28 February 2021

News Flash

फंडाचा ‘फंडा’.. : गुंतवणुकीच्याकर कार्यक्षमतेचे कसब

रोखे गुंतवणूक ही बिनधोक नसते हे गुंतवणूकदारांनी हे समजावून घ्यायला हवे.

|| भालचंद्र जोशी

बहुतांश गुंतवणूकदार जोखीम समजण्यास आणि आर्थिक बाबींबाबत अज्ञानामुळे, निश्चित परतावा हमीच्या मोहाने कष्टाच्या कमाईवर कमी परतावा मिळवितात. या उलट दीर्घ मुदतीच्या रोखेसंलग्न फंडांतील गुंतवणुकीवरील करपश्चात लाभ हा बँक मुदत ठेवींपेक्षा अधिक असतो, हे समजून घ्यायला हवे..

भारतात बँकांच्या मुदत ठेवी इतके लोकप्रिय दुसरे गुंतवणूक साधन नाही. करोना कालावधीत बँकांच्या मुदत ठेवींमध्ये करोनापूर्व ३ लाख कोटींवरून ६ लाख कोटींपर्यंत वाढ झाल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेची सांख्यिकी सांगते. मागील वर्षभरात म्हणजे मार्च २०२० अखेरपासून रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरात कपात केली. परिणामी बँकांनी त्यांच्या ठेवीदरात कपात करूनही बँकांच्या ठेवी मात्र दुपटीने वाढ झाली. करोना विषाणू प्रसारामुळे वाढलेल्या अस्थिरतेत साहजिकच गुंतवणूकदारांनी सर्वात सुरक्षित अशा मुदत ठेवींमध्ये बचत गुंतविली.

व्याजदरात कपातीचे सर्वाधिक लाभार्थी रोखे गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड ठरले. बहुतांश गुंतवणूकदार जोखीम समजण्यास आणि आर्थिक बाबींबाबत अज्ञानामुळे, निश्चित परताव्याच्या हमीच्या मोहाने कष्टाच्या कमाईवर कमी परतावा मिळवितात. रोख्यांमध्ये गुंतवणूक असणाऱ्या फंडातून मिळणारा परतावा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी मुदत ठेवींपेक्षा कर कार्यक्षम असूनही केवळ हमी  परताव्याच्या मोहाने कर कार्यक्षम गुंतवणूक पर्यायांकडे दुर्लक्ष केले जाते. तीन वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कालावधीत दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावर प्राप्तिकर निर्देशांकाचा (इंडेक्सेशन) लाभ मिळत असल्याने बँकांच्या तीन वर्षांपेक्षा अधिक मुदतीच्या मुदत ठेवी कर कार्यक्षमतेच्या दृष्टीने कूचकामी ठरतात. तर दीर्घ मुदतीच्या रोखेसंलग्न फंडांतील गुंतवणुकीवरील करपश्चात लाभ हा बँक मुदत ठेवींपेक्षा अधिक असतो.

मध्यम ते दीर्घ मुदतीच्या रोखेसंलग्न फंडांनी तीन वर्षांच्या कालावधीत ९.७५ टक्के ते ८.२५ टक्क्य़ांदरम्यान आणि अल्प कालावधीतील फंडांनी तीन वर्षांत ९.२५ टक्के ते ८.६५ टक्क्य़ांदरम्यान परतावा दिला आहे. या फंडातील तीन वर्षांच्या गुंतवणुकीवरील ३० टक्के करकक्षेतील करदात्यांना त्यांच्या करपश्चात उत्पन्नात बँक मुदत ठेवींपेक्षा तीन वर्षांत ६ ते ७ टक्के जास्त लाभ झाल्याचे आकडेवारी सांगते. तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीतच नव्हे तर सर्व कालावधीदरम्यान समान मुदतीच्या ठेवींपेक्षा रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडावर झालेला भांडवली लाभ मिळालेल्या व्याजापेक्षा अधिक आहे. चढय़ा महागाई दरामुळे भारतात जगाच्या तुलनेत व्याजदरसुद्धा अगदी अलिकडच्या काळापर्यंत दोन आकडय़ात होते. ताजा अपवाद महागाईचा दर ४ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने नियंत्रित व्याज दरात (रेपो दर) कपात झाल्याने बँकांच्या मुदत ठेवींचे दर कमी झाले.

रोखे गुंतवणूक ही बिनधोक नसते हे गुंतवणूकदारांनी हे समजावून घ्यायला हवे. परंतु या गुंतवणुकीत असलेली जोखीम समजून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जोखीम व्यवस्थापित केल्यास कर तरतुदींचा लाभ घेऊन मुदत ठेवींपेक्षा परतावा वाढविता येतो. रोखे गुंतवणूक फंडामध्ये तीन प्रकारचा धोका दर्शविला जातो. पहिला व्याज दर वाढण्याची जोखीम. ज्याला रोखे गुंतवणुकीत ‘डय़ुरेशन रिस्क’ असे म्हणतात. जर रोख्यांच्या किमती खाली आल्या तर परतावा वाढेल. या उलट, जर रोख्यांच्या किंमतींमध्ये घट झाली तर परतावा कमी होईल. व्याज दर आणि रोख्यांच्या किंमती यात व्यस्त संबंध असतो. म्हणजे नियंत्रित व्याज दर कमी झाले तर रोख्यांच्या किंमतीत वाढ होते. आणि व्याज दर वाढले की रोख्यांच्या किंमती घटतात. रोखेसंलग्न फंडात गुंतवणूक करणारे सध्या आनंदी आहेत. कारण व्याज दरात घट झाल्याने रोख्यांच्या किमती वाढल्याने रोखे गुंतवणूकदारांना भांडवली लाभ झालेला दिसत आहे. रोखेसंलग्न गुंतवणुकीतील दुसरी जोखीम पत कमी होण्याची जोखीम ‘क्रेडिट रिस्क’ म्हणून ओळखली जाते. कर्जदाराकडून वेळेवर व्याज आणि मुद्दल मिळण्याशी संबंधित जोखीम म्हणजे क्रेडिट रिस्क. खरेदी केल्यापासून मुदतपूर्तीपर्यंत कधीही पतनिर्धारण कंपनीकडून रोख्याची पत खालावल्यास रोख्याची बाजारातील किंमत कमी होईल आणि ‘मार्क टू मार्केट’ तरतूद करावी लागल्याने परतावा कमी होईल. त्यामुळे फंड निवडताना फंडांच्या पोर्टफोलिओमध्ये उच्च पत असलेले  रोखे आहेत सुनिश्चित करणे गरजेचे असते.

तिसरी जोखीम म्हणजे कमी व्याजदरावर पुनर्गुतवणूक गुंतवणुकीतील रोख्यांची मुदतपूर्ती झाल्यानंतर मिळालेले मुद्दल हे कमी व्याजदरांच्या रोख्यांमध्ये पुन्हा गुंतविले गेले तर परतावा कमी होईल. जर गुंतवणुकीतील रोख्यांची सरासरी मुदतपूर्ती जास्त असेल तर पुनर्गुतवणुकीचा धोका कमी असतो. मागील चार-पाच वर्षांत रोखे फंडांचा ‘बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड’ हा फंड प्रकार कमालीचा लोकप्रिय झाला तो अव्वल पत असलेल्या आणि रोख्यांच्या मुदतीचे सक्रिय व्यवस्थापन असल्यामुळेच. वर्षभर चालणाऱ्या या सदरातून, म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत वाचकांची अर्थसाक्षरता वाढावी याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे सदर वाचकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देणारे सदर असून वाचक सहभागही अपेक्षित आहे.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक आणि मुख्य परिचलन अधिकारी.

bhalchandra.joshi@whiteoakindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 12:05 am

Web Title: the art of investing tax efficiency akp 94
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी योग्य
2 क.. कमॉडिटीचा : बाजार विकासाचा मार्ग
3 बाजाराचा तंत्र-कल : वाईट नाही हेच चांगले!
Just Now!
X