आर्थिक वर्ष २०२०-२१ हे ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. ज्या करदात्यांनी विविध कलमानुसार अनुपालन अद्याप केले नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ते करावे. न चुकविता येणाऱ्या चार गोष्टी अशा –

१ ज्या करदात्यांना २०१९-२० या वर्षाचे सुधारित विवरणपत्र दाखल करावयाचे आहे किंवा ज्या करदात्यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र अद्याप भरले नसेल तर ते विलंब शुल्क भरून ३१ तारखेपर्यंत दाखल करता येईल. १ एप्रिलनंतर ते करताच येणार नाही.

२ ज्या करदात्यांनी नवीन कररचनेचा (कोणतीही गुंतवणूक न करता) विकल्प न निवडता जुनाच विकल्प निवडला असेल त्यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी गुंतवणूक किंवा खर्च (उदा. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, गृह कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, मेडिक्लेम, वगैरे) ३१ मार्चपूर्वी करावी लागेल. ३१ मार्चनंतर केलेल्या गुंतवणुका आणि खर्च यांची वजावट २०२०-२१ या वर्षासाठी घेता येणार नाही.

३ ज्या करदात्यांनी अग्रिम कर भरलेला नाही किंवा कमी भरला आहे त्यांनी तो ३१ मार्चपूर्वी भरावा. कर ३१ मार्चपूर्वी भरल्यास अग्रिम कर म्हणून समजला जातो.

४करदात्यांना ‘पॅन’ला ‘आधार’शी जोडण्याला दिली गेलेली वाढीव मुदत ३१ मार्चला संपत आहे. असे न केल्यास ‘पॅन’ निष्क्रिय होईल आणि विवरणपत्र दाखल करता येणार नाही. शिवाय १०,००० रुपयांचा दंडदेखील भरावा लागू शकतो.

येत्या १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. या नवीन आर्थिक वर्षातील अनुपालन वेळेवर करून आपली व्याज, दंड, विलंब शुल्क यापासून सुटका करून घेतली पाहिजे.      – प्रवीण देशपांडे