तृप्ती राणे

हा हा म्हणता या वर्षांचे नऊ  महिने गेले! अर्ध आर्थिक वर्ष करोनाच्या टाळेबंदीत संपलं. साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तापासून टाळेबंदीची सुरुवात झाली. दुसरा, चाहूल लागू न देता सटकला आणि तिसरासुद्धा येऊन गेला. गुढीपाडव्यानंतरचे सण कधी आले आणि कधी गेले कळलंच नाही. आता दसऱ्याचंच बघा ना. कुठे नवरात्रीचा गाजावाजा नाही की तरुणाईने बहरलेला दांडिया नाही. फुलांनी भरलेला बाजार नाही की खरेदीची गर्दी नाही. एक विषाणू आला आणि त्याने आपल्या शिकण्याची, काम करण्याची आणि जगण्याची पद्धत बदलून टाकली आणि तेसुद्धा कमीत कमी वेळात. आपल्या सांस्कृतिक पद्धतीसुद्धा त्यासमोर नमल्या, सगळे सणवार घरातल्या घरात राहून नातलगांबरोबर व्हिडीओ मीटिंगमध्ये का होईना, साजरे झाले! अगदी देवालासुद्धा लॉकडाऊन पाळावा लागला म्हणजे बघा ना! घरातील देव्हारा फुलांविना आणि मंदिर भक्ताविना अजून किती दिवस राहणार आहेत हे फक्त करोना जाणे असं म्हणायची वेळ आली आहे!

एक व्यक्ती म्हणून मी जरी करोनाचा राग राग केला, तरीसुद्धा एक गुंतवणूकदार म्हणून मी करोनाचे आभार मानते. आपल्या आर्थिक परिस्थितीची खरी जाणीव त्याने करून दिली. आपलं आर्थिक नियोजन किती योग्य आहे हे आपल्याला कळलं. कुठे आपत्कालीन निधीच्या तरतुदीचा अभाव, कुठे गरजेपेक्षा जास्त जोखीम, कुठे निरनिराळ्या गुंतवणुकीचा गुंता तर कुठे कर्जाचा डोंगर.. गेल्या सहा महिन्यांमध्ये हेच प्रश्न अनेकांच्या पोर्टफोलिओ संदर्भात पाहायला मिळाले. अशी आर्थिक परिस्थिती कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. मग यासाठी काही करता येईल का? अन् तेवढय़ात माझ्या नजरेसमोर स्टीफन कोवे यांचं – The Seven Habits of Highly Effective People हे पुस्तक आलं! १९८९ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकामध्ये स्वत:मध्ये बदल आणण्यासाठी काय  करावं याबाबत खूप सुंदर पद्धतीने आणि सोप्या भाषेत विवेचन केलेलं आहे. या पुस्तकामध्ये नमूद केलेले सात नियम हे गुंतवणुकीमध्ये यश मिळवण्यासाठीसुद्धा तितकेच फायदेशीर होतील असं मला वाटलं आणि म्हणून आजचा लेख.

१. स्वयंप्रेरित सक्रिय राहा (Be Proactive)- सक्रिय राहणं याचा अर्थ आपला पैसा हा बचत खात्यात साचून न राहता, गुंतवणुकीच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय राहिला तरच त्यातून चक्रवाढ परतावे मिळू शकतील, परंतु याचा अर्थ असाही नाही की कुठे तरी गुंतवणूक करून ठेवली की झालं! सक्रियता म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर तिची कामगिरी तपासणं आणि वेळेवर निर्णय घेऊन तिच्यातील पैसे कमी किंवा जास्त करणं.

२. पूर्वनियोजन (Begin with the End in Mind) – आपल्या खात्यात पैसे यायच्या आधी त्या संबंधाने योजना तयार करा. खात्यात पैसे जमा झाले रे झाले की पहिली गुंतवणूक आणि मग खर्च हे समीकरण जितक्या लवकर डोक्यात पक्कं कराल तितकं उत्तम. पण गुंतवणूक नक्की का करतोय हा प्रश्न पहिला विचारा. कारण प्रत्येक पैशाची भविष्यातील जागा नक्की केली की त्यानुसार गुंतवणूक पर्याय ठरवता येतात. अशाने चुकीच्या पर्यायांमध्ये पैसे अडकत नाहीत आणि उगीच कुठंतरी खर्चसुद्धा होत नाही.

३. प्राधान्यक्रम निश्चित करा (Put First Things First) – जे महत्त्व वेळेच्या नियोजनाला आहे, तेच महत्त्व गुंतवणुकीच्या बाबतीतसुद्धा लागू होतं. सर्वात पहिली आपण गुंतवणूक आपल्या खऱ्या गरजांसाठी केली पाहिजे. आणि मग हौस-मौजेसाठी. तेव्हा पहिला पगार हातात आल्याबरोबर गाडीसाठी कर्ज न काढता, रिटायरमेंटची तरतूद करा.

४. सुवर्णमध्य महत्त्वाचा (Think win-win) – सर्वसाधारणपणे आपल्यातील अनेक जणांना एका विशिष्ट परिस्थितीला सामोरं जावं लागतं –  कोणत्या उद्दिष्टाला जास्त महत्त्व देऊ? रिटायरमेंट की मुलांचं लग्न? पुढच्या काळासाठी पैसे साठवताना आज किती मन मारू? तर या अशा प्रश्नांना एक सरळ उत्तर कधीच मिळत नाही. म्हणून सारासार विचार आणि त्यानुसार कृती करून निर्णय घ्यावा. जितकं वास्तववादी राहता येईल तितके उत्तम, पण शेवटी भावनासुद्धा महत्त्वाच्या आहेत! अगदीच काही गेंडय़ाची कातडी पांघरून सगळ्यांनाच नाही जगता येत. पण काही मिळवायचं म्हटलं तर प्रयत्नांची पराकाष्ठा ही आलीच. तेव्हा मला नाही जमणार असं न म्हणता जमवायचा निर्धार पक्का करा. ‘मन के हारे हार हैं मन के जीते जीत’ म्हटलंय ते उगीच नाही.

५. स्वत:ला जाणून घ्या (Seek to understand first, before making yourself understood) – गुंतवणूक समजून घ्यायच्या आधी, स्वत:ला जाणून घ्या. तुमच्या कोणत्या सवयी तुमच्या फायद्याच्या आहेत आणि कोणत्या सवयींमुळे तुम्हाला गुंतवणुकीत नुकसान होऊ  शकतं हे जितकं चांगलं आणि लवकर तुम्हाला कळेल तितकं तुम्हाला फायद्याचं असेल. कारण स्वत:ला व्यवस्थित ओळखणारा गुंतवणूकदार चुकीचे, क्लिष्ट, न समजणारे गुंतवणूक पर्याय घेत नाही. शिवाय, पैसे गुंतवायच्या आधी सारासार विचार करतो आणि भलत्या मोहाला बळी पडत नाही. असा गुंतवणूकदार मग गुंतवणुकीचादेखील चांगला अभ्यास करतो, योग्य प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करतो, आणि नसेल पटत तर नाहीसुद्धा म्हणतो.

६. तज्ज्ञांचे मार्गदर्शनातून शिका (Learn to synergize) – जे  काम ज्याला चांगलं जमतं त्याच्याकडून ते करून घ्यावं. याचा अर्थ तुम्हाला एखादी गुंतवणूक समजत नसेल तर त्या संदर्भात योग्य व निष्णात व्यक्तीकडे जा. त्या व्यक्तीचा कोणत्या विषयात सखोल अभ्यास आणि अनुभव आहे हे जाणून घ्या आणि मग मार्गदर्शन घ्या. इथे थोडे पैसे खर्च झाले तरी चालतील पण पुढे गुंतवणुकीत नुकसान होण्यापासून वाचाल.

७. ज्ञानाला अद्ययावत करा (Sharpen the Saw) – जसं सुरी किंवा करवतीला वेळोवेळी धार काढावी लागते, अगदी तसंच आपल्या गुंतवणुकीबाबतच्या ज्ञानालासुद्धा अद्ययावत करावं. कोणते नवीन प्रकार बाजारात आले आहेत, कोणत्या गुंतवणुका कालबाह्य़ झाल्या आहेत, हे वेळोवेळी माहिती असलं की गुंतवणुकीत दीर्घकाळ किंवा जास्त नुकसान होत नाही. वेळीच निर्णय घेऊन कमीत कमी नुकसान करून नव्या गुंतवणुकीची सुरुवात करता येते.

वरील सात नियम हे पुस्तकातून आलेले आहेत. आणि आता सगळीकडे सेल चालू आहेत ना म्हणून अजून तीन नियम ‘फ्री’ देत आहे!

८. जगात कुठलीही गोष्ट फुकट नसते (There is no free lunch in the world) – आपण प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही किंमत मोजतो. अगदी वरकरणी फ्री असणारा व्हॉट्सअ‍ॅपसुद्धा प्रत्येक क्षणाला आपली कोणती माहिती कशी वापरतोय हे आपल्याला कळतसुद्धा नाही. जिथे भरपूर फायदा आणि तोसुद्धा कमी वेळात दिसतोय तिथे धोक्याची घंटा वाजलीच पाहिजे.

९. गुंतवणूकदार की व्यापारी हे ठरवा (Investor or Trader) – गुंतवणूक दीर्घकालीन असल्यास गुंतवणूकदाराला वाट ही बघायलाच हवी. शेती एका दिवसात होत नाही. आंब्याला फळं लगेच लागत नाही. काही गुंतवणुका तर चायनीज् बांबूसारख्या असतात, अनेक वर्षे हलतच नाहीत आणि मग त्यांना इतका जोर येतो की एकाच वर्षांत सगळं वसूल (ताजे उदाहरण, रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर!). परंतु ज्याला दिवसागणिक मिळकत हवी आहे, त्याला ट्रेडिंगशिवाय पर्याय नाही. आणि डे ट्रेडिंगसाठी भरपूर वेळ हवा आणि नियम वेगळे असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदाराने याच्या फंदात न पडलेलं बरं.

१०. गरजा आणि मर्यादा यांचे भान राखा (Deserve before you Desire) – आजच्या डिजिटल युगामध्ये प्रलोभनं आपल्याला त्यांच्या पाशात अडकवायला टपून असतात. आपलं स्टँडर्ड कसं वाढेल, लोकांवर कसा प्रभाव पाडता येईल अशा प्रकारे भुरळ पाडून आपल्या खिशावर अनेकांची नजर असते. तेव्हा कोणतीही खरेदी करताना हा प्रश्न विचारा – मी असं काय केलंय ज्याच्यासाठी मला ही वस्तू मिळायला हवी? गरजेच्या पैशातून निर्थक खरेदी बंद करा. सर्व सटर-फटर खरेदी अशा प्रकारच्या नियमामुळे कमी होईल आणि आपल्या मेहनतीच्या कमाईला योग्य गुंतवणुकीची संगत लाभेल.

एखाद्या वाळवंटामध्ये जसा पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असतो, तितकाच लाख मोलाचा आपण कमावलेला पैसासुद्धा आहे. वर्षांनुवर्षे ढोर मेहनत करून पै न् पै आपण साठवतो. मग सुखी आर्थिक आयुष्य जगण्याचा आपला अधिकार हा आपल्याला मिळालाच पाहिजे. प्रत्येक गुंतवणूकदाराने वरील नियम ध्यानात घेऊन जर अंगीकारले तर नक्कीच फायदा होईल. आणि हा फायदा नुसता एका पिढीपुरता मर्यादित न राहता जर पुढल्या पिढीनेसुद्धा अंगीकारला तर मग सोने पे सुहागा का नाही होणार. या दहा नियमांच्या मदतीने अज्ञान आणि नुकसानरूपी रावणाचा वध करून येणाऱ्या दिवाळीसाठी सज्ज होऊ या!