ट २०१३ रोजी भरले आहे. मला आयकर विभागाकडून कलम १३९ (९) अन्वये नोटीस आली आहे. मी ई-फायिलग अकाऊंट उघडल्यास कळफ टछ फाइल जोडण्यास सांगत आहे. कृपया, मला कळफ टछ फाइल जोडण्यासंबंधी माहिती द्यावी आणि आयकर विभागाच्या नोटीसला कसे उत्तर द्यावे त्याविषयी मार्गदर्शन करावे.
उत्तर : आपण आपले आयकर विवरण हे ३ ऑगस्ट २०१३ रोजी ऑनलाईन दाखल केले आहे. आपले विवरणपत्र हे अपूर्ण असल्याकारणाने आपल्याला कलम १३९ (९) अन्वये आयकर विभागाकडून नोटीस आली आहे. आपल्याला त्याकरिता दुसरा फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये आपल्याला Part-A General मध्ये Return Filed Under Section अंतर्गत १८ – १३९ (९) हा विकल्प निवडून आपण आधी दाखल केलेल्या विवरणपत्रात ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करून आपल्याला टछ फाइल तयार करता येईल व ती टछ फाइल आपल्याला अपलोड करावी लागेल.

आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com

* राजेश भोयर
मी गेल्या तीन वर्षांपासून कुवैतमध्ये काम करतो आहे व त्याच्या दोन वर्षे आधी दुबईमध्ये काम करत होतो. मी भारतात असताना आयकर विवरणपत्र भरत होतो. आताल्ल  माझा अनिवासी भारतीय दर्जा आहे व माझे भारतात कोणतेही उत्पन्न नाही. तर मी आयकर विवरणपत्र भरले पाहिजे का? जर हो, तर कसे?
उत्तर : आपण गेली पाच वर्षे नोकरीनिमित्त भारतात नाहीत. त्यामुळे तुमचा अनिवासी भारतीय हा दर्जा आहे. आपले भारतात कोणतेही उत्पन्न नसेल तर आपल्याला आयकर विवरण भरणे बंधनकारक नाही. आपण ऐच्छिकरीत्या विवरणपत्र ऑनलाइन भरू शकता.

* अपर्णा भाटवडेकर, अंधेरी
मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझे बँकेतून मिळणाऱ्या व्याजाचे उत्पन्न हे रु. ३,२५,००० आहे. मी ८० सी कलमाखाली रु. एक लाखाची गुंतवणूक करते. माझे करपात्र उत्पन्न हे रु. २,२५,००० इतके आहे. त्यावर मला कर भरावा लागत नाही. मला आयकर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे का?
उत्तर : आपले एकूण उत्पन्न हे रु. २,५०,००० पेक्षा जास्त आहे. आयकर कायदा कलम १३९ अन्वये एकूण उत्पन्न हे जर अतिज्येष्ठ नागरिकांसाठी रु. पाच लाख, ज्येष्ठ नागरिकांसाठी रु. दोन लाख ५० हजार आणि इतर नागरिकांसाठी रु. दोन लाखापेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. हे उत्पन्न मोजताना ८० सी ते ८० यू कलमाद्वारे मिळणाऱ्या वजावटी विचारात घेतल्या जात नाहीत. त्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

* रेखा वाकडे, बोरिवली
मी मागील वर्षांसाठी ऑनलाईन विवरणपत्र मुदतीत दाखल केले होते. विवरणपत्र दाखल केल्यानंतर मला काही चुका आढळून आल्या, मुदत ठेवींवरील व्याज आणि बचत खात्यावरील व्याज मी एकूण उत्पन्नात जोडलेले नव्हते. आता मी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करावे.
उत्तर : आपण विवरणपत्र मुदतीच्या आत दाखल केले असले तर कलम १३९ (५) अन्वये रिव्हाईज्ड विवरणपत्र त्या वर्षांपासून एक वर्षांच्या मुदतीत किंवा कर निर्धारण होण्यापूर्वी दाखल करू शकता. विवरणपत्र भरताना आपल्याला मिळालेल्या मुदत ठेवीवरील व्याज आणि बचत खात्यावरील व्याज आपल्या उत्पन्नात जोडून त्यावर येणारा कर व्याजासहित भरावा लागेल.

* बलवंत दांडेकर, ठाणे<br />कलम ८० डी मधील तरतुदीनुसार स्वत:च्या अगर कुटुंबाच्या सुरक्षात्मक आरोग्य चिकित्सेसाठी केलेला खर्च हा वजावटीस पात्र ठरतो का? माझा ‘मेडिक्लेम’चा हप्ता नसल्यामुळे वजावटीस पात्र खर्चाची मर्यादा किती?
उत्तर : ८० डी कलमानुसार मागील वर्षांपासून सुरक्षात्मक आरोग्य चिकित्सेसाठी केलेल्या रु. ५,००० पर्यंतच्या खर्चाची वजावट मिळू शकते. परंतु ८० डी कलमानुसार ज्येष्ठ नागरिकांना एकूण वजावट रु. २०,००० आणि इतरांसाठी रु. १५,००० आहे. (मेडिक्लेम, विमा हप्ता आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचा खर्च मिळून.) त्यामुळे आपल्याला विमा हप्ता नसल्यामुळे रु. ५,००० पर्यंतच वजावट मिळू शकते.