05 August 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : मंदी न शिवलेले क्षेत्र..

शेअर बाजारात काय किंवा इतर क्षेत्रात काय कितीही मंदी असली तरी औषधे, खाद्य पदार्थ आणि दारू यांची विक्री कायम चालू राहते.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

शेअर बाजारात काय किंवा इतर क्षेत्रात काय कितीही मंदी असली तरी औषधे, खाद्य पदार्थ आणि दारू यांची विक्री कायम चालू राहते. त्यामुळेच एफएमसीजी, औषधी कंपन्या आणि अर्थात मद्य विक्री करणाऱ्या कंपन्या पोर्टफोलिओत असल्या तर मंदीवर यशस्वीपणे मात करता येते.

आज सुचविलेल्या युनायटेड स्पिरिट्सचा इतिहास तसा मोठाच म्हणावा लागेल. १८२६ मध्ये मद्रासमध्ये अँगस मॅक्डोवेल या स्कॉटिश माणसाने स्थापन केलेली मॅक्डोवेल ट्रेडिंग कंपनी अनेक स्थित्यंतरे पाहात, २००६ मध्ये युनायटेड स्पिरिट्समध्ये रूपांतरित झाली. मधल्या काळात ती विठ्ठल मल्या आणि त्यानंतर त्यांचे पुत्र विजय मल्या यांच्याकडे होती. त्यांच्या कार्यकाळात म्हणजे २००६ नंतर कंपनीने ब्रॅंड व्हॅल्यूला महत्त्व देऊन अनेक नामांकित ब्रॅंड ताब्यात घेतले. पुढे २०१४ मध्ये डिआजियो या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीने ५४.८ टक्के हिस्सा ताब्यात घेऊन युनायटेड स्पिरिट्सला आपली उपकंपनी केले. आज देशभरात कंपनीची ५० उत्पादन केंद्रे असून बंगलूरुमध्ये अत्याधुनिक टेक्निकल सेंटरदेखील आहे. स्थानिक लोकांच्या चवीनुसार मद्य निर्मिती करण्यासाठी २५ तंत्रज्ञ येथे काम करीत आहेत. कंपनीने स्वतचे निर्माण केलेले मॅक्डोवेल नं.१, रॉयल चॅलेंज आणि सिग्नेचर हे ब्रॅंड भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्या खेरीज कंपनीकडे जवळपास ५० जगप्रसिद्ध ब्रॅंड आहेत यात प्रामुख्याने जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, स्मिरनॉफ, वॅट ६९, डायरेक्टर स्पेशल, बॅगपाईपर, अ‍ॅंटिक्विटी, जे अँड बी, बेलीज आयरिश क्रीम इत्यादींचा समावेश होतो.

कंपनीचे सप्टेंबर २०१९ रोजी समाप्त तिमाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र जून २०१९ अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने २२१८.४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १९७.४ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल १४० टक्क्य़ांनी अधिक आहे. गेली पाच वर्षे कंपनीने सरासरी २२.२३ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनी लाभांश देत नाही तसेच मद्य निर्मितीच्या क्षेत्रातील इतर कंपनीचे किंमत उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर पाहता तुलनेत युनायटेड स्पिरिट महाग वाटू शकेल. मात्र डिआजियो पीएलसी या सुप्रसिद्ध आणि बलाढय़ कंपनीची उपकंपनी, अनुभवी आणि उत्तम प्रवर्तक तसेच कंपनीचा ब्रॅंड पोर्टफोलियो पाहता युनायटेड स्पिरिट्स एक आकर्षक दीर्घकालीन खरेदी ठरू शकते.

युनायटेड स्पिरिट्स लि.

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६०९

(बीएसई कोड – ५३४३२)

लार्ज कॅप समभाग

व्यवसाय : मद्य निर्मिती

बाजार भांडवल : रु. ४४,२७४ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. ६८० / ४५२

भागभांडवल : रु. १४५.३३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ५६.७५

परदेशी गुंतवणूकदार  २२.३४

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ७.२१

इतर/ जनता    १३.७०

पुस्तकी मूल्य : रु. ४३.१

दर्शनी मूल्य :   रु. २/-

लाभांश :  –%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. १०.५८

पी/ई गुणोत्तर :     ५५.३

समग्र पी/ई गुणोत्तर :    १४.६

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.८२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :     ६.७२

रिटर्न ऑन कॅपिटल : २०.९५

बीटा :    ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2019 2:18 am

Web Title: united spirits stock market abn 97
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : भेटींचा सदुपयोग!
2 बाजाराचा तंत्र कल : अपेक्षित सुधारणा
3 कर बोध : शेअर्स व्यवहार आणि लेखापरीक्षण
Just Now!
X