कालपासून नवीन आर्थिक वर्षांला सुरुवात झाली. जानेवारीपासून बाजारात घसरण होऊन देखील दीर्घकालीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या पदरात सरलेल्या वर्षांने भरघोस परतावा टाकला. नवीन आर्थिक वर्षांतील बाजाराच्या वाटचालीबाबतचे अंदाज आता विविध कोनांतून येऊ लागतील. पुढील वर्षांत असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे भविष्यातील राजकीय स्थैर्याबद्दलची साशंकता आणि खनिज तेलाचे चढय़ा भावांमुळे महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे एकूण बाजारात अनिश्चितता आहे. नवीन वर्षांत मागील वर्षांइतका भरघोस परतावा जरी मिळाला नाही तरी २००८ नंतर जागतिक अर्थव्यवस्थेचा दर समाधान वाटावे अशा ४ टक्के पातळीवर आहे. या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नवीन वित्त वर्षांत काही गोष्टींची दाखल घेणे क्रमप्राप्त आहे.

वित्तीय नियोजकाच्या भेटीची वेळ निश्चित करा

नवीन वित्त वर्ष सुरू झाल्यावर गुंतवणूकदारांनी काही गोष्टी करायच्या असतात. जसे की आरोग्य तपासणी, पेन्शनधारकांना हयातीचा दाखला द्यावा लागतो, त्याप्रमाणे नवीन आर्थिक वर्षांत आपल्या वित्तीय सल्लागाराला भेटणे ही गोष्ट ‘हे केलेची पाहिजे’ या गटात मोडणारी आहे. काही गुंतवणूकदार जे स्वयंप्रेरणेने ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक करीत असतात त्यांनीही त्यांच्या वित्तीय ध्येयांचा आढावा घेणे गरजेचे आहे. एखाद्या वित्तीय ध्येयापासून मागील वर्षी तुम्ही किती लांब होता आणि नवीन वर्षांच्या सुरुवातीला त्यात काय बदल झाला आहे, याचा आढावा घेणे आवश्यक आहे. मागच्या वेळेला जेव्हा वित्तीय नियोजनाचा आढावा घेतला, तेव्हा सेवानिवृत्ती पश्चातच्या उपभोगासाठी २०२५च्या सुरुवातीला समजा दोन कोटी रकमेची आवश्यकता होती, त्यापैकी मागील वर्षी ४० टक्के ध्येयपूर्ती झाली होती. मागील वर्षांत बाजाराने दिलेल्या दमदार परताव्यामुळे नवीन वर्षांत ५५ टक्के ध्येयपूर्ती झाली आहे. या पद्धतीने प्रत्येक वित्तीय ध्येयांचा आढावा घेणे गरजेचे आहे. एखाद्या वित्तीय ध्येयाशी निगडित फंडाचा परतावा अपेक्षित पराताव्याहून कमी किंवा अधिक असल्यास वित्तीय ध्येयाच्या अधिक जवळ किंवा अधिक दूर राहण्याची शक्यता आहे. नेमके किती जवळ वा किती दूर आहोत आणि त्या मागील कारणे ज्ञात करून घेणे गरजेचे आहे.

जमा-खर्चाचा आढावा आणि वित्तीय ध्येयांचे पुनरावलोकन

नवीन आर्थिक वर्ष म्हटले की पगारवाढ होणे आलेच. मग त्या अनुषंगाने मागील वर्षी राहून गेलेल्या काही गोष्टी या वाढलेल्या पगारातून करण्याचा बेत केला गेला असण्याचीही शक्यता असते. उदाहरणार्थ, गाडी बदलायचे गेल्या वर्षी ठरविले होते. पण मागील वर्षी निश्चित केलेल्या मॉडेलपेक्षा अधिक किमतीचे मॉडेल मनात भरल्याने त्याच्या खरेदीचा मोह सतत होत असतो.

नवीन वर्षांतील वाढीव उत्पन्नानुसार आणि बदललेल्या इच्छा आकांक्षांमुळे सध्याच्या गुंतवणुकीत वाढ करणे आवश्यक आहे का आणि नेमकी किती करावी याचा आढावा घेणे गरजेचे आहे.

मालमत्तेचे सुयोग्य विभाजन

वित्तीय नियोजन म्हणजे वित्तीय ध्येयांची निश्चिती आणि ध्येय गाठण्यासाठी मार्ग संक्रमण ठरविणे, असा समज असेल तर हा समज चुकीचा आहे. अनेकदा एक वित्तीय नियोजक या नात्याने येणारा अनुभव असा की, गुंतवणूकदाराला कोणत्या फंडात गुंतवणूक करणार याची उत्सुकता असते आणि त्याच्या लेखी फंड निश्चिती झाली की काम झाले. परंतु वित्तीय ध्येयांची निश्चिती ही ध्येये गाठण्यासाठी अपेक्षित असलेला परताव्याचा दर या गोष्टी महत्त्वाच्या असतात. जोखीम स्वीकारण्याच्या कुवतीनुसार प्रत्येक गुंतवणूकदाराच्या बचतीची वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये अर्थात मालमत्ता विभागणी निश्चित केली जाते. यातून रोखे आणि समभाग यांच्यातील विभागणीचे प्रमाण निश्चित होत असते. वेगवेगळ्या कारणांनी हे विभाजन बदलत असते. जसे की मागील वर्ष हे समभाग गुंतवणुकीसाठी उत्तम परतावा देणारे वर्ष ठरले. त्यामुळे एकूण गुंतवणुकीतील समभाग गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता मात्र रोखे आणि समभाग यांचे संतुलन राखण्यासाठी समभागातील काही रक्कम काढून रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतविणे गरजेचे बनेल. अथवा नवीन वर्षांत पूर्व निश्चित रोखे-समभाग गुंतवणुकीचे प्रमाण बदलून रोखे गुंतवणूक वाढविणे आवश्यक आहे. ध्येय निश्चितीची अपेक्षित गती राखण्यासाठी रोखे आणि समभाग गुंतवणुकीचा समतोल राखणे गरजेचे आहे.

लिक्विड फंड : आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा घटक

लिक्विड फंड हा गुंतवणूकदाराच्या दृष्टीने कमी महत्त्वाचा घटक असतो. परंतु वित्तीय नियोजनात अनेक संभाव्य खर्चाच्या तरतुदीसाठी नियोजन करणे गरजेचे असते. या अदृश्य खर्चाची तरतूद वित्तीय नियोजनात लिक्विड फंडातील गुंतवणुकीच्या माध्यमातून केलेली असते. जर पुरेशी रोकड सुलभता नसेल तर अन्य वित्तीय ध्येयांशी निगडित असलेल्या गुंतवणुका विकून रोकडसुलभता निर्माण करावी लागते. बहुतेक वेळा चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुका विकण्याला पर्याय राहात नाही. नवीन वर्षांत रोकड सुलभतेची किती आवश्यकता आहे हे जाणून घेऊन अन्यत्र उपयोगात नसलेल्या रोकडीची गुंतवणूक रोकडसुलभ लिक्विड फंडात करून आणि त्यात भर घालून आवश्यक तितकी रोकड सुलभता निर्माण करणे हा नवीन वर्षांचा संकल्प असायला हवा.

खर्चावर नियंत्रण

अनावश्यक खर्च वित्तीय नियोजनात बाधा आणतात. म्हणून अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणणे हा नवीन वर्षांचा महत्त्वाचा संकल्प आहे. या व्यतिरिक्त जीवन विमा आणि आरोग्य विम्याचे पूर्वालोकन हा देखील महत्त्वाचा विषय आहे. मागील वर्षांत वित्तीय दायित्व (कर्ज) वाढले असेल, कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनामुळे वित्तीय जबाबदारी वाढली असेल तर विमाछत्राचा नव्याने आढावा घेणे गरजेचे आहे. पूर्वी चाळिशी-पन्नाशीनंतर होणारे आजार वाढत्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे हल्ली अनेकांना तिशीतच गाठताना आढळतात. त्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.

जे कोणी स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्न मिळवीत आहेत त्यांनी आपण देत असलेल्या सेवांचे शुल्क येत्या १ एप्रिलपासून वाढविणे आवश्यक आहे. महागाई जगण्याच्या प्रत्येक अंगाला जाणवत असते. या महागाईचा मुकाबला करण्यासाठी आपले उत्पन्न वाढविणे गरजेचे हे लक्षात घेऊन आपल्या सेवाशुल्कात वाढ करण्यासाठी यापेक्षा चांगला मुहूर्त मिळणार नाही.

arthmanas@expressindia.com